जाने भी दो यारो, शोभायात्रा आता आले तर..?
कॅलिडोस्कोप / अतुल कुलकर्णी
‘जाने भी दो यारो’ हा सिनेमा १९८३ साली आला. कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा एनएफडीसीने बनवला होता. या सिनेमात दोन पत्रकार एक डेड बॉडी घेऊन जातात. त्याचा प्रवास एका नाट्यगृहात पर्यंत होतो. त्या ठिकाणी महाभारत नाटक सुरू असते. द्रौपदीची साडी नेसवून ती डेड बॉडी लपवण्याचा प्रयत्न करताना साडी नेसलेल्या डेड बॉडीला स्टेजवर नेले जाते. द्रोपदीच्या साडीत डेड बॉडी आहे हे कळू नये म्हणून पत्रकारही दुर्योधनाच्या वेशात स्टेजवर जातो. द्रौपदीचे वस्त्रहरण करू देणार नाही, अशी भूमिका दुर्योधनच घेतो. डेड बॉडीच्या शोधात असणारे सगळे वेगवेगळ्या वेशभूषेत रंगमंचावर येतात. त्याचवेळी डेड बॉडीच्या शोधातील काही लोक जलालुद्दीन अकबर आणि सलीमच्या वेशभूषेत स्टेजवर येतात. द्रौपदी तुमची कोणाचीच नाही. पांडव आणि कौरव दोघांचीही नाही, ती आमची आहे, असे जलालुद्दीन अकबरच्या वेशभूषातील कलावंत म्हणू लागतो… हा सगळा गोंधळ स्टेजवर सुरू असताना प्रेक्षक मनमुराद त्याचा आनंद घेतात. हा सिनेमा ज्या काळात आला त्या काळात यावरून कसलेही वादंग झाले नाही. ते दोन पत्रकार खऱ्या खुन्याला शोधायला निघालेले असतात. मात्र सगळी यंत्रणा एकत्र येते आणि त्यांनाच आरोपी केले जाते. शेवटी आरोपीच्या वेशातील ते दोघे सर्वसामान्यांच्या गर्दीतून चालत जाताना पाठीमागे ‘हम होंगे कामयाब…’ हे गाणे सुरू होते… त्या सिनेमाचा शेवटही तेव्हाच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारा होता.
काही वर्षांपूर्वी शोभायात्रा नावाचे एक नाटक आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक गुंड भाई शोभायात्रेचे आयोजन करतो. त्यासाठी गावातील प्राध्यापक, वकील अशा काही नागरिकांना एकत्र करून त्यांना महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, झाशीची राणी अशा वेगवेगळ्या वेशभूषा आणि डायलॉग दिले जातात. शोभा यात्रेला पोलिसांची परवानगी नसते. ती मिळवण्यात उशीर होतो. त्यामुळे वाहनिया नेत्यांच्या वेशभूषेतील लोकांची अस्वस्थता वाढत जाते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांच्या वेशभूषेतील लोकांना चहा प्यायलाही जाता येत नाही. त्यांना चहापाणी देण्यासाठी एक मुलगा स्टेजवर येतो. त्यातून जे संवाद घडतात ते आजच्या परिस्थितीवर चपखल भाष्य करत जातात.
मेरी झांसी नही दूंगी… म्हणणारी झाशीच्या राणीची वेशभूषा करणारी शिक्षिका प्रत्यक्षात मात्र नवऱ्याचा छळ करणारी असते. चरख्यावर सुत कताई करणाऱ्या गांधीजींचा रोल करणारा कलावंत आपली मुलं उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत कशी स्थायिक झाली आहेत, हे आनंदाने सांगत जातो. बाबू गेनूची भूमिका करणारा तरुण अर्धवट शिक्षण सुटलेला बेकार असतो. चहा आणणारा पोरगा कोल्ड्रिंक्स कोणाला आणि सिगारेट कोणाला द्यायची असे गांधीजी आणि पंडित नेहरूंकडे बघून विचारतो… भारताची भावी पिढी म्हणून ज्या तरुण मुलांचा उल्लेख होतो, तो बारा तेरा वर्षाचा मुलगा चहा वाल्याच्या भूमिकेत दिसतो. त्याची अवस्था अतिशय केविलवाणी असते. त्याचे भवितव्य त्यालाच माहिती नसते. थोडक्यात काय तर शिक्षण न मिळणाऱ्या चहावाल्यापासून ते गुंड भाई पर्यंत अनेकांना भारताचा इतिहासही पूर्ण माहिती नसतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण किती तरी पुढे जायला हवे. मात्र आपण कसे आपल्याच हाताने आपला कसा ऱ्हास करून घेत आहोत यावर हे नाटक भाष्य करत जाते.
जाने भी दो यारो सारखा चित्रपट आणि शोभायात्रा सारखे नाटक आजच्या काळात आले तर काय होईल हा प्रश्नच मनात अस्वस्थता घेऊन येतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून आज प्रत्येकाच्या भावना अतिशय तीव्र झाल्या आहेत. राजकीय उपहास, विडंबन, ब्लॅक कॉमेडी असे असे काही व्यक्त होण्याचे विषय असतात हेच सगळे विसरून गेले आहेत. उपहास, विडंबन देखील लोकांना सहन होत नाही. कारण नसताना टोकाचा संताप वाढत आहे. रील आणि व्हिडिओच्या जमान्यात कोणीही, कोणालाही, कशासाठीही मारतो. त्याची रील बनवून सोशल मीडियावर टाकतो. कशावरून आमच्या भावना दुखावतील याचा ताळमेळ नाही. पठाण चित्रपटात दीपिका ने अमुक रंगाची बिकिनी घातली म्हणून कोणाच्या भावना दुखावतात… एखाद्या कलावंताने भूमिका मांडली की त्याला ट्रोल केले जाते. हे अत्यंत भयंकर आणि विदारक आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ही ओळखला जातो. त्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे त्यावरून प्रत्येक विचारी माणसाच्या मनात कमालीची अस्वस्थता आहे… तुम्हाला काय वाटते..?
Comments