खवैय्यानों… मासे खायचे की
शाकाहारी थाळी…?
– अतुल कुलकर्णी, मुंबई
मासे हा काही अस्मादिकांच्या आवडीचा प्रांत नाही. कारण एकच त्यांचा येणारा वास. मात्र काही मित्रांनी आग्रहाने गोव्यात एका ‘कोकणी केन्टीन’ नावाच्या हॉटेलात नेले. हे एक धमाल हॉटेल आहे. पणजीत दादा वैद्य रोडवर. महालक्ष्मी मंदिराजवळ. जुन्या पध्दतीचे बांधकाम, बाहेरुन पहाल तर अत्यंत वेगळा लूक देणारे. आत गेल्यानंतरही त्याच्या वेगळेपणाची साक्ष तुम्हाला प्रत्येकठिकाणी दिसत रहाते. आतली मांडणी, सजावट अत्यंत सुरेख..! प्रत्येक टेबलवर शाकाहारी किंवा मांसाहारी थाळीशी निकराचा लढा देणारे खवय्ये. कोणत्याही स्थितीत थाळीसोबतचे युध्द जिंकायचेच या इराद्याने टेबलावर उतरलेले..!
आम्हा मित्रांनाही तेथे थाळी युध्दाचे आमंत्रण आले पण मासे नाही आवडले तर शाकाहारी थाळी आहे या आधारावर मी तेथे गेलो. आत जाताच माश्यांचा टिपीकल वास येईल असे वाटत असताना आतला प्रसंग पाहून आपण जणू एखाद्या युध्दभूमीवर आलोय की काय असे दृष्य पाहून इथे काहीतरी नक्की वेगळे घडणार याचा अंदाज आला. फेसाळ बियर आणि सोबतीला मशरुम, वांगी, बटाट्याचे काप मसाला आणि रवा लावून मस्त तळून काढलेले. रव्याचे कोटींग फक्त माश्यांनाच करतात एवढेच आपले ज्ञान. मात्र इथे रवा लावून तळलेले हे पदार्थ पाहून आता चिकनही रवा लावलेले येते की काय असे वाटत असताना ते मात्र एकदम खास कोकणी स्टाईलीत आले. इथे कोंकणी असे नाकातून म्हणायचे… तरच म्हणे त्याची चव कळते..!
काही वेळाने छोटे मासे स्वागताला आले. भज्यांच्या रुपात. एकाबाजूचा तुकडा काढला की आतला लांब लचक मोराच्या पिसाऱ्यासारखा काट्यांचा पिसारा बाहेर येतो. तो खाल्लातरी चालतो म्हणे. मी तसेच बरेच पिसारे प्लेटच्या बाजूला सजवून ठेवले. बाकीचे… नंतर आला पापलेट. तो ही एकदम धमाल. जणू ताज्या ताज्या सोललेल्या कोवळ्या शहाळ्याचा गरच खातोय…
काही वेळाचे हॉटेलचे ओनर गिरीष देसाई आले. मूळचे गोव्याचे. मस्त, गप्पीष्ट माणूस. मनापासून बोलणारा. शिवाय माश्यांविषयी प्रचंड अभ्यास असणारा. आपले माश्यांचे ज्ञान जास्ती आहे दाखवण्यासाठी त्यांना म्हणालो, तुमचे पापलेट एकदम फ्रेश होते… त्यावर ते मस्त हसले. आणि हळूच आमची दांडी उडवत म्हणाले, साहेब, कोणताही मासा फ्रेश नसतोच… आणि मग सुरु झाला आमचा मासे आणि त्यांचा प्रवास यावरचा विशेष क्लास…
देसाई गुरुजी कथन करते झाले… समुद्रात खूप आत गेल्यानंतरच चांगले मासे मिळतात आणि ते किनाऱ्यावर आणेपर्यंत चार दिवस जातात. पण मासे पकडण्याची एक पध्दत असते. मोठे ट्रॉलर जेव्हा ‘डीप सी’ मध्ये जातात आणि मासे पकडले जातात तेव्हा ते लगेच त्याच ट्रॉलरच्या तळाशी असणाऱ्या मायनस ४० डिग्री तापमानात सोडले जातात. त्यामुळे ते एकदम लाकडासारखे होतात. किनाऱ्यावर आल्यानंतर ते दुसऱ्या तशाच एसी कन्टेनरमध्ये टाकले जातात. तेथून ते हॉटेलात आणल्यानंतरही त्यांचे तापमान मेन्टेन केले जाते. जेव्हा मासे करायचे असतात त्याच्या आधल्या रात्री ते आपल्या सामान्य फ्रीजमध्ये ठेवले जातात आणि करायच्यावेळी त्यांना साफ करुन मसाले लावून लगेच तंदूरमध्ये किंवा तेलात टाकले जातात. त्यामुळे ते तुम्हाला फ्रेश वाटतात…!
आता पुढे काही बोलण्याची आमची हिंमत नव्हती. थोड्यावेळाने शुध्द शाकाहारी थाळी आली. त्यात एक अगदी छोटी वाटी होती. हे काय असे विचारले तर ते म्हणाले, ही सोलकढी. आम्हाला नारळाचे दूध टाकलेली, गुलाबी रंगाची सोलकढीच माहिती. पण ही एवढीशी सोलकढी पाहून म्हणालो, एवढीच. त्यावर आमचा सोलकढीचा ही एक छोटा तास झाला. एक वाटी आघळ (कोवळ्या अमसुलाचा रस) घ्यायचे. त्यात दोन वाटी पाणी टाकायचे. एक दोन हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथींबीर दगडी खलबत्त्यात रगडून त्यात टाकायची. चिमूटभर हिंग, चवीपुरते मिठ, साखर टाकायची. झाली सोलकढी तयार. एक घोट घेऊन बघा… वाटल्यास नंतर वाचत बसा हे…
पुढे त्यांनी आणखी एक उपयोग सांगितला. म्हणाले, आघळ घ्यायचे, त्यात पुदिन्याची पाने, लिंबू रगडून टाकायचा. एक पेग व्होडका टाकायचा आणि सोड्याचे ग्लास भरायचा…. थांबा, लगेच वाचायचे सोडून देऊ नका…
तर मंडळी, या व्हेज थाळीत टोमॅटोचे सार होते, भेंडीची भाजी होती, कोंकणी थाटाचे वरण आणि मध्यभागी भात होता. त्याचे काय झाले असेल हे सांगायला हवे का…? नंतर आले डेझर्ट. दूधापासून बनवलेले, त्याचे नाव शेरादुरा..! हे कशाचे आणि कसे हे त्यांना विचारण्यात वेळ घालवण्यापेक्षा आम्ही ते दोन वेळा खाऊन बघीतले. आपल्याला घरी जमते का यासाठी… पण परत तेथेच जावे लागेल या निष्कर्षाप्रत आमच्या सौ पोहोचल्या आहे…
तुम्हाला तेथे जावे वाटले तर गिरीष देसाईंची परवानगी न घेता त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला म्हणून देतो, कोणाला सांगू नका… ९९२१०२५०५० तेव्हा येथे दिलेले फोटो पहा आणि गोव्याला जाऊन या…
– अतुल कुलकर्णी
संपादक, लोकमत, मुंबई
९८६७५२१०२२
Comments