मंगळवार, ७ मे २०२४
7 May 2024

नवी मुंबईचा उडता पंजाब होऊ द्यायचा का..?

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

 

दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० ते २०२२ या कालावधीत मिरा रोड परिसरात जिथे पडक्या इमारती, जुनी घरे होती त्या ठिकाणी आफ्रिका, नायजेरिया मधून आलेले अनेक लोक बेकायदेशीर राहत होते. ती घरे बेकायदेशीर आहेत, असा ठराव महानगरपालिकेने केला आणि त्यावेळी तिथे असणारे डीसीपी अमित काळे यांनी ती सगळी बांधकाम बुलडोझर लावून पाडायला लावली. त्या जागेत राहून मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा व्यवहार चालत असे. राहण्याचे ठिकाणच नष्ट झाल्यामुळे हे लोक नालासोपारा, खारघर, कोपरखैरणे, तळोजा, वाशी, उलवेच्या काही भागात शिफ्ट झाले. या भागात राहणारे ९०% नोकरदार लोक सकाळी ऑफिसला जातात.

रात्री उशिरा परत येतात. दिवसभर या परिसरात प्रचंड शांतता असते. बघायला, विचारायला कोणी येत नाही. शैक्षणिक संस्थांचे जाळे, आयटी पार्क आले. एकटे राहणाऱ्या तरुणांची संख्या वाढली. पब, पार्टिकल्चर वाढले. या सगळ्या ठिकाणी मध्यम, उच्च मध्यमवर्गीय लोकांची गर्दी वाढली. ड्रग्ज विक्रेत्यांना हवे ते ग्राहक मिळू लागले. मीरा-भाईंदरच्या हद्दीत नायजेरियन लोकांनी गाव वसवले होते. त्यात बांगलादेशी देखील मोठ्या प्रमाणावर होते. पुढे ही गर्दी नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात पसरली. या भागात बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे भाडे करारावर घरे सहज उपलब्ध होऊ लागली.

आपल्या घरांना चांगले भाडे मिळते हे पाहून अनेकांनी चौकशी न करता घरे भाड्याने देणे सुरू केले. या भागातून मुंबईची कनेक्टिव्हिटी चांगली झाली आहे. खाडी पलीकडे असणारी मुंबई आणि मुंबईतल्या अंतर कमी झाले. कुठेही कारवाई झाली तर दुसऱ्या ठिकाणी पळून जाणे सोपे झाले. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात सोसायट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे इथे अनोळखी माणसाला येऊन स्थिर होणे अशक्य होते. त्याला चार जण विचारतात. नवी मुंबई अजूनही स्थिर होण्याच्या मार्गात आहे. त्यामुळे खाडीपलीकडे कोणी कोणाला ओळखत नाही. म्हणून ड्रग्ज माफियांसाठी नवी मुंबई आवडीची बनली. त्यातच या लोकांना खोटे पॅनकार्ड, व्हिसा, पासपोर्ट मिळतील अशी व्यवस्था होऊ लागली. त्यातून स्थानिक पोलिसांची हातमिळवणी झाल्यामुळे यांच्या धंद्याला बरकत आली.

ड्रग्ज माफियांचा हा अड्डा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उध्वस्त करण्याचा विडा उचलला. त्यात त्यांना गेल्या आठवड्यात मोठे यश आले. एकाच वेळी ७५ परदेशी लोक त्यांच्या जाळ्यात अडकले. त्यात नायजेरियन, बांगलादेशी, पासपोर्टची मुदत संपलेले, सर्व प्रकारचे नागरिक आहेत. एखाद्या चोराला पकडण्या एवढी ही मोहीम सोपी नव्हती. भारत आणि नायजेरियाचे व्यापारी संबंध अतिशय उत्तम आहेत. नायजेरियन, आफ्रिकन देशांसोबत क्रूड पेट्रोलियम, पेट्रोलियम गॅस यांचा आपण व्यापार करतो. हे देश आपल्याकडून रिफाइंड पेट्रोल, मोटरसायकल अशा गोष्टी घेतात.

एखाद्या पाकिस्तानी नागरिकाविरुद्धच्या कारवाईला राजकीय वरदहस्त असतो. अशा प्रकरणात सॉफ्ट कॉर्नर घेतला जातो. हा अनुभव पाठीशी असताना सर्व प्रकारची जय्यत तयारी करून आयुक्त भारंबे यांच्या नेतृत्वाखाली सह पोलीस आयुक्त संजय मोहिते आणि ६०० पोलिसांची टीम या मोहिमेत उतरली. यापूर्वी अशा कारवायांमधला अनुभव चांगला नव्हता. कारवाईसाठी पोलीस आले की, हे परदेशी लोक त्यांच्या जवळचे ड्रग्स संडासात टाकून फ्लश करायचे. त्यामुळे पुरावाच उरायचा नाही. स्वतःचा पासपोर्ट फाडून टाकणे, पोलीस येताच महिलांनी स्वतःचे कपडे फाडून घेत पोलिसांवर आरोप करणे असे प्रकारही घडलेले आहेत. याआधी असे आरोपी पकडले तर त्यांना लगेच जामीन मिळवून देण्यासाठी ठराविक वकिलांची टीम असायची. एम्बेसीचे लोक यायचे. ज्यांनी आपले पासपोर्ट फाडून टाकले किंवा ज्यांचे पासपोर्ट एक्सपायर झाले त्यांना त्यांच्या देशात पाठवायचे तर त्याचा खर्च कोण करणार? इथून सगळे प्रश्न आपल्या पोलिसांपुढे याआधीही होते आणि आताही आहेत.

ड्रग्ज माफीयामुळे पंजाबची उडता पंजाब अशी बदनामी झाली. नवी मुंबईची अवस्था उडत्या पंजाब सारखी होऊ नये, यासाठी गेल्या आठवड्यात झालेली मोहीम उल्लेखनीय आहे. नियोजनबद्ध वसलेले शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक आहे. उत्तम रस्ते, स्वच्छता, चांगल्या सोयी सुविधा ही इथली जमेची बाजू आहे. मात्र या सगळ्या चांगल्या गोष्टींना काळी किनार लागली आहे. जास्त भाड्याच्या लालसेपोटी ज्यांनी आपल्या जागा अशांना भाड्याने दिल्या, त्या घरमालकांवर पोलिस आता भादवि १८८ नुसार गुन्हे दाखल करणार आहे. आपण आपले घर कोणाला भाड्याने देत आहोत, त्याची नोंद पोलीस दरबारी करणे बंधनकारक असताना अनेकांनी ती केलेलीच नाही. त्याचा फटका आता पोलिसात नोंद न करणाऱ्या घरमालकांना बसेल.

या पोलीस कारवाईमुळे काही काळ नवी मुंबईतून ड्रग्ज विक्री बंद होईल. ड्रग्ज विकत घेणाऱ्यांना जादा पैसे मोजावे लागतील. मात्र हे समूळ नष्ट करायचे असेल तर हे ड्रग्स जिथून येते तिथेच पायबंद घालावा लागेल. आपल्याकडे समुद्रमार्गे, परदेशातून, शेजारच्या गुजरात मधील जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्स येतात हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. या लोकांना कितीही अटक केली तरी ते त्यांचे लोकेशन बदलत राहतील. आज नवी मुंबई तर उद्या आणखी दुसऱ्या ठिकाणी जातील. त्यांची चेन ब्रेक होणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी केवळ पोलिसांनीच ठरवून उपयोग नाही. राजकीय इच्छाशक्ती देखील तेवढीच तीव्र असावी लागेल. नवी मुंबई पोलिसांनी त्यांचे काम चोख बजावले आहे. आता नेत्यांची वेळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *