शनिवार, ७ डिसेंबर २०२४
7 December 2024

पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ?

अधूनमधून / अतुल कुलकर्णी

दादा, भाऊ, काका, मामा

नमस्कार

विधानसभेच्या निवडणुकीची गडबड सुरू झाली असेल. आपल्या पक्षात नेमके काय सुरू आहे..? प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः… या ब्रीदवाक्यावर काम करणारा आपला पक्ष सध्या कोणत्या चक्रव्यूहात अडकला आहे..? वर्षानुवर्षे जे आपल्या पक्षात सतरंज्या उचलण्यापासून कष्ट करत होते ते आपल्याला अचानक नावडतीचे झाले… पक्ष वाढीसाठी मदत होईल म्हणून ज्यांना आपण आपल्या पक्षात घेतले त्यांनाच आता आपला पक्ष नकोसा झाला आहे… ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत… असे असेल तर याचसाठी केला होता का अट्टाहास…? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. संघाच्या संस्कारातून, मुशीतून तयार झालेल्या आपल्या पक्षाचे जुने जाणते नेते, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. ज्या अजित पवार यांच्या विरोधात आपल्याकडे गाडीभर पुरावे असल्याचे आपण सांगितले. ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, ते अचानक आपल्या पक्षात आले आणि असे कसे पवित्र झाले..? हे अनेकांना अजूनही रुचलेले नाही… पटलेले नाही.

यात भर म्हणून की काय, नुकतीच सरकारने अजितदादा समर्थकांच्या पाच साखर कारखान्यांना ८०८ कोटी रुपयांची थकहमी दिली. तिथेही भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना ७८२ कोटी रुपयांची थकहमी मिळाली. हे तर एक उदाहरण झाले. अजितदादा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आहेत. त्यांच्या गटाच्या नेत्यांना ज्या पद्धतीने आर्थिक रसद पुरवणे सुरू आहे ते पाहिले तर आपल्या पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी या पुढेही सतरंज्याच उचलण्याचे काम करायचे का ? हा प्रश्न आता प्रत्येक जण एकमेकांना विचारत आहे… आपल्या पक्षाचे मूळ नेते, कार्यकर्ते कोण? आणि बाहेरून आपल्या पक्षात आलेले नेते, कार्यकर्ते कोण अशी विभागणी केली तर बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त तर दिसणार नाही ना..? मनात आलेला प्रश्न विचारून टाकलेला बरा म्हणून विचारले…

गेल्या काही दिवसांपासून आपल्या पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्रभाऊ यांच्याविरुद्ध जे वातावरण रंगवणे सुरू आहे ते आपल्याला पटते का..? पटत नसेल तर त्याचा विरोध करण्यासाठी आपल्या पक्षातले किती नेते मैदानात उतरतात..? प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ असे दोन-तीन नेते सोडले तर आपल्या पक्षातले अन्य नेते गेले तरी कुठे..? देवेंद्रभाऊ संयमाने एकटे लढताना दिसतात; पण त्यांना आपल्याच पक्षातून म्हणावी तशी रसद पुरवायची नाही असे काही धोरण ठरले आहे का..? आजही राज्यात आपल्या पक्षात अनेक महत्त्वाचे नेते आहेत; मात्र देवेंद्रभाऊंच्या बचावासाठी ते कधीही आक्रमकपणे पुढे आल्याचे चित्र दिसलेले नाही… अधिवेशनाच्या काळात आपल्याच पक्षाच्या आमदारांसाठी जेवणाचे डबे आणणारे आपले नेते गेले कुठे..? देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री असताना त्यांच्या नुसत्या इशाऱ्यावर सभागृह दणाणून सोडणारे नेते गेले कुठे..? त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला जशास तसे उत्तर देण्याच्या स्पर्धेत अग्रभागी असणारे नेते गेले तरी कुठे..? देवेंद्रभाऊंना वगळून महाराष्ट्रात निवडणूक लढवणे सोपे आहे असे भाजपच्या कोणत्या ज्येष्ठ नेत्यांना वाटत असावे..? येणारी विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली होणार यासाठीच्या बातम्या दिल्लीतून कोण पसरवत आहे..? कोणाला त्याची एवढी घाई झाली आहे…? भाजपने कोणत्याही राज्यात निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आजवर कधी जाहीर केला नव्हता; मात्र महाराष्ट्रातच अशी चर्चा का सुरू झाली..?

ज्या नेत्यांना अन्य पक्षातून आयात केले त्यांनी मूळ भाजप मधल्या नेत्यांनाच संपवण्याचे प्रयत्न केल्याच्या बातम्या कशा आल्या ? काही ठिकाणी तर मूळ भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत आयात नेत्यांची मजल गेली हे खरे आहे का ? त्यावेळी कोणाला काही का बोलावे वाटले नाही ? अन्य पक्षातून आलेल्या आमदारांना जास्त निधी गेला दिला गेला. मूळ भाजपमध्ये असणाऱ्या नेत्यांना तुलनेने कमी निधी मिळाला, ही चर्चा का सुरू झाली..? कोणत्या नेत्यांना किती निधी मिळाला याचा ताळेबंद कधीतरी मांडला पाहिजे का ?

प्रश्न खूप आहेत मात्र देवेंद्रभाऊ सारखा सुसंस्कृत नेता अचानकपणे असा अनेक प्रश्नांनी का घेरला जातो ? याचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न ते स्वतः करत असतीलच… पण पक्षातल्या मूळ नेत्यांनीही याचा कधीतरी विचार केला पाहिजे, असे संघाचे एक नेते सांगत होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना लपली नाही. आपण सुज्ञ आहात. यावर नक्की विचार कराल ही खात्री आहे.

आपलाच

बाबूराव

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *