रविवार, १९ मे २०२४
19 May 2024

गांधी आले की, सगळे एकत्र येतात, इतरवेळी..? महाराष्ट्र अन् मुंबई काँग्रेसमध्ये चाललंय काय?

 

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप मुंबईत झाला. मणिपूरहून निघालेली यात्रा ६,७०० किलोमीटरचा प्रवास करीत शनिवारी मुंबईत आली. स्वतः सोनिया गांधी, प्रियांका गांधी न्याय यात्रेच्या समारोपाला हजर राहिल्या. शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा हे आजपर्यंतचे अलिखित गणित आहे. रविवारी राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवर सभा झाली. त्यात शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह इतर राज्यांतील बडे नेतेही सहभागी झाले. यानिमित्ताने मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते फोटोंमध्ये तरी एकत्र आल्याचे दिसले. ‘फेविकॉल का मजबूत जोड’ ही जाहिरात जशी आहे, तसे ‘गांधी नाम का मजबूत जोड’ आजही काँग्रेसमध्ये कायम आहे. गांधी सोबत असल्याशिवाय काँग्रेस एकत्र का येत नाही? हा काँग्रेससाठी कायम वेगळ्या चिंतनाचा विषय आहे.

एक मात्र खरे की, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांची यात्रा मरगळलेल्या काँग्रेसला खडबडून जागे करण्यासाठी कामी आली आहे. ठाणे, मुंबईत त्यांनी घेतलेल्या चौक सभांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय दिसला. तरुणांची गर्दी कमालीची होती; मात्र गर्दीमुळे मतदान मिळत नाही, हे मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांना अनुभवाने कळाले असेलच. भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर करून टाकली. महाविकास आघाडी अजूनही २० की २३ या वादात आहे. काँग्रेसला खरोखरच ही लढाई जिंकायची असेल तर जागावाटपाचा तिढा लवकर सुटेल; मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपशी आतून संधान साधले असेल, तर जागेचा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहील. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला २३ जागा हव्या आहेत. काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी २० जागा आणि ८ जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, असा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत आला आहे. हा वाद लवकर मिटला तर लोक प्रचाराला लागतील.

राष्ट्रवादीने वर्धा, तर शिवसेनेने रामटेकसाठी आग्रह धरला आहे. लोकसभेच्या एका मतदारसंघासाठी किमान २,२०० ते २,४०० बूथ असतात. बूथवर पोलिंग एजंट म्हणून बसण्यासाठी तेवढ्या कार्यकर्त्यांची तरी गरज असते. त्याशिवाय बूथच्या बाहेर पक्षाचे प्रत्येकी चार ते पाच कार्यकर्ते दिसावे आणि असावे लागतात. हा हिशेब केला तर एका लोकसभा मतदारसंघासाठी किमान ११ ते १२ हजार कार्यकर्ते गरजेचे आहेत. एवढे नेटवर्क ज्या पक्षाकडे, ज्या लोकसभा मतदारसंघात आहे त्यांनी त्या मतदारसंघाचा आग्रह धरावा, असा रास्त आणि वास्तववादी मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी धरला आहे. बीड, सिंधुदुर्ग- रत्नागिरीमध्ये आमच्याकडे एवढे देखील कार्यकर्ते नाहीत, अशी कबुलीही बैठकांमधून काँग्रेस नेत्यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे ग्राउंड रिॲलिटी लक्षात घेऊन जागांसाठी आग्रह धरणे महाविकास आघाडीसाठी हिताचे ठरणार आहे.
मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघांत प्रत्येकी ३ जागा काँग्रेस आणि शिवसेनेने लढायच्या, असे जवळपास निश्चित झाले आहे. दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत यांचे नाव निश्चित झाले आहे. उत्तर पश्चिम मुंबईमधून ठाकरे सेनेने अमोल कीर्तिकर यांना, तर उत्तर पूर्व मुंबईमधून भाजपचे मिहीर कोटेचा यांच्याविरोधात संजय दिना पाटील यांना मैदानात उतरवण्याचे शिवसेनेने निश्चित केल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसने उत्तर मुंबईमधून भाजपचे पीयूष गोयल यांच्याविरोधात गोविंदा किंवा राज बब्बर यांना गळ घातली आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पूनम महाजन यांच्या आधी सलग दोनवेळा प्रिया दत्त काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. काँग्रेसकडे अद्याप या मतदारसंघासाठी नाव निश्चित नाही. संजय निरुपम यांचे नाव तेथे आले तर आश्चर्य नाही. दक्षिण मध्य मुंबईमधून शिंदे शिवसेनेचे राहुल शेवाळे विद्यमान खासदार आहेत. त्या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांनी उभे राहावे, असा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड तिथल्या उमेदवार होऊ शकतात.
ठाण्यात तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील. भिवंडीमधून काँग्रेसने ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे यांचे नाव निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे. कल्याणमधून आदित्य ठाकरे यांनी उभे राहावे, असा आग्रह धरला जात आहे, तर पालघरमधून शिवसेना की बहुजन विकास आघाडी, हा निर्णय अद्याप झालेला नाही. त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीला त्यांचा खासदार लोकसभेत पाठवण्याची संधी असल्याचे बोलले जाते.

रायगडमधून अनंत गिते, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून विनायक राऊत यांना शिवसेनेकडून पुन्हा संधी दिली जाईल. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवले आहे.

मुंबईच्या ६, ठाण्याच्या ३, पालघर, रायगडची प्रत्येकी एक अशा ११ जागांसाठी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ किती न्याय मिळवून देते, हे निकालानंतर स्पष्ट होईल. आज तरी कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्याचे काम या यात्रेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *