रविवार, ३ नोव्हेंबर २०२४
3 November 2024

फॉर्म्युल्यात ८५चे समान ‘चित्र’!
प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!

अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:

जुळणार की तुटणार या क्षणापर्यंत आलेल्या महाविकास आघाडीचे सूर अखेर जुळले. काँग्रेसने १०३ जागा लढवायच्या तर उद्धव ठाकरे शिवसेनेने ९४ आणि शरद पवार गटाने ८४ जागा लढवायच्या असे ठरले. ही बेरीज २८१ होते. उरलेल्या सात जागांपैकी दोन जागा समाजवादी पक्षाला २ जागा तर सीपीआय, सीपीएमसाठी ३ आणि शेकापसाठी २ जागा द्यायचा निर्णय झाला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मविआ नेत्यांनी फॉर्म्युला जाहीर केला. मविआबद्दल चुकीचा संदेश जात असल्याचे शरद पवार यांनी या नेत्यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर समान जागावाटपाचे ८५-८५-८५ असे फॉर्म्युल्याचे ‘चित्र’ बुधवारी पत्र परिषदेत रंगवण्यात आले.

शेवटच्या टप्प्यात वाय. बी. चव्हाण सेंटर येथे खा. शरद पवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. संजय राऊत आणि खा. अनिल देसाई यांच्यात बैठक झाली. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला सतत संपर्कात होतेच. शरद पवार यांनीच खाली जाऊन पत्रकार परिषद घ्या आणि जाहीर करून आघाडीचा निर्णय जाहीर करून टाका असे सांगितले. त्यानंतर पत्रपरिषदेला ही मंडळी सामोरी गेली.

पक्षांच्या मैत्रीनुसार मित्रांना जागा; पडद्याआड जागांची देवाण-घेवाण

आम आदमी पार्टीला काँग्रेसच्या कोट्यातून जागा दिली जाईल, तर सीपीआयला आणखी १ जागा शरद पवार गटातून दिली जाईल. हितेंद्र ठाकूर याची बविआ जर मविआसोबत यायला तयार असेल, तर त्यांना काँग्रेस, उद्धवसेना व शरद पवार गट यांच्या कोट्यातून प्रत्येकी एक जागा दिली जाईल. जे मित्रपक्ष येतील, त्याना तीन प्रमुख पक्षाच्या मैत्रीनुसार जागा दिल्या जातील, उद्धवसेनेने जाहीर केलेल्या यादीतील काही जागी अन्य पक्ष प्रबळ आहेत. जागावाटपात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या जागी उद्धवसेना प्रबळ आहे. आणखी काही जागी बदल होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

८५+८५+८५ = २७० याचीच सोशल मीडियावर चर्चा

मविआच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी जागा वाटप जाहीर करताना तीन पक्षांना ८५-८५- ८५ असे २७० जागांचे वाटप झाल्याचे जाहीर केले, मात्र, याची बेरीज २५५ होत असल्याने सोशल मीडियात याची जोरदार चर्चा रंगली होती. दुसरीकडे ज्या अनिल देसाईच्या सहीने उद्धवसेनेची यादी जाहीर झाली, त्यात चुका असल्याचे राऊत पत्रकार परिषदेत सांगत असताना त्यांच्या मागे अनिल देसाई उभे होते.

असा सुटला जागावाटपाचा तिढा

मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आधी शरद पवार आणि नंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने आघाडी तोडायची का? असाही उद्विग्न सवाल नाराज उद्धव ठाकरे यांनी केला होता. या प्रकरणात राहुल गांधी यानी दोन वेळा उद्धव ठाकरे याच्याशी संवाद साधला, त्यातून संवादाचे दरवाजे खुले झाले. आपल्याला महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे त्यासाठी एक दिलाने सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ असा सूर काँग्रेसने लावला. उद्धव ठाकरे यानीही त्यास होकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *