
लग्न करून एकत्र राहायचं की लिव्ह इन रिलेशन मध्येच बरे आहे..?
अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई
आजच्या तरुण पिढीने काही प्रमाणात का असेना लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा मार्ग स्वीकारलेला दिसत आहे. आजच हे घडत आहे असे नाही, तर गेल्या दहा वर्षात हा प्रकार वाढीस लागला. पूर्वी मोठे कुटुंब असायचे. सगळे एकत्र राहायचे. नोकरीमुळे कुटुंब विभक्त होत गेले. वेगळे राहणारे दोघे नोकरी करू लागले. पुढे न्यूक्लिअर फॅमिली ही संकल्पना आली. ‘हम दो हमारा एक’ इथपर्यंत असणारी मानसिकता बदलून आता आम्हाला मुलच नको इथपर्यंत पुढे गेली आहे. लग्न करून ४० वर्ष भांड्याला भांडे वाजवत संसार करणारे नवरा बायको जास्त सुखी असतात की एकमेकांसोबत राहून बघू… जमले तर एकत्र राहू… नाही तर वेगवेगळ्या मार्गाने जाऊ असे म्हणणारे सुखी असतात..? हा प्रश्न आता सर्वत्र ऐकायला मिळतो. या प्रश्नावर अनेक जण आपापल्या परीने उत्तर शोधण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
हाच विषय हसत खेळत गोष्टी रूपाने ‘आमने-सामने’ या नाटकातून आपल्या भेटीला येतो. कोविडच्या पार्श्वभूमीवर हे नाटक रंगभूमीवर आले. २०२० मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर न्यू नॉर्मल हा शब्द नॉर्मल होईपर्यंत २०२१ उजाडले. त्यालाही आता चार साडेचार वर्षे झाली. महिने आणि वर्ष या मोजपट्टीवर हे नाटक जुने वाटत असले तरी नाटकाचा विषय, त्याची मांडणी आणि सादरीकरण अगदी काल परवा कोणाच्याही घरात घडणाऱ्या गोष्टी इतके ताजे टवटवीत आहे.
नुकतेच या नाटकाचा ३५० वा प्रयोग पार्ल्यातल्या दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झाला. वाक्या वाक्याला मिळणाऱ्या टाळ्या, हंशा आणि जाता जाता डोळ्याच्या कडा ओलावणारा शेवट असणारे हे नाटक अनेक गोष्टींमुळे दीर्घकाळ लक्षात राहील. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुण जोडप्याच्या आयुष्यात घडणारे प्रसंग पहिल्या अंकात आणि त्याच घटनांची दुसरी बाजू लग्न करून चाळीस वर्षे होत आलेल्या नवरा बायकोच्या आयुष्यात कशी घडत होती हा या नाटकाचा विषय. पहिला अंक बघताना आपल्याला तरुण जोडप्यांचे म्हणणे पटत जाते. मात्र दुसरा अंक बघताना आपण नेमके कुठे आहोत, हा प्रश्न आपल्याला पडत जातो…
नाटकाची मांडणी वेगळी. त्यामुळे पहिल्या क्षणापासून आपण त्या नाटकाचा एक भाग होतो. लीना भागवत ज्या सहजतेने प्रेक्षकांना बोटाला धरून स्टेजवर घेऊन जातात आणि पुढचे अडीच तास आपणच त्या नाटकाचा भाग आहोत की काय अशी भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतात ती अफलातून. लीना भागवत – मंगेश कदम यांचे संवाद एका बाजूला तर रोहन गुजर – केतकी विलास ही तरुण जोडी दुसऱ्या बाजूला आणि मध्ये प्रेक्षक असा हा सामना प्रत्येकाला जेवढा हसवणारा होता तेवढाच अंतर्मुख करणाराही. खूप दुःख, वेदना वाट्याला आलेली व्यक्ती ते कोणाला कळू नये म्हणून स्वतःच्या वागण्या बोलण्यातून, हसण्यातून आपण किती आनंदात जगत आहोत हे दाखवण्यासाठी जो आटापिटा करते तो लीना भागवत यांनी विलक्षण ताकदीने सादर केला आहे.
लग्नाचा ३९ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या जोडप्याचा लग्न करून परदेशात गेलेल्या मुलगा घटस्फोट घेतो. त्याचवेळी त्यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या लिव्ह इन रिलेशनवाल्या जोडीचे बिनसते… आणि हे सुरू असताना लग्नाला ३९ वर्षे झाली पण आपला संसार सुखाचा झालाच नाही अशी जाणीव या दोघांना होते..! तीन पातळ्यांवर घडणाऱ्या घटना प्रेक्षकांसमोर तीन वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी मांडतात त्यावेळी आपण नेमके कोणत्या जोडीच्या बाजूने आहोत हा प्रश्न उपस्थित प्रेक्षकाला पडतो. तरुण जोडप्याचे बरोबर आहे की लग्न करून एकत्र राहणाऱ्या जोडप्यांचे थोडे चुकले थोडे बरोबर आहे…? या डायलेमात असणारा तरुण प्रेक्षक स्वतःला दोघांच्या मध्ये पहातो. तर स्वतःच्या लग्नाला २५/३० वर्षे उलटून गेलेला प्रेक्षक मनातल्या मनात आपल्या आयुष्यातल्या बेरीज वजाबाकी मध्ये हरवून जातो. लग्नानंतर बायकोचे नाव बदलून तुम्ही क्षणात माझी ओळखच नष्ट करून टाकली असा सवाल जेव्हा नाटकातली नीलिमा आपल्या नवऱ्याला विचारते तेव्हा तो प्रश्न प्रेक्षकांमध्ये ज्या ज्या नवऱ्याने आपली बायकोचे नाव बदलले त्या सगळ्यांना पडला नसेल तर नवल… लग्नानंतर मला पंजाबी ड्रेस घालायचा होता पण तुम्ही कधी घालूच दिला नाही असं म्हणणारी नीलिमा आणि ३९ व्या वर्षी तिला पंजाबी ड्रेस भेट देणारा अनंत आपल्यात तर नाही ना असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.
पण इतक्या वरवरच्या उदाहरणांमधून हे नाटक तुम्हाला जज करता येत नाही. संसारात वाद होत असले तरी एकमेकांशी तडजोड करत आयुष्य जगायचे… की भांडण झाल्यामुळे ३०/४० वर्षाचा संसार सोडून निघून जायचे… की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये पटेल तितके दिवस रहायचे, नाही पटले तर सोडून जायचे… यातला कोणता मार्ग बरोबर आहे? हा प्रश्न हे नाटक संपल्यानंतर तुमच्या सोबत तुमच्या घरात येतो… ही ताकद लेखक, दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांची आहे. मात्र या सगळ्यांच्या पुढे जाऊन मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या अभिनयाची जास्त आहे.
या नाटकाचे ३५० प्रयोग झाले. ते आणखी व्हायला हवेत. ज्यांना बिना लग्नाचे एकत्र राहायचे आहे किंवा ज्यांना लग्न करून एकत्र राहायचे आहे अथवा ज्यांना झालेले लग्न टिकवता आलेले नाही अशा प्रत्येकासाठीचे हे नाटक आहे.
जाता जाता : ३५० व्या प्रयोगाच्या दिवशी लीना भागवत यांच्या घशाला त्रास सुरू झाला प्रयोग होईल की नाही अशी भीती निर्माण झाली त्यावेळी त्यांनी स्टेरॉईड घेऊन प्रयोग केला. प्रयोगाच्या शेवटी ही गोष्ट कोणाच्यातरी बोलण्यातून समजली. जर ती सांगितली गेली नसती तर असे काही झाल्याचेही कोणाला कळाले नसते. त्यासाठी लीना भागवत यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
Comments