शुक्रवार, २६ एप्रिल २०२४
26 April 2024

मनसेला ९ विधानसभा मतदारसंघांत आघाडी

लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत ११ विधानसभांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते

मुंबई, दि. २ – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला अदखलपात्र समजणाऱ्या तमाम राजकीय पक्षांना बुचकळ्यात टाकत मनसेने ९ विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली. एवढेच नव्हे तर ११ विधानसभा मतदारसंघांत या नव्या पक्षाने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत. लोकसभेच्या केवळ १२ जागा लढवणाऱ्या या पक्षाने हे दणदणीत यश मिळवले. त्याच वेळी शिवसेना-भाजपा युतीचा मार्गही कठीण करून ठेवला.

मुंबईत पाच विधानसभा मतदारसंघांत तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघांत या पक्षाने पहिल्या पसंतीची मते मिळवली आहेत. मराठी मतांना मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे वळवून घेत राज ठाकरे यांनी ज्या मुंबईत शिवसेना वाढली त्या मुंबईतच पक्षाच्या अस्तित्वावर घाला घातला. त्यामुळे मुंबईत ३६ विधानसभांपैकी शिवसेनेला केवळ २ विधानसभा मतदारसंघांत तर भाजपाला ५ विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेता आली. मुंबईत मनसेच्या मतदानामुळे मोहन रावले निवडून येतील, असा अंदाज बांधणाऱ्यांनादेखील मनसेने खोटे पाडले. मनसेचे उमेदवार कोण आहेत, याचा विचार न करता लोकांनी राज ठाकरे यांना मतदान करायला पाहिजे, एवढ्या एकाच भावनेने मोठ्या प्रमाणावर मतदान केले आणि ७२ विधानसभा मतदारसंघांमधून या पक्षाने १५,८३,७६७ मते मिळवली. ७२ पैकी ९ विधानसभा मतदारसंघांत पहिल्या पसंतीची तर ११ विधानसभा मतदारसंघांत दुसऱ्या पसंतीची मते मिळवली आहेत.

विधानसभेच्या एकूण २८८ जागांचा विचार करता राज ठाकरे यांच्या मनसेने २५ टक्के (७२ विधानसभा) जागा लढवल्या असे गृहीत धरले तर त्यांना २८ टक्के यश मिळाले असे म्हणता येईल.

राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभेत फारसा चमत्कार घडवून आणणार नाही. पाच-पन्नास हजार मते मिळाली तरी खूप झाली, अशा स्वरूपात या पक्षाची हेटाळणी केली गेली. मात्र, मनसेने १२ पैकी १० लोकसभा मतदारसंघांत प्रत्येकी दीड ते दोन लाखांच्या घरात मते मिळवली.

कोकणात भिवंडी ग्रामीण, कल्याण (पश्चिम) तर मुंबईत मागाठणे, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर (पश्चिम), शिवडी, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक (पश्चिम), देवळाली अशा ९ विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली.

तर डोंबिवली, ठाणे, मुलुंड, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे (पूर्व), वरळी, नाशिक (पूर्व), नाशिक (मध्य), इगतपुरी या ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मनसे आणि राष्ट्रवादीमधील मतांचे अंतर फक्त २२,0३२ एवढे होते. येथे शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. त्यांना केवळ १,५८,२५१ मतांवर समाधान मानावे लागले. याच नाशिकमध्ये नाशिक (पूर्व), नाशिक (मध्य), इगतपुरी या ३ विधानसभा मतदारसंघांत मनसे दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर नाशिक (पश्चिम) आणि देवळाली या दोन ठिकाणी पहिल्या क्रमांकावर.

मुंबईत मनसेच्या सर्व ६ उमेदवारांनी सव्वा लाखाच्या पुढेच मते मिळवली तर भिवंडी आणि मुंबई उत्तर-पूर्वमध्ये मनसेच्या उमेदवारांनी दोन लाखापर्यंतचा पल्ला गाठला.

मराठीचा मुद्दा शिवसेनेचा आहे. तो मनसेने पळवला, असा आक्षेप घेत शिवसेनेने मराठी मतांसह उत्तर भारतीय मतांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे मराठी लोकांनी मनसेला जवळ केले. मनसेला मतदान केल्यामुळे काँग्रेसचा फायदा होतो, असा प्रचार शिवसेनेने सुरू केल्यामुळे आता मतदार पूर्णपणे मनसेच्या बाजूने तरी जातील किंवा शिवसेनेच्या. अशा एका नाजूक वळणावर आज मनसे उभी आहे. एक नवा पक्ष केवळ मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन राज्यभर रान पेटवतो आणि लोकसभेसारख्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त करतो, या एकाच गोष्टीमुळे मनसेचे उमेदवार निवडून न येताही कौतुकाला पात्र ठरले आहेत. याचा फायदा विधानसभा निवडणुकीत मनसेच्या वतीने कसा उचलला जातो, हाही कुतूहलाचा विषय ठरणार आहे. मनसेने किमान दीडशे विधानसभा मतदारसंघांत आपली माणसे उभी केली तर भल्या भल्यांची मती गुंग होईल, अशी आज अवस्था आहे.

ज्या पक्षाला सुरुवातीपासून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपा-शिवसेनेने कायम हेटाळणीच्या स्वरूपात पाहिले. मनसेला पाच-पन्नास हजार मते मिळतील. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. त्यांच्याकडे नेटवर्क नाही, अशा पक्षासोबत कोण उभे राहणार, असा प्रचार केला गेला. तोच पक्ष आज राज्यात प्रत्येकाच्या चर्चेचा विषय बनला आहे. मनसेला गृहीत धरल्याशिवाय असंख्य विधानसभा मतदारसंघांची गणिते पूर्णच होणार नाही, असे आज चित्र आहे.

बसपाने राज्यातील जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. विदर्भवगळता राज्यभर बसपाच्या उमेदवारांनी इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांना उपद्रव होईल, अशी मते मिळवली नाहीत. मात्र, प्रत्येक मतदारसंघात हजारापासून ते ४०-५० हजारांपर्यंतची मते बसपाने मिळवली आहेत. राज्यातील नागपूर उत्तर आणि आहेरी या दोनच विधानसभा मतदारसंघांत या पक्षाने दुसऱ्या क्रमाकांची मते मिळवली आहेत. बाकी सर्व ठिकाणी या पक्षाला यश मिळाले नाही. ज्या हेतूने बसपाने उमेदवार उभे केले किंवा अनेकांनी बसपाचे उमेदवार आपल्याकडे उभे राहावे, यासाठी प्रयत्न केले. तो प्रयत्न कोठेही यशस्वी झाला नाही. मायावतींचे सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रातील मतदारांनी नाकारले. त्याच वेळी प्रकाश आंबेडकर, सुलेखा कुंभारे आणि रामदास आठवले या रिपाइं नेत्यांनाही नाकारून त्या जागी इतर पक्षाच्या उमेदवारांना लोकांना पसंती दिली आहे. बसपाला राज्यात फारसे स्थान मिळाले नाही, ही रिपाइं नेत्यांसाठी आनंदाची आणि त्यांना स्वतला नाकारले, ही दुखाची अशा दोन्ही बाजू या नेत्यांसमोर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *