सोमवार, २९ एप्रिल २०२४
29 April 2024
महाराष्ट्राच्या सामाजिक जाणिवेला मोठा डाग; गोळीबारात २ गेले, आता पुढे काय हाेणार? - Marathi News | Article written on firing case and political situation in the maharashtra | Latest ...

महाराष्ट्राच्या सामाजिक जाणिवेला मोठा डाग;
गोळीबारात २ गेले, आता पुढे काय हाेणार?

महाराष्ट्राच्या सामाजिक जाणिवेला मोठा डाग; गोळीबारात २ गेले, आता पुढे काय हाेणार? - Marathi News ||

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

गेला आठवडा बंदुकीतून गोळ्या झाडण्याचा होता. ठाण्यात शिंदे गटाच्या कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या दबावामुळे आपण गोळीबार केला, असे सांगत भाजप आ. गणपत गायकवाड यांनी भर पोलिस ठाण्यात गोळीबार केला. मुंबईत उद्धव ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांना सर्वपक्षीय संबंध असलेल्या मॉरिस नरोन्हा याने गोळ्या झाडून मारले. त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर असताना महाराष्ट्राची ही अवस्था आहे. राजकीय संघर्ष जसे टोकाला जातील तशा या घटना वाढतील, हे सांगायला आता ज्योतिषाची गरज उरलेली नाही. याआधी पुण्यात गोळीबार करून शरद मोहोळला ठार केले गेले. त्याच्या खुनाचा संशय असलेल्या मार्शल लुईस लीलाधर याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो ससून हॉस्पिटलमधून काल रविवारी सकाळी पळून गेला.

महाराष्ट्रात अशा घटना ठिकठिकाणी घडत आहेत. १० एप्रिल रोजी याच सदरात मी एक लेख लिहिला होता. त्याचा मथळाच “धमक्या, राडेबाजी… आता मर्डरच बाकी!”, असा होता. तो लेख एवढ्या लवकर खरा ठरेल, असे वाटले नव्हते. मुंबई, ठाण्यातच नाही तर राज्यभर सत्तेसाठीचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यातून वर्चस्ववादाची लढाई जेवढी टोकदार होईल, तेवढे त्या लढाईचे टोक कोणाला ना कोणाला तरी जखमी करत जाईल. मुळात शिवसेना आणि भाजपचे अनेक आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढून जिंकून आले किंवा काही जण पराभूत झाले. आता राष्ट्रवादी, शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप या तिघांचे सरकार आहे. त्यामुळे जागावाटपाचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत जाणार आहे. त्यातून शिंदे गटातील काही खासदारांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. तसे झाले तर संख्याबळाचा मुद्दा येईल. त्यातून नवेच विषय तयार होतील.

लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळी हा संघर्ष आणखी टोकाचा होईल. लोकसभेत भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला किती महत्त्व दिले जाईल हा प्रश्नच आहे. मुंबई, ठाण्यात उद्धव ठाकरे गटाला मताधिक्य जास्त मिळाले तर संघर्ष पुन्हा वेगळे वळण घेईल. मुंबई, ठाण्यात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या दोन शिवसेनेतील लढाई टोकाला जातील. राष्ट्रवादीला मुंबईत फारसा पाठिंबा नाही. बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यातून राष्ट्रवादीला काहीही फरक पडणार नाही; मात्र त्यांचा आमदार मुलगा झिशान सिद्दिकी याने काँग्रेस नेतृत्वाला दोष देत अजूनही आपण काँग्रेसमध्येच असल्याचे सांगितले आहे. त्या सांगण्यालाही फारसा अर्थ नाही. मुंबई काँग्रेसमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. मुंबईतल्या नेत्यांना एकत्र बांधून ठेवेल, असे सर्वमान्य नेतृत्व मुंबईत नाही. मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना एका बंद खोलीत दिवसभर ठेवा आणि आपापसातली भांडणे मिटवून एकदिलाने बाहेर या, असे सांगणारा एकही नेता आज मुंबईत नाही. एकाला जबाबदारी दिली की, त्याचे पाय ओढणारे चार जण जमा होतात. आपल्याला काँग्रेसला विजयी करायचे आहे अशी जिद्द, झपाटलेपणा मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांमध्ये दिसत नाही.

साधे उदाहरण द्यायचे तर वर्षा गायकवाड लोकसभेला उभ्या राहिल्या तर त्या राहुल शेवाळे यांचा पराभव करू शकतात; पण त्यांना दिल्लीत जायचे नाही. याचा अर्थच प्रत्येक जण ‘मी आणि माझा’ याच्यापलीकडे पक्ष म्हणून विचार करायला तयार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईत खरी लढत भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात होईल असे चित्र आजतरी आहे. ठाण्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ठाण्यात भाजपच्या नेत्यांना विधानसभा आणि लोकसभा पूर्णपणे स्वबळावर लढायची आहे. गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करू नका, असे सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर ठाण्यातील भाजपने दबाव टाकला आहे. जर गणपत गायकवाड यांना शिक्षा झाली तर त्याचा फटका ठाण्यात भाजपला बसेल. आम्ही जे बोलू शकत नव्हतो किंवा करू शकत नव्हतो, ते गणपत गायकवाड यांनी करून दाखवले आहे, असेही भाजपचे स्थानिक नेते आता बोलत आहेत.

ही झाली राजकारणातली ‘जर तर’ची गोष्ट. राजकारणात त्याला फारसे महत्त्व नसते; मात्र गेल्या काही महिन्यांत घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांमुळे महाराष्ट्रातला सामान्य मतदार अस्वस्थ आहे. सातत्याने महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेश, बिहारच्या गुंडगिरीशी होत आहे. ही अस्वस्थता जर मतपेटीतून बाहेर आली तर कदाचित वेगळे चित्र महाराष्ट्र देशाला दाखवेल. विधानसभेत एकमेकांच्या विरोधात कितीही आरोप-प्रत्यारोप झाले तरी बाहेर पडल्यानंतर एकमेकांची मैत्री आणि नाते जपण्याचा सुसंस्कृतपणा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा मोठेपणा नेत्यांनी अनेक वर्षांत जपला आहे. दुर्दैवाने या दीड-दोन वर्षांत त्याला ग्रहण लागले. त्याचे ताजे उदाहरण अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूचे देता येईल. भाजपचे एक-दोन नेते वगळता अन्य कोणीही अभिषेकच्या अंत्ययात्रेलाही जाण्याचे सौजन्य दाखवले नाही. यासारखे दुर्दैव ते काय..? आधीच मराठा-ओबीसी राजकारणाने राज्यभर एकमेकांची मने दुभंगली आहेत. त्यात धमक्या, राडेबाजी, गुंडगिरी आणि आता एकमेकांचे जीव घेण्याने सुसंस्कृत महाराष्ट्र हाच होता का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. या सगळ्याने महाराष्ट्राच्या सामाजिक जाणिवेला फार मोठा डाग लागला आहे. निवडणुका येतील, जातील. पण जे काही चालू आहे, त्यामुळे महाराष्ट्राचे होणारे नुकसान कधीही भरून येणार नाही.

<div class=

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *