सोमवार, १४ ऑक्टोबर २०२४
14 October 2024

मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा?
मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार

मुंबई डायरी/अतुल कुलकर्णी

मुंबईत संख्येने सर्वांत जास्त असणाऱ्या मराठी मतांची विभागणी अटळ दिसत आहे. ही मते कोणाच्या बाजूने झुकतात? कोणता उमेदवार अन्य समाजाची किती मते मिळवतो, यावर मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांचा खेळ अवलंबून आहे. मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांत मिळून ९६,५३,१०० एवढे मतदान आहे. त्यात मराठी मतांची संख्या ३६,३०,६०० च्या घरात आहे. मराठी टक्का आपल्याला मिळावा यासाठी कधी नव्हे ते सर्वधर्म समभाव हे मुंबईचे स्पिरीट निवडणुकीच्या निमित्ताने जोमाने पुढे आले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांत विभागली गेली. दोघांचेही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. मनसेचे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवाय काँग्रेसची स्वतःची पारंपरिक मराठी मते आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये मराठीमध्ये विभागली जातील असा तर्क दिला जात आहे. त्याशिवाय संख्येने दुसऱ्या क्रमांकावर असणारी मुस्लिम समाजाची मते यावेळी कोणाच्या बाजूने झुकतील हा देखील मुंबईमध्ये प्रचंड चर्चेचा विषय आहे. मतांची अशी विभागणी होत नाही असे काही नेत्यांचे मत आहे. त्यासाठी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर या दोन मतदारसंघांचा दाखला दिला.

मुंबई उत्तर पूर्वमध्ये भाजपच्या तिकिटावर मनोज कोटक निवडून आले होते. या मतदारसंघात ४५% म्हणजे ७,२६,५०० मराठी, तर २,१०,६०० गुजराती मते आहेत. याच मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे २,७३,२०० एवढी मते मुस्लिम समाजाची असताना मनोज कोटक यांना ५,१४,५९९ मते मिळाली होती. कोटक यांनी २,२६,४८६ मतांची आघाडी घेतली होती. त्या ठिकाणी संजय दिना पाटील हे मराठी उमेदवार असताना त्यांना फक्त २,८८,११३ मते मिळाली होती.

दुसरे उदाहरण मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे दिले जाते. या मतदारसंघात ३३ टक्के म्हणजे ५,५०,७०० एवढे मराठी मतदार आहेत. तर त्याखालोखाल २८ टक्के म्हणजे ४,८६,९०० मते गुजराती राजस्थानी समाजाची आणि १,१८,३०० साउथ इंडियन मतदार आहेत. असे असले तरी जन्माने मुंबईकर असणाऱ्या गोपाळ शेट्टी यांना तब्बल ७,०६,६८७ एवढी मते मिळाली. त्यांचे मताधिक्य ४,६५,२४७ हे मुंबईच्या सर्व लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक होते. त्यांनी मराठी मुलगी ऊर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता.

मात्र, हे दोन्ही दाखले खोडून काढणारी आकडेवारी मुंबईतच असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. मुंबई उत्तर पश्चिममध्ये ३५ टक्के म्हणजे ६,०२,४०० एवढी मराठी मते आहेत. २१% म्हणजे ३,६४,९०० इतकी उत्तर भारतीय आणि त्या खालोखाल २०% म्हणजे ३,१८,८०० मुस्लिम मते असताना या मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना ५,७०,०६३ म्हणजे ६१ टक्के मते मिळाली होती. येथे संजय निरुपम काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना फक्त ३,०९,७३५ म्हणजे ३३ टक्के मते मिळाली होती.

आकडेवारी काहीही असली तरी प्रत्येक वेळी होणारी निवडणूक वेगळी असते त्या-त्या वेळी मतदारांचे सेंटीमेंट वेगळे असते. यावेळी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती या वादाची सुरुवात कधीच झाली आहे. हा वाद निवडणुकीच्या तोंडावर किती वाढतो किंवा किती नियंत्रणात आणला जातो यावर मुंबईतल्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

…म्हणून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर

मराठी टक्का आपल्या बाजूने वळावा यासाठी प्रत्येक उमेदवार कसोशीने प्रयत्न करीत आहेत. भाजप ठाकरे गट किंवा शिंदे गटाचे उमेदवार मुंबईत शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला जाऊन अभिवादन करतात. तेथून जवळच असलेल्या शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीला जातात. माध्यमांचा मुक्काम शिवतीर्थावर असतो. राज ठाकरेंनी आमच्या मतदारसंघात सभा घेतली तर चांगलेच आहे, असे बाईट माध्यमांना दिले जातात. हे सगळे मराठी मतांसाठी चालू असले तरी या निवडणुकीत मराठी मतांची फूट अटळ असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *