
अर्धी मुंबई की पूर्ण मुंबई……..
अतुल कुलकर्णी /संपादक, लोकमत, मुंबई
कॅलिडोस्कोप या लहान मुलांच्या खेळण्यात सतत काचेच्या वेगळ्या रचना दिसत राहतात. मुंबईचंही असंच आहे. दरवेळी वेगळी फ्रेम, वेगळं चित्र… एकीकडे उंच टॉवर्स, दुसरीकडे अथांग झोपडपट्टी. एका बाजूला दूरवर पसरलेला समुद्र, तर दुसऱ्या बाजूला बुजत चाललेली मिठी व अन्य नद्या. जंगलाच्या आसपास नागरी वस्त्या होताच, बिबटे बाहेर येताना दिसतात आणि वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मेट्रो, फ्लायओव्हर बांधताना रस्त्यांची दुर्दशा होतेय आणि फूटपाथ संपत चाललेत. या सर्वांतून मुंबईकर मार्गक्रमण करत असतो, अगदी रोज. कधीतरी चांगले दिवस येतील या आशेवर.
मुंबईत येणारा माणूस या शहरात येतो आणि ३ दिवसांत परत जातो. नोकरीसाठी आला, नोकरी मिळाली, इथं त्याचं गणित जमलं, तर तो किमान ३ वर्षे मुंबईत राहतो. त्याहीपुढे या शहरात तो रमला, इथल्या वेगाशी त्याचं नातं जुळलं, तर तो ३० वर्षे राहतो. या काळात त्याचं लग्न होतं, मुलंबाळं होतात, सेवानिवृत्तीही होते… आणि मग त्याला या शहराचा वेग नकोसा वाटू लागतो. गर्दी नको वाटते. कारण ज्या वेगाशी त्याची गाठ बांधली होती, ती उसवण्याची सुरुवात झालेली असते… त्याला हे कळत असतं… पण त्याचं मन ते मान्य करायला तयार नसतं… मग त्याला उर्वरित आयुष्य शांतपणे काढण्याची स्वप्नं पडू लागतात. त्याचे आराखडे तो बांधू लागतो… आणि सोयीने स्वत:च्या गावाकडे, नाहीतर पुणे, नाशिक जवळ करू लागतो…
हे कुठल्या संशोधनातून पुढं आलेले निकर्ष नाहीत. मात्र, तुम्ही कोणालाही विचारा, या शहरात याच तीन प्रकारचे लोक मोठ्या प्रमाणावर सापडतील. प्रत्येकाला मुंबईला जावंसं वाटतं, इतकं या शहराचं ग्लॅमर आहे. सात बेटांची मुंबई विस्तारत गेली आणि नवी मुंबई, ठाणे, पालघर, वसई अशा महानगरीत तिचं रूपांतर झालं. यातले काही स्वतंत्र जिल्हे म्हणून ओळखले जात असले, तरी ते सगळे ‘महामुंबई’ या नावातच समाविष्ट झालेले आहेत. ‘सात आंधळे आणि हत्ती’ या गोष्टीसारखं हे शहर आहे. ज्याला जसं दिसतं, जसा या महानगराचा स्पर्श होतो, त्या पद्धतीने तो या शहराकडे पाहतो, अनुभव घेतो. सगळ्यांचे सगळे अनुभव झाल्यानंतरही सांगायला, बघायला उरते ती मुंबईच…!
दहा रुपयांच्या वडापावपासून लाखभर रुपये एका वेळच्या जेवणासाठी खर्च करणारे लोकही या महामुंबईत आहेत. कोणतंही क्षेत्र असं नाही, जे मुंबईत नाही. इथल्या वेगासोबत माणूसही सतत पळत असतो. या पळापळीत कधी तो लोकलच्या दुतर्फा पिकणाऱ्या भाज्यांवर चिडून बोलतो… कधी तो गेट वे ऑफ इंडियासमोर बसून चणे-फुटाणे खात, आपणही कधीतरी ताजमध्ये बसून फेसाळणारा समुद्र बघू, अशी स्वप्न पाहतो… तर तिकडे ताजमध्ये उंची मद्याचे ग्लास रिचविणारा तो, स्वत:च्या स्ट्रगलचे दिवस अनुभवत, आपण कशी हातभट्टीची पीत होतो, हे सांगत स्वत:ला ग्रेट समजत राहतो… कधी तो मुलांच्या ॲडमिशनसाठी भल्या सकाळी उठून शाळेपुढे रांग लावतो, तर कधी तो सिद्धिविनायक, हाजीअलीसाठीही तासन् तास रांगेत असतो… रांगेत राहणं हे मुंबईकराचं प्राक्तन आहे. रांग कधी त्याला सोडत नाही आणि तो कधी रांगेला सोडत नाही… इतकं की, त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरही त्याला स्मशानभूमीतही रांगेतूनच जावं लागतं…
अशा या आयुष्यात तो कधी महापूर अनुभवतो… कधी बॉम्बस्फोटानं हादरतो… मात्र, त्यातूनही तो क्षणात सावरतो आणि पुन्हा कामाला लागतो… या त्याच्या लगेच कामाला लागण्याला आम्ही ‘मुंबईचं स्पिरिट’ असं गोंडस नाव देऊन मोकळं होतो. ते स्पिरिट असतं की नाही, माहित नाही, पण ती त्याची मजबुरी असते… ज्या रांगेत तो असतो, ती त्याला सोडायची नसते… रांग सोडली, तर त्याचा नंबर जाईल आणि पुन्हा तो कधी येईल, याची खात्री नसते… त्यामुळे कोणीतरी ‘मुंबईचं स्पिरिट’ या नावानं आपलं कौतुक करतंय ना… यातच तो समाधानी होतो… खूश होतो… खरं कारण वेगळंच असतं… त्याची या महामुंबईच्या न थांबणाऱ्या घड्याळाशी बांधलेली गाठ पक्की असते. ती त्याला सोडवतही नाही आणि सोडायची म्हटलं, तर सुटतही नाही… जो कोणी हे शहर सोडून जायची मानसिक तयारी करतो, त्यालाच ही गाठ सोडता येते…
एवढी टोकाची ओढ या शहराविषयीच सगळ्यांनाच का असते..? कारण या शहरात पावलोपावली यशापयशाच्या कहाण्या समुद्राच्या लाटेप्रमाणे सतत येत राहतात… ‘वरळीच्या सिटी बेकरीसमोर मी उभा राहायचो, त्यामुळे मला सिनेमात काम मिळालं,’ असं अमिताभ बच्चन यांनी कधी काळी सांगून ठेवलं खरं, पण आजही अनेक तरुण सिटी बेकरी शोधत येतात… काही काळ तिथं उभंही राहतात… भेंडीबाजारातल्या अल्का मेंशनमध्ये राहणारे मोहंमद रफी चाळीतल्या खोलीत कोणी रियाज करू देत नाही, म्हणून मरिन ड्राइव्हवर पहाटेच रियाज करत बसलेले सुरैयांनी पाहिलं आणि माझ्या घरी रोज रियाज करायला या, असं आमंत्रण दिलं. त्यामुळं जगाला रफींसारखा महान गायक मिळाला… म्हणूनच की काय, आजही मरिन ड्राइव्ह चोवीस तास जागा असतो… पुन्हा एखादा रफी… एखादी सुरैया येईल, या प्रतीक्षेत..! अमुक चौकात फुलं विकणारी मुलगी मोठी अधिकारी झाली किंवा अमुक काम करणारी मुलगी सिनेमात हीरॉइन झाली… अशा शेकडो कथा या शहरात आहेत… अंबानी, अदानींची कारकीर्द देशभरातल्या तरुणांना मोहीत करत असते. त्यामुळे तरुणांचे लोंढे स्वप्न उराशी बाळगून या शहरात येतात. जे तग धरू शकतात, ते टिकतात… जे डगमगतात, त्यांना हे शहर किनाऱ्यावर आणून सोडतं…
कोणी कोणाला मोठं केलं…? याच्याही कहाण्या या महामुंबईत असंख्य आहेत. नावांचा उल्लेख करायचा, तर त्या यादीचाच भला मोठा लेख होईल, पण उदाहरण म्हणून सांगायचं तर टाटा, बिर्लांनी मुंबईला मोठं केलं की, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान यांना मुंबईनं मोठं केलं..? आधी या शहरानं यांना मोठं केलं आणि नंतर त्यांनी या शहराची ख्याती दिगंत नेली…? काही असो… मात्र या शहराभोवती अशी चर्चा सतत रंगत असते.
तीन लाख विद्यार्थी, साडेआठ हजार शिक्षक आणि आठ भाषेत शिक्षण देणारी जगातली एकमेव महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा उल्लेख केला जातो. मुंबई आणि धारावीचं नातं वेगळंच आहे. ६०० एकर जागेत धारावी आहे. त्यातल्या ३०० एकर जागेवर ८० हजार झोपड्यांमध्ये आठ ते साडेआठ लाख लोक राहतात. स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचं हब अशी या धारावीची देशात ओळख आहे. कारण जीएसटीची नोंदणी केलेले तब्बल पाच हजार उद्योग इथं आहेत. सिंगल रूममध्ये चालणाऱ्या १५ हजार फॅक्टरीज आहेत. लेदर उत्पादनात धारावी नंबर वन आहे. दरवर्षी १ कोटी यूएस डॉलर्सचा माल याच धारावीतून निर्यात केला जातो.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, पालघरपर्यंत रोज लोकल रेल्वेच्या जवळपास ३,१०० फेऱ्या होतात. त्यातून रोज ७० ते ७५ लाख लोक प्रवास करतात. याच महामुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. पवई ते घोडबंदर असं १०४ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं हे अफाट जंगल. याची भव्यता सांगायची, तर न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कचं उदाहरण देता येईल. सेंट्रल पार्क ७७८ एकरांत पसरलेलं आहे. आपल्या शिवाजी पार्क एवढी २८ ते ३० मैदानं त्या जागेत मावतील एवढं मोठं ते सेंट्रल पार्क आहे. मात्र, ३० सेंट्रल पार्क एका जागेत बसतील, एवढं मोठं हे संजय गांधी नॅशनल पार्क आहे. त्याची देखरेख आणि अतिक्रमण हा पुन्हा वेगळ्या लेखाचा विषय…
मुंबईतल्या प्रत्येक विभागात अशा काही ना काही कहाण्या आहेत. माणसांच्या जगण्याच्या आहेत, संघर्षाच्या आहेत. नवनिर्मितीच्या आहेत. त्याचसोबत हावरटपणाच्याही आहेत. कष्ट करणाऱ्यांना, बुद्धी वापरणाऱ्या प्रत्येकाला हे शहर भरभरून देतं… मात्र, या शहराला परतफेड म्हणून आपण काय देतो..? हा प्रश्न या शहराचं भीषण वास्तव आहे. मुस्लीम बहुल भेंडीबाजार… आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असणारी धारावी… गिरण्या पाडून त्या जागी उभे राहिलेले टॉवर्स… मॉल… त्यातून फिरणारे हाय फाय कल्चर आणि डोकावणाऱ्या गिरण्यांच्या चिमण्यांसोबत फोटो काढणारी आजची पिढी… कधी काळी राडेबाजीसाठी प्रसिद्ध असणारा आग्रीपाडा… दलित चळवळींचं केंद्र असणारं रमाबाईनगर… वाढत्या झगमगाटात टिकून राहिलेले कोळीवाडे… स्थलांतरितांचे प्रतिनिधित्व करणारे गोरेगाव, कांदिवली, बोरीवली… सर्वदूर पसरलेले यूपी, बिहारी नागरिक… कामाठीपुरा ते मोबाइलच्या जमान्यात फोटो दाखवून ‘बोलावून’ घेण्याच्या सुविधेपर्यंत पसरलेला कॉलगर्लचा बाजार… मिठी नदीच्या जागेवर उभं राहिलेलं चकचकीत वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स… पवईच्या डोंगररांगा पोखरून तयार झालेली लोकवस्ती… दिवसेंदिवस दाट होत चाललेले रस्ते… वाढते एफएसआय… टीडीआरचा बाजार… मायानगरी… मालिकांच्या शूटिंगसाठीचे बंगले… गोरेगावची फिल्मसिटी… या आणि अशा सगळ्यांच्या पलीकडं मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, सुरक्षित पांढरपेशी जीवन जगणारे… झोपडपट्टीत राहणारे… मोठमोठ्या टॉवररूपी नव्या चाळीत राहणारे…. हे एक अफाट महानगर आहे…!
कोणासाठी ही अर्धी मुंबई आहे, कोणासाठी ही पूर्ण मुंबई आहे… हे शहर एका कॅलिडोस्कोपसारखं आहे. क्षणाक्षणाला आकार आणि रंग बदलणारं, तरीही स्वत:बद्दल सतत प्रचंड जिज्ञासा निर्माण करून देणारं…
२०५० मध्ये मुंबई पाण्याखाली जाणार अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. १९९२ च्या दंगलीत मुंबई पेटली. तिचं सामाजिक ऐक्य फाटलं… कॉस्मॉपॉलिटन अशी ओळख पुसली गेली… मात्र, नंतर काही काळानं हे शहर पुन्हा रुळावर आलं… त्या आणि नंतरच्या घटनांपासून लोकांनी बोध घेतला… त्यातून लोक गर्दीत राहू लागले, पण एकटेपणानं… एकाच इमारतीत परस्परविरोधी आणि परस्पर विसंगत लोकही राहताना दिसू लागले… एकमेकांच्या कोणत्याही गोष्टीत नाक खुपसायचं नाही, असा अलिखित करार केल्यासारखे… एकाच इमारतीत कुठं आनंदी कार्यक्रम चालू असताना कुठं दु:खद घटनाही घडली, तर त्याचं फार सोयरसुतक कोणाला उरलेलं नाही… एकाच इमारतीत राहूनही एकमेकांची कोणतीही चौकशी न करता, लोक वर्षानुवर्षे राहात आले आहेत… आपल्या शेजारी काय चालू आहे, कोण राहात आहे, याची उत्सुकताही त्यांना दिसत नाही… एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यापासून फारकत घेतल्यासारखं लोक राहू लागले…
प्रचंड हालअपेष्टा सहन करत, रोज नवनव्या समस्यांना तोंड देत, पर्यायच नाही, म्हणून दिवसातले चार-पाच तास प्रवासात घालणारा तो कधी असाहाय्य असतो. कधी अस्वस्थही होतो. इथली परिस्थिती त्याला प्रसंगी मजबूरही करते आणि मुजोरही… इथल्या छोट्याशा जागेत संसार थाटताना, गावाकडून चार माणसं घरी आली, तर त्यांना सामावून घेताना होणारी ओढाताण त्याला अस्वस्थ करते. त्यातून गाव आणि मुंबईचा होणारा दुरावा त्याला सगळ्या नात्यांपासून तोडून टाकायला लागतो. त्यातून येणारी अगतिकताही त्याला अनेकदा अस्वस्थ करत राहते. इथं पैसा भरपूर मिळतो, त्यातून प्रसंगी मुजोरपणाही येतो… पण नाती तुटत जातात, हे कळायला फार उशीर होतो. कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तशा वेळी तो एकाकी पडतो… आणि इथल्या गर्दीचा एक भाग बनून जातो. त्या गर्दीला चेहरा नसतो… नाव नसतं… त्यातून या गर्दीवर, मुंबईवर एखादं संकट आलं, तर ओळख पाळख न पाहता तो धावून जातो, तेव्हा त्या गर्दीला नाव मिळतं… मुंबईकर…! त्या संकटात तो जीव धोक्यात घालून मदत करतो. मात्र, दुसऱ्या क्षणाला केलेली मदत विसरून तो पुन्हा या शहराच्या गर्दीत आणि वेगात विरघळून जातो…
गेल्या काही वर्षांत मुंबई लौकिक आणि भौतिक अर्थानं जरी बदलली असली, तरी या शहराचं स्वत:चं असं वेगळं गुणवैशिष्ट्य आजही कायम आहे… जे कधीच बदलणारं नाही…
Comments