शुक्रवार, ३ मे २०२४
3 May 2024

काहीही करा, पण आमचं राजकीय महत्त्व कायम ठेवा..!

अधून मधून / अतुल कुलकर्णी

नेहमीप्रमाणे बाबुरावांनी पत्र लिहायला घेतले. पत्राचा विषय नेमका कोणापुढे मांडावा हे न कळाल्यामुळे त्यांनी नावाची जागा रिकामीच ठेवली. ते पत्र आपल्यासाठी.
श्रीमान ……………….
नमस्कार.
आज मनात जे आले आहे ते लिहून काढले आहे. या पत्रात मांडलेल्या मुद्द्यांचा किंवा घटनांचा कुठल्याही जीवित व मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. उगाच नको ते संबंध जोडून आमचे संभ्रम वाढवू नका.
मुंबईतल्या एका मोठ्या प्रकल्पाचे काम एका विशिष्ट कंपनीला द्यायचे म्हणून सत्तेतल्या वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकत्र जमले. त्या बैठकीला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. हे काम याच कंपनीला मिळाले पाहिजे. या कंपनीवर अन्याय झाला आहे, असे सांगून त्या वेळच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्याला नेत्यांनी बैठकीत झापले देखील..! ते अधिकारी बैठकीतून उठून गेले. पुढच्या काही दिवसात या सगळ्या घटनेला असा काही यू टर्न आला, की ज्या कंपनीसाठी सगळे भांडत होते ती कंपनी सोडून दुसऱ्याच कंपनीला काम द्या, म्हणून पुन्हा त्याच सगळ्या नेत्यांचे एकमत झाले.

एका माजी मुख्यमंत्र्याकडे काही नेते, अमुक अधिकारी आपले ऐकत नाही अशी तक्रार घेऊन गेले. त्या माजी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खाजगी सचिवांना बोलावले. हे अधिकारी आपण सांगितलेले ऐकतात का..? ते अधिकारी आपण सांगितलेली सगळी कामे ऐकतात, असे उत्तर खाजगी सचिवांनी दिले. तेव्हा माजी मुख्यमंत्री म्हणाले, जोपर्यंत आपण सांगितलेली कामे ते ऐकत आहेत तोपर्यंत ठीक आहे. नंतर बघू… आणि ती चर्चा तिथेच थांबली.

कोणा एकाच्या बळावर कुठल्याही राज्यात सरकार येणे कठीण. त्यामुळे तडजोडीचे राजकारण करावे लागते. समोरच्याचे मत पटले नाही तरी त्याला सोबत घ्यावे लागते. अशा स्थितीत सकाळी घेतलेली भूमिका दुपारी बदलावी लागते, आणि संध्याकाळी दोन्ही भूमिकांच्या विरुद्ध जाऊन फाईलवर सही करावी लागते. एखादे आश्वासन राजकीय गरजे पोटी द्यावे लागते ते आश्वासन गळ्यापर्यंत आले तर वेगळाच काहीतरी विषय काढून चर्चा दुसऱ्या दिशेला न्यावी लागते. हे असे रोज घडते. त्यामुळे काहीजण या अशा वागण्याला डबल स्टॅंडर्ड असेही नाव देतात. काहीही झाले तरी आपण चुकीचे करतोय असे कधीही नेत्यांना वाटत नाही. आपले महत्त्व कायम टिकवून ठेवण्यासाठी राजकारणी काहीही करायला तयार होतात. कोण, कोणासोबत, कधी जाईल? याचे कुठले तत्व, निष्ठा किंवा नियम असे काहीही नसते. त्यामुळे सामान्य माणूस संभ्रमात पडतो. तिथेच या अशा नेत्यांचा विजय होतो. जेवढा संभ्रम जास्त, तेवढे त्या नेत्याचे महत्त्व वाढत जाते. एकाच स्टेजवर असताना दुसरे नेते काय बोलले ते मी ऐकलेच नाही, असे सांगितले की चर्चा आणि संभ्रमांना आणखी वाव मिळतो.

एकाच कुटुंबातील अनेक नेते राजकारणात असतात. काका-पुतण्या, भाऊ-बहीण, बाप-मुलगा, भाऊ-भाऊ हे कोणत्याही पक्षात आणि राजकारणात सहज दिसतात. कधीकाळी त्यांचे घरात असणारे मधुर संबंध नंतर बिघडतात. त्यांच्यात आडवा विस्तू जात नाही, इतके नाते टोकाला जाते. तरीही आपले महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी, घरात एकमेकांशी पटत नसताना हे नेते सामंजस्याने राजकीय खेळ्या खेळत राहतात. जे राजकारण करायचे ते फक्त आणि फक्त सत्तेसाठीच करायचे. सत्ता मिळाली नाही तर ज्यांना मिळाली आहे त्यांच्या जवळ राहण्यासाठी करायचे. मात्र स्वतःचे महत्त्व कायम टिकून राहिले पाहिजे हे तत्व कधीही विसरायचे नाही. या न्यायाने राजकारणी वागताना दिसतात. मात्र जनतेसमोर जाताना हेच नेते आम्ही विकासासाठी एकत्र आलो असे जेव्हा सांगतात तेव्हा त्यांना डबल स्टॅंडर्ड म्हणायचे की नाही? हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडतो. त्यामुळे त्यांच्यातला संभ्रम पुन्हा वाढतो… अर्थात नेत्यांचे महत्त्व पुन्हा वाढतच जाते..!
सत्तेच्या जवळ राहणारे नेते पुढच्या वेळी कोणता पक्ष सत्तेत येईल याची सतत चाचपणी करत असतात. विद्यमान सत्ताधीश पक्ष पुन्हा येईल की नाही याची खात्री नसेल तर ते दोन्ही डगरीवर हात ठेवून आपले काम चालू ठेवतात. सत्ता नसताना आपल्याला कोणी भेटायला येत नाही… दिवस खायला उठतो… याची त्यांना चिंता असते. काही नेते माध्यमातल्या लोकांना सांगत असतात. वाईट लिहा किंवा चांगले … पण आमच्या विषयी सतत काहीतरी लिहा. रोज आमचं नाव छापून आलं पाहिजे. रोज आम्ही दोन-चार वेळा टीव्हीवर दिसलो पाहिजे. म्हणजे आपण चर्चेत रहातो. अन्यथा आपण मूळ प्रवाहातून बाहेर फेकले जाऊ अशी त्यांना सतत भीती वाटत असते. त्यातून मग ते नित्य नवे विषय शोधून काढतात. त्यावरून वादग्रस्त विधाने करतात. विरोधी पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांची नावे घेऊन आरोप करतात समोरचा नेताही त्याला उत्तर म्हणून बोलू लागतो. वाद रंगतात. अनेकदा रंगवले जातात. अनेकदा अशा गोष्टी ठरवून केल्या जातात. आपण सगळे जास्तीत जास्त संभ्रमात कसे राहू याचे प्रयत्न सतत होत असतात. कारण जेवढा संभ्रम जास्त तेवढे त्यांचे महत्त्व जास्त..!
असे संभ्रम निर्माण करणारे नेते कोण..? कोणाचे, कोणाशी, कसे संबंध आहेत? कोण कायम सत्तेच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो? हे ज्याचे त्यांने आपापल्या आकलनाप्रमाणे समजून घ्यावे. उगाच आमच्यावर संभ्रम वाढवल्याचा ठपका नको.
तुमचाच बाबुराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *