शुक्रवार, २६ एप्रिल २०२४
26 April 2024

सतत बदल्या होणे हा ‘ग्रेटपणा’ नाही

वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांचे खडे बोल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील अन्य कोणत्याही राज्याच्या तुलनेत, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी अतिशय संयमी आहेत. त्यांच्याशी तुमचे पटत नसेल, तर दोष तुमच्यात आहे. आपल्या सतत बदल्या होतात, याचा अर्थ आपण फार ग्रेट आहोत, असा समज कोणत्याही अधिकाऱ्याने करून घेऊ नये. अशा शब्दात माजी मुख्य सचिवांनी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी खडे बोल सुनावले आहेत.

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची काही महिन्यातच पुन्हा एकदा बदली झाली. त्यावरून अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष असतो. लोकप्रतिनिधी वाईटच वागतात. अधिकारी फार चांगले असतात, अशा चर्चांना सुरुवात झाली. त्यावर राज्याचे दोन माजी मुख्य सचिव, माजी पोलीस महासंचालक, यांनी स्वतःची परखड मते मांडली. मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून काम केलेले माजी प्रधान सचिव सी. एस. संगीतराव म्हणाले, आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचा शिपाई असो की लोकप्रतिनिधी, येणारा प्रत्येकजण वाईटच आहे या नजरेने कोणाकडे बघणे हे अत्यंत चुकीचे आहे. मुंडे अत्यंत प्रामाणिक आहेत. मात्र त्यांच्या वागणुकीत त्यांनी बदल घडवून आणणे आवश्यक आहे. एखाद्या अधिकाऱ्याची सतत बदली होणे चांगले की, एखाद्या अधिकाऱ्याने एकाच ठिकाणी तीन ते चार वर्ष काम करून लोकांचे प्रेम कौतुक मिळवणे, आपल्या कामातून लोकांवर स्वतःची छाप सोडणे चांगले..? हा विचार प्रत्येक अधिकाऱ्याने स्वतः करायचा आहे.

माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी अत्यंत परखड शब्दात आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील राजकारणी चांगले आहेत. त्यांच्याशी जर तुमचे जमत नसेल तर दोष तुमच्यात आहे. एवढे चांगले लोकप्रतिनिधी अन्य कुठल्याही राज्यात सापडणार नाहीत. आपल्या लोकप्रतिनिधींना अधिकार्‍यांशी कसे वागावे हे कळते. मी नेहमी श्रीकर परदेशी यांचे उदाहरण देत आलो आहे. श्रीकर परदेशी यांनी अनेक चांगली कामे केली. आज ते पंतप्रधान कार्यालयात आहेत. ज्यांच्या सतत बदल्या होतात ते अधिकारी खूप ‘कडक’ असतात, असा समज कोणीही करुन घेऊ नये. प्रशासनाचा गाडा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दोघांनी मिळून चालवला पाहिजे. मीदेखील अनेक कठोर निर्णय घेतले. मात्र माझे व्यक्तिगत संबंध कधीच कोणाशी वाईट झाले नाहीत. निर्णय घेताना इतरांना समजावून सांगण्याची क्षमता आपल्या अंगात असायला हवी असेही गायकवाड म्हणाले. तुकाराम मुंढे यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावून समजावून सांगितले पाहिजे तुम्ही कुठे चुकता हे दाखवून दिले तरच ते कळू शकते मुंडे यांच्या बाबतीत मी एकदा असे केले होते असेही गायकवाड यावेळी म्हणाले.

माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ लोकमत ला बोलताना म्हणाले, प्रशासनात काम करताना टीका होतच असते. कधी कौतुक होते. काम करताना अनेकदा वादाचे प्रसंग येतात. पण आपल्याला काय करायचे याविषयी मनात स्पष्टता असली की असे वाद किरकोळ ठरतात. संयमाने वागण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची जास्त असते. लोकप्रतिनिधी अडचणी सांगतच राहणारच. मात्र अधिकाऱ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जाता आले पाहिजे. तुकाराम मुंडे यांनी चांगले आहेत, पण सोबतच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जाता आले पाहिजे, त्यात ते कमी पडले असे मला वाटते.

राज्याचे माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस म्हणाले, सगळे लोकप्रतिनिधी किंवा सगळे अधिकारी वाईट किंवा चोर नसतात. अधिकाऱ्यांनी संयम ठेवायला शिकले पाहिजे. संयम हे त्यांचे सगळ्यात मोठे शस्त्र असते. लोकनियुक्त प्रशासन विरोधात जात असेल तर ते तसे का जाते याचा विचार अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. जर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या विरोधात जात असतील, तर आपण तेथे काम करू नये असे मला वाटते. ‘मलाच सगळं कळतं’ असा अविर्भाव दोघांच्याही बाजूने योग्य नाही. यात कोणाचे चुकले हा तपासाचा भाग असला तरी, अधिकाऱ्यांनी संयम सोडला की काय होते हे या प्रसंगातून लक्षात येते, असेही पारसनीस म्हणाले.

तत्कालीन एफडीए आयुक्त आणि वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव महेश झगडे यांचे आणि तत्कालीन मंत्री स्वरूप सिंग नाईक यांचे वाद खूप गाजले. तरीदेखील झगडे यांनी प्रशासनात काम करताना लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना काही कळत नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांना लोकांनी निवडून दिलेले असते. जर ते चुकत असतील, तर त्यांना समजावून सांगण्याची क्षमता आपल्यामध्ये हवी. ती जर नसेल आणि परिस्थिती हाताळता येत नसेल तर अधिकारी म्हणून आपण दुबळे ठरतो. आयएएस ही प्रशासनातील सर्वोच्च व्यवस्था आहे. त्यामुळे या पदावर असणाऱ्यांनी जबाबदारीने वागायला पाहिजे, असेही झगडे यांनी स्पष्ट केले.

सतत अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे हे बदली कायद्याला अनुसरून नाही. जर अधिकारी चुकत असतील तर त्यांना समजावून सांगणे, त्यांच्या चुका दाखवून देणे, हे प्रशासनाचे काम आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते केले पाहिजे. बदली हा उपाय नाही. अधिकाऱ्यांनी स्वतःच्या सतत होणाऱ्या बदलांचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, दुर्दैवाने आपल्याकडे ते होत नाही. बदली झाली म्हणजे आपण फार वेगळे आहोत, असा समज अधिकाऱ्यांमध्ये वाढू लागला आहे. यामुळे जनतेचेच नुकसान होते, याकडे कोणीही लक्ष देत नाही हे आणखी जास्त दुर्दैव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *