गुरुवार, २५ एप्रिल २०२४
25 April 2024

शिवसेनेला ६३ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य

मनसेने दमवलेल्या शिवसेनेला विधानसभेचा मार्ग कठीण

मुंबई, दि. १ – लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या त्यात शिवसेनेने ६३ विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे विद्यमान विधानसभेत शिवसेनेचे ६३ च आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला लोकसभेची निवडणूक फायद्याची ठरली नाही. मात्र, संभाव्य नुकसानीची चाहुल या निवडणुकीने दिली आहे.

मराठी मते आपल्यापासून का दुरावली, याचे आत्मचिंतन करावे, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. तो उद्धव ठाकरे यांना मान्य असो किंवा नसो. शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांनी मात्र हा सल्ला चांगलाच मनावर घेतलेला आहे आणि प्रत्येक जण मराठी मतांवर ‘अक्सीर’ इलाज शोधण्याच्या मागे आहे.

शिवसेनेने विदर्भात १७ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळवले आहे. त्याखालोखाल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी १५ विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. मराठवाड्यात १४ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळवणाऱ्या सेनेला मुंबईत मात्र केवळ २ विधानसभा मतदारसंघांवर समाधान मानावे लागले आहे. हा झटका जबरदस्तच म्हणावा लागेल. दुसरीकडे शिवसेनेला लोकसभेत झालेल्या मतदानाचा विचार केला तर शिवसेनेची मतेदेखील ६ लाखांनी कमी झाली आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेने मारलेली मुसंडी ही जमेची बाजू असली तरी जी शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाणार की नाही, याची चर्चा आणि घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिला. त्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अर्थात पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेने १५ विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली, हाही एक योगायोगच. शिवसेना भाजपासोबत राहणार की राष्ट्रवादीसोबत जाणार, या घोळात जबाबदार नेत्यांकडून स्पष्टीकरण आले नाही. त्यामुळे महत्त्वाचे दिवस वाया गेले. भाजपालाही गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच युतीचे शिलेदार खचून गेले. सेना-भाजपा केडरमध्ये मनोमिलन झालेच नाही. बिनीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेकांनी एकमेकांसाठी कामही केले नसल्याची चर्चा आता अनेक कार्यकर्ते खाजगीत सांगतात. या सगळ्यांचा परिणाम शिवसेनेवर झाला.

विदर्भात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जागा शिवसेनेने जिंकल्या. मात्र, रामटेकची जागा त्यांना गमवावी लागली. मुळात रामटेकची जागा पोटनिवडणुकीत शिवसेनेने जिंकली होती; परंतु तगडा उमेदवार न दिल्याने ही जागा पुन्हा काँग्रेसने पळवली. यवतमाळ आणि वाशिमच्या विजयात काँग्रेस नेत्यांची साखरपेरणी झाल्याची चर्चा कार्यकर्ते आजही करत आहेत. विदर्भ सेनेने राखला, भाजपाने गमावला, अशी काहीशी अवस्था विदर्भाची झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही मावळ, शिरुर, शिर्डी या जागा शिवसेनेने जिंकल्या. नाशिकला मात्र शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जबरदस्त फटका बसला. तरीही पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची कामगिरी गेल्या वेळच्या तुलनेने चांगली राहिली आहे. शिवसेनेचे ‘भगवे तुफान’ इचलकरंजी, सातारा या भागात मात्र वावटळीच्याच रूपाने समोर आले.

खानदेशात शिवसेनेची फारशी कामगिरीच नव्हती. उलट भाजपाच्या यशात शिवसेनेच्या सुरेशदादा जैन यांचा मोठा वाटा राहिला. त्याउलट कोकणात शिवसेनेसाठी महत्त्वाची असणारी सुरेश प्रभू यांची जागा त्यांना गमवावी लागली. प्रतिष्ठेची ठाण्याची जागाही शिवसेनेच्या हातून गेली. नाशिक, ठाणे, मध्य मुंबई येथील उमेदवार तुलनेने कच्चे आहेत, अशी चर्चा सुरुवातीपासून होत होती. या तीनही जागा गेल्यामुळे शेवटी ती चर्चा खरी ठरली. या जागांवरील पराभव शिवसेनेची झोप उडवण्यासाठी पुरेसा आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा हिसकावून घेतल्यामुळे तेथे नव्याने व्यूहरचना करण्याची गरज निर्माण झाली आहे.भाजपा-शिवसेनेतील बिघाडीचा फटकाही युतीला बसला. मात्र, मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला नुकसान झाले ते मनसेमुळे.

मराठवाड्यात औरंगाबादची जागा राखताना शिवसेनेला नाकी नऊ आले. एकेकाळी औरंगाबादची जागा, हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे. हा बालेकिल्ला राखताना मात्र शिवसेनेला या वेळी मोठे कष्ट पडले आहेत. औरंगाबाद शहरात शिवसेनेला मताधिक्यच मिळाले नाही. परभणीची जागा जाणार असे म्हणत असताना शिवसेनेने राखली, तर हिंगोलीची जागाही पुन्हा शिवसेनेने मिळवली. मराठवाड्यात उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे होती. मात्र, तेथे सेना-भाजपा नेत्यांत सख्य नव्हते. सेनेचे नेते गाफील राहिले. जागा सहज येईल या आविर्भावात वावरत राहिले. उमरगा, औसा हे मतदारसंघ सेनेकडे असतानाही तेथे अत्यंत कमी मताधिक्य शिवसेनेला मिळाले. औसाहून सेनेचे आमदार दिनकर माने तीन वेळा निवडून आले. मात्र तेथून शिवसेनेला मिळालेले नाममात्र मताधिक्य कशाचे द्योतक मानावे? मराठवाड्यातील सेना नेते काँग्रेसच्या संपर्कात अधिक असतात, ही चर्चाही सेनेला महागात पडली.

शिवसेनेला २८८ पैकी ६३ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले असले तरी शिवसेनेला मुंबईत फारसे यश मिळालेले नाही. मुंबईत १४ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात ११ विधानसभा मतदारसंघांत, मराठवाड्यात ८ विधानसभा मतदारसंघांत, कोकणात १२ विधानसभा मतदारसंघांत आणि विदर्भात ७ विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत.

उद्धव ठाकरे हे एकमेव अस्र शिवसेनेने या निवडणुकीत वापरले. तर मुंबईतील नेते मुंबईतच निष्प्रभ ठरले, असे चित्र या निवडणुकीने उभे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *