रविवार, ३ नोव्हेंबर २०२४
3 November 2024

कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!

 

अधूनमधून/अतुल कुलकर्णी

तमाम सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते, नेत्यांना तिकिटासाठी तर कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्यासाठी शुभेच्छा. नेत्यांना हव्या त्या पक्षाचे तिकीट तर कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्याचे बळ मिळो. सुगीचे दिवस आले आहेत हे विसरू नका. लहानपणी आपली आई, आजी पाळणा म्हणायच्या. तो काळ साने गुरुजींचा होता. आता नाणे गुरुजींचा काळ आला आहे. त्यामुळे आता कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!

असे म्हणत सर्वपक्षीय पक्षांतर मोहिमा सुरू झाल्या आहेत. त्यात उत्साहाने सहभागी व्हा… ज्यांना भाजपमध्ये गेल्यामुळे शांत झोप लागत होती अशा हर्षवर्धन पाटील यांनी आपली झोप पणाला लावून शरद पवारांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. एकेकाळी नारायण राणे यांचे अत्यंत जिवलग असणारे राजन तेली यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांना अचानक कोकणातल्या घरी पहाटे पहाटे स्वप्न पडले. कविवर्य सुरेश भटांच्या ओळी…

पहाटे पहाटे मला जाग आली ठाकरेंना सोडल्याची खंत तीव्र झाली अशा पद्धतीने स्वप्नात ऐकू आल्या. आपण ठाकरे यांना सोडून फार मोठी चूक केली, या जाणीवेने ते सैरभैर झाले. या गाण्यापाठोपाठ नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव घराणेशाहीचाच पुरस्कार करणारे असल्याचा साक्षात्कारही त्यांना पहाटेच झाला. त्यामुळे त्यांनी सावंतवाडी सोडून थेट मातोश्री गाठली. समरजीत घाटगे भाजपमधून शरद पवारांच्या गटात, दीपक चव्हाण, बबनदादा शिंदे, सतीश चव्हाण, भाग्यश्री आत्राम हे अजित पवारांकडे गेलेले नेते पुन्हा शरद पवारांकडे तर, अभिजीत पाटील आणि लक्ष्मण ढोबळे या दोन भाजपवासी नेत्यांनी बारामतीच्या रस्त्यावरून गाडी चालवता येईल का, याची टेस्ट सुरू केली आहे. सुरेश बनकर यांनी कमळ सोडून मशाल हाती घ्यायचे ठरवले आहे.

जसजसे सगळे पक्ष आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म देऊ लागतील तसतसा घाऊक पक्षांतर मोहिमेला वेग येणार आहे. हे असे घाऊक पक्षांतर करताना काही नेत्यांनी अंतर्गत हातमिळवणी केली ती धमाल आहे. मराठवाड्यातील आ. सतीश चव्हाण यांच्याकडे काही दिवसांपूर्वी अजित पवार, सुनील तटकरे जेवायला गेले होते. त्याच सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार गटाने त्यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी केली. पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे त्यांची आमदारकी शाबूत राहिली आहे. चुकून या निवडणुकीत पराभव झालाच तर आमदारकी जाणार नाही याची व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे.

रामराजे निंबाळकर पडद्यामागे राहून मोठ्या पवारांची तुतारी वाजवण्याची प्रॅक्टिस करत आहेत. बड्याबड्या नेत्यांचीच दिशा अजून स्पष्ट होत नाही, तिथे तुम्हा कार्यकर्त्यांचे काय घेऊन बसलात… तुम्ही कार्यकर्ते आमटीत टाकलेल्या कडीपत्त्यासारखे. जेवण करणारा सगळ्यात आधी आमटीतल्या किंवा भाजीतल्या कडीपत्त्याची पाने वेचून वेचून बाजूला काढून टाकतो. पुढे त्या कडीपत्त्याच्या पानांचे काय होते, हे कोणी विचारायला जात नाही. तुम्हा कार्यकर्त्यांची अवस्था यापेक्षा वेगळी काय असते..? त्यामुळे कार्यकर्त्यांनो, तुम्ही आता सतरांज्या टाकायला, गर्दी जमा करायला लागा… आपले नेते कोणत्या ना कोणत्या पक्षाचे तिकीट १०० टक्के आणतीलच. आपण फक्त आपले नेते ज्या पक्षाचे तिकीट आणतील त्या पक्षाचा विजय असो अशा घोषणा देण्याची प्रॅक्टिस सुरू करायची.

कधी एखाद्या नेत्याने स्वतःची इच्छा बाजूला ठेवून हाडाच्या कार्यकर्त्याला पुढे केले आहे का..? असे एकही उदाहरण महाराष्ट्रात सापडणार नाही. कार्यकर्त्यांना जर खरोखर स्वतःची ताकद दाखवून द्यायची असेल तर त्यांनी जोरदारपणे घाऊक पक्षांतर मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. आपले आयुष्य सतरंज्या उचलण्यासाठी आणि अमुक तमुक नेत्याचा विजय असो, अशा घोषणा देण्यासाठी झाला आहे. दिलेले काम इमानेइतबारे करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे हे पक्के लक्षात ठेवा.

वाऱ्याची दिशा पाखरांना आणि नेत्यांनाच तातडीने कळते. त्यामुळे कुठल्या झाडावर बसलो तर आपण सुरक्षित राहू याचा अंदाज तुम्हा नेत्यांना बरोबर येतो. असा अंदाज येण्यासाठी दोन पाच पदव्या तुमच्याकडे असाव्यात असा कुठलाही निकष नाही. मनगटात जोर असणारा, शेकडो कार्यकर्ते जमा करणारा, समोर एक बोलून पाठीमागे दुसरेच बोलणारा, ज्या नेत्यांसोबत अनेक वर्ष काढली त्यांना सोडून क्षणार्धात दुसऱ्या नेत्याचा पदर पकडणारा असा हरहुन्नरी नेता म्हणून पुढे येऊ शकतो. अर्थात हे निकष आपल्याकडे आहेत म्हणूनच आपण कधीही, कुठल्याही पक्षातून, कुठल्याही पक्षात जाऊ शकता. परक्या प्रवेशाची सवय आपल्या एवढी अन्य कोणाला असेल..?

मुख्यमंत्री कोणाचा यावरूनही चर्चा सुरू आहे. त्याचीही तुम्ही काळजी करू नका. २०१९ ला जेवढे आमदार निवडून आले, त्या सगळ्यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशी दोन्ही कामे याच परक्या प्रवेशाच्या बळावर निभावण्याचे महान कार्य केले आहे. आजपर्यंत कुठल्याही विधानसभेत निवडून आलेल्या सर्व पक्षांच्या आमदारांना सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसायला मिळण्याचा असा दुग्धशर्करा योग याआधी कधीही आलेला नव्हता. जनतेने कोणालाही निवडून दिले तरीही निवडणुकीनंतर आपण कोणत्याही पक्षात जाऊन सत्ता सोपानाचा मार्ग जवळ करण्यात यशस्वी व्हाल, याबद्दल आमच्या मनात तीळमात्र शंका नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

– तुमचाच बाबूराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *