शुक्रवार, २ मे २०२५
2 May 2025

…तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !

अतुल कुलकर्णी, संपादक लोकमत, मुंबई

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती झाली. गेले काही वर्षे ते मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून काम पाहत होते. एका म्यानात दोन तलवारी, असे चित्र यानिमित्ताने निर्माण झाले होते. नेमके कोणाचे ऐकायचे? असा प्रश्न अनेक अधिकाऱ्यांना पडत असे. आता ती संभ्रमावस्था दूर झाली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्तपद हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात बॉलीवूड आहे. शेअर मार्केटही इथेच आहे. अनेक बड्या उद्योगपतींची मुख्यालये या शहरात आहेत. दीड-पावणेदोन कोटी लोकसंख्येचे हे शहर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. कधीकाळी याच शहरावर नियंत्रण ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जात असे. मध्यंतरी हा लौकिक मागे पडला.

तुमचा दाऊद, तर आमचा गवळी, असे विधान बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. मुंबईत बिल्डरांना धमकावणे, खंडणी वसूल करणे, असे प्रकार घडायचे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली, तेव्हा एन्काऊंटरच्या ऑर्डर दिल्या गेल्या. विरोधातले गुंड दूर करण्यासाठी गुंडांच्या टोळ्यांनीच एन्काऊंटरचा वापर केल्याचा आरोपही त्या काळात झाला. दाऊद भारत सोडून निघून गेला. गवळी तुरुंगात गेला. त्यामुळे होणारे टोळी युद्धही मागे पडले. मधल्या काळात मुंबईवर दोन वेळा दहशतवादी हल्ले झाले.२६/११ चा हल्ला मोठा होता. त्यानंतर पोलिस दलात अनेक बदल झाले. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत फारसा फरक पडला नाही. मुंबईचे पोलिस आयुक्त किंवा राज्याचे पोलिस महासंचालक व्हावे, असे प्रत्येक अधिकाऱ्याचे स्वप्न असते. त्यासाठीच अनेक अधिकारी जिवाचे रान करतात. मात्र, या पदावर बसल्यानंतर अनेकांनी व्यक्तिगत हिशोब चुकते करण्यात वेळ घालवण्याचा इतिहास आहे. आता आपण सर्वोच्च पदावर आहोत, तेव्हा या विभागासाठी चांगले काही करू, असे वाटण्याची मानसिकता हरवत गेल्याचेही अनेकदा दिसले.

एका पोलिस आयुक्तांनी त्यांच्या आवडीचा अधिकारी मटका आणि नाफ्ताचे हप्ते गोळा करण्यासाठी ठेवला होता. तर, ‘मी थोडेच तुम्हाला मला पोलिस आयुक्त करा, असे सांगितले होते?’, असा सवाल एका पोलिस आयुक्ताने तत्कालीन गृहमंत्र्यांनाच केला होता. मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी ठरवले, तर ते काहीही करू शकतात, इतकी अफाट क्षमता या पदात आहे. अशावेळी हे पद कसे आणि कोणासाठी वापरायचे याचा निर्णय त्या-त्या पोलिस आयुक्तांनीच घ्यायचा असतो. आजपर्यंतच्या पोलिस आयुक्तांनी काय केले, याचा इतिहास मुंबईकरांसमोर आहे. गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे.

वांद्रे, जुहू, अंधेरी या पट्ट्यात असणाऱ्या नाइट क्लबमध्ये वेगवेगळ्या नशेची साधने सर्रास उपलब्ध आहेत. कधीकाळी बदनाम असणारा ग्रँटरोड आता काळाच्या आड गेला आहे. तिथे मिळणाऱ्या गोष्टी मोबाइल फोनवर फोटो बघून फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मागवण्याचे प्रकार सुरू झाले. सायबर क्राइमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्या वर्षी ३,६८४ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे गुन्हे दाखल झाले. यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत १,२९४ कोटींचे गुन्हे दाखल आहेत. ‘तुम्ही कधीच मीडियाला सहज उपलब्ध झाला नाहीत, तुम्हाला भेटायचे तर मेल करावा लागत असे’, अशी खंत मावळते पोलिस आयुक्त विवेक फणसळकर निवृत्त होताना पत्रकारांनी त्यांच्या समक्ष बोलून दाखवली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलिस आयुक्तपद देवेन भारती यांच्याकडे आले आहे. किती जणांना डावलून त्यांना हे पद दिले, या चर्चांना आता अर्थ नाही. १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे भारती मूळचे बिहारमधील दरभंगाचे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशीही त्यांचे चांगले सख्य होते. विद्यमान गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. भारती यांनी महाराष्ट्रात आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावली आहे. गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित जिल्ह्यात त्यांनी काम केले आहे. त्याशिवाय १९९८ ते २००३ या कालावधीत त्यांनी केंद्राच्या गुप्तचर विभागातही काम केले आहे. मुंबईत त्यांनी विशेष शाखा, गुन्हे शाखा, कायदा व सुव्यवस्था, एटीएस, राज्य पोलिस मुख्यालय, अशा विविध ठिकाणी काम केले आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ला, पत्रकार जे. डे. हत्या प्रकरण, इंडियन मुजाहिद्दीनवरील कारवाया, शिना बोरा हत्या प्रकरण हाताळण्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे मुंबईकरांची नाडी त्यांना माहिती आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना पोलिसांच्या चिरीमिरीपासून जरी त्यांनी वाचवले, तरी लोक त्यांचे कौतुक करतील, अशी आज स्थिती आहे. त्यावेळी ते विशेष पोलिस आयुक्त होते. आता तेच सर्वेसर्वा आहेत. पत्रकारांशी कसे व किती संबंध ठेवायचे हे त्यांना चांगले समजते. त्यामुळे जी खंत फणसळकरांच्या बाबतीत व्यक्त झाली, ती यांच्या बाबतीत होईल, असे वाटत नाही. अत्यंत मितभाषी आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. प्रसंगी या स्वभावाला त्यांना मुरड घालावी लागेल. मुख्यमंत्र्यांनीही आता अन्य कोणाची विशेष पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक न करता एका म्यानात एकच तलवार राहू द्यावी. तलवारीचा डौल ही राहील आणि शानही… देवेन भारती यांना शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *