मंगळवार, ७ मे २०२४
7 May 2024

रोज ११ आगींनी पेटणारी मुंबई विझवायची की नाही..?

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

तीन वर्षांमध्ये मुंबईत १३,११९ आगीच्या घटना झाल्या. ६२ लोकांचे त्यात बळी गेले. ३८६ लोक जखमी झाले. तरीही आम्हाला कसलाही बोध घ्यावा वाटत नाही. गोरेगाव मधल्या सात मजली इमारतीला रात्री अडीचच्या सुमारास आग लागल्यानंतर अग्निशमन यंत्रणा पोहोचायला अर्धा तास लागला. अग्निशमन दलाला त्या इमारतीचे लोकेशन सापडत नव्हते, म्हणून त्यांना पोहोचायला विलंब झाला असे सांगितले जाते. रस्त्यात मोठ्या प्रमाणावर दुचाकी पार्क केल्यामुळे आगविझवे बंब पोहोचायला उशीर झाल्याची कारणे पुढे केली जात आहेत. रात्री मुंबईत कसलीही वाहतूक कोंडी नसते. तरीही अग्निशमन यंत्रणा पोहोचायला उशीर होत असेल, तर हे शहर आता रामभरोसे देखील राहिले नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. यंत्रणेने ठरवले तर मुंबईत अशा दुर्घटना घडू शकणार नाहीत. मात्र ठरवायचे कोणी हा लाखमोलाचा सवाल आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आला आहे. त्यामुळे ते काम आधी करा, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक वेळी ऐकवले जाते. अनेक अधिकाऱ्यांचा हाच अनुभव आहे. वॉर्ड ऑफिसर किंवा बाकीचे अधिकारी वरिष्ठांना डावलून खरोखरच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे का? हे खरे खोटे करायच्या भानगडीत जात नाहीत. वरिष्ठांचे आदेश पाळणे यापलीकडे त्यांच्या हाती असते तरी काय? मुख्यमंत्र्यांनी खरोखरच एकदा यात लक्ष घातले पाहिजे. आपले नाव सांगून नेमके काय चालू आहे, याचा शोध त्यांनी घ्यायला हवा. संपूर्ण महापालिकेची यंत्रणा फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांचेच आदेश पाळत असल्याचे चित्र निर्माण करत असेल तर ते मुख्यमंत्र्यांसाठीच अडचणीचे आहे. त्यांना अडचणीत आणण्यासाठी तर कोणी हे उद्योग करत नाही ना, याचाही शोध त्यांनीच घेण्याची गरज आहे.

मुंबईमध्ये सर्वत्र बेकायदेशीर पार्किंग, वाटेल तिथे वाटेल तशी केलेली बांधकामे आणि त्यांना महापालिकेच्या छोट्या-मोठ्या अधिकाऱ्यांकडून दिले जाणारे अभय, यामुळे या शहरावर कोणाचेच नियंत्रण उरले नाही. तीन वर्षात १३,११९ म्हणजे रोज ११ ठिकाणी आग लागत असल्याचे आकडेवारी सांगते. ही आकडेवारी केवळ चिंताजनकच नाही तर हे शहर कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे हे सांगणारी आहे. याच गतीने या शहराची वाटचाल होत राहिली तर येणाऱ्या काळात, मोठ्या दुर्घटनेची शक्यता वर्तवण्यासाठी ज्योतिषाची गरज उरणार नाही. आज मुंबईत अशी अनेक ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी आग लागली तर अग्निशामक दलाची गाडी जाऊच शकणार नाही. अरुंद गल्ल्या, दुतर्फा दुचाकींची केलेली वेडी वाकडी पार्किंग, रस्त्यात जागा मिळेल तिथे उभ्या असलेल्या टॅक्सी, मोठ्या इमारतींमध्ये पार्किंग नसल्यामुळे लोकांनी रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने, यामुळे अनेक वेळा अग्निशमन दलाच्या गाड्या आगीच्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. हे वारंवार लक्षात येऊनही यावर उपाय शोधावा असे कोणालाही वाटत नाही.

महापालिकेचा हा असा बेभरवशाचा कारभार सुरू असताना एसआरए मधील गैरकारभारांनी टोक गाठले आहे. मागे एकदा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी म्हाडा आणि ‘एसआरए’ला समुद्रातच बुडवले पाहिजे असे उद्विग्न विधान केले होते. मात्र तो भ्रष्टाचार त्यांच्याही आधीपासून सुरू होता. त्याला आळा घालण्याचे काम तेही करू शकले नाहीत आणि त्यानंतरचे कोणते सरकारही… गोरेगाव मधल्या ज्या इमारतीला आग लागली तिथे पंधरा वर्षापासून पाणी नव्हते. लोक सात मजले चढून पाणी नेत होते. एसआरए मंडळाने या इमारतीला ओसी दिली म्हणजे नेमके काय केले? याची न्यायालयीन यंत्रणेमार्फत चौकशी केली पाहिजे. सात जणांचे बळी गेल्यानंतर आता एसआरएने सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली तर आम्ही दोन दिवसात पाणी देऊ असे महापालिकेचे अधिकारी सांगतात. हे असे सांगणे निर्लज्जपणाचे टोक आहे. पंधरा वर्षे जर लोक पाणी द्या म्हणून सांगत असतील. त्यांना ते दिले जात नसेल तर मूलभूत हक्क नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचेच गुन्हे दाखल केले पाहिजेत. आजही मुंबईत अनेक भागात जाणीवपूर्वक कमी पाणी सोडले जाते. ज्या ठिकाणी मोठे टॉवर्स आहेत तेथे तर मुद्दाम असे होते. नाईलाजाने लोक टँकर मागवतात. टँकर माफिया सुध्दा आमच्याकडूनच पाणी घ्यावे लागेल असे सांगतात. मुंबईत सरासरी वीस ते पंचवीस टक्के पाणी टँकरचेच घ्यावे लागते. लोकांना पाणी मिळत नाही आणि टँकरवाल्यांना पाणी कसे मिळते? इतका साधा प्रश्नही कधी कोणाला विचारावा वाटत नाही.

तत्कालिन आ. नरसय्या आडम मास्तर यांनी विधानसभेत भाषण करताना, मुंबईत फेरीवाल्यांपासून ते छोट्या मोठ्या दुकानदारांपर्यंत वर्षाकाठी १२०० कोटी रुपये हप्त्यापोटी गोळा केले जातात, असा गंभीर आरोप केला होता. त्याला अनेक वर्ष उलटली. त्यानंतर कारवाई झाली की नाही माहित नाही. मात्र ती रक्कम आज दोन हजार कोटी पर्यंत गेल्याचे उघड बोलले जाते. हे शहर ऐतिहासिक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये १०७ हुताम्यांनी बलिदान दिल्यानंतर मुंबई सह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्या मुंबईचे भविष्यात असे हाल होतील हे जर त्या हुतात्म्यांना कळाले असते तर त्यांनी आपले प्राण देताना दहा वेळा विचार केला असता. येणाऱ्या पिढ्यांसाठी हे शहर सुस्थितीत राहावे असे वाटणाऱ्या मूठभर संवेदनशील अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी तरी यात लक्ष घालावे, अन्यथा हे शहर हातातून कधी निसटले कोणालाही कळणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *