सोमवार, २२ जुलै २०२४
22 July 2024

दादा रुसले की हवं ते मिळतं… आपण रुसून बसलो तर…?

अधून मधून / अतुल कुलकर्णी 

 

दादा,
वंदे मातरम्
दादा, तुम्ही हट्ट केलात, किंवा रुसून बसलात की तुम्हाला जे हवं ते मिळतं… हा आता उभ्या महाराष्ट्राला माहीत झालेला मंत्र आहे. किंबहुना एखादी गोष्ट मिळवून घ्यायची असेल तर कोणत्या पद्धतीचा हट्ट किंवा रुसवा धरावा लागतो, हे देखील तुम्ही दाखवून दिले आहे. मागे जलसंपदा खात्यावर आरोप झाले. तेव्हा तुम्ही कोणालाही न विचारता खटकन राजीनामा दिला आणि झटकन मंत्रालय सोडून निघून गेलात. चौकशीतून संपूर्ण निर्दोष मुक्त झाल्याशिवाय पुन्हा मंत्रीपद घेणार नाही असे आपण म्हणालात. काकांपासून ताईपर्यंत सगळे तुमचे मन परिवर्तन करायला धावले. जलसंपदा विभागाच्या चौकशीचे पुढे काय झाले माहिती नाही? मात्र तुम्ही पुन्हा उपमुख्यमंत्री झालात… एकदा काकांना ईडीची नोटीस आली. तेव्हा देखील आपण आमदारकीचा राजीनामा दिला होता. माझ्यामुळे काकांना त्रास झाला. आपण राजकारण सोडून शेती करू, असे पत्रकार परिषदेत म्हणताना आपण भावनिक झाला होता. मात्र पुन्हा सगळ्यांनी आपली समजूत काढली… आणि आपण आमदारकीचा राजीनामा परत घेत राजकारणात सक्रिय झालात. महाविकास आघाडीचे सरकार जन्माला यायच्या आधी, आपण पहाटेच्या वेळी शपथविधी घेतला. अवघा महाराष्ट्र साखर झोपेत असताना आपल्या पहाटेच्या शपथविधीने तो खडबडून जागा झाला. त्यानंतर पुन्हा सगळे आपल्याकडे समजूत काढायला धावले. काकींनी देखील त्यावेळी आपली समजूत काढल्याच्या बातम्या आल्या होत्या… आणि झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत आपण पुन्हा काकांचा मान ठेवत परत आलात… राज्याचे उपमुख्यमंत्री झालात..!

परवा आपण असेच रुसून बसलात. त्याच्या बातम्या आल्या. लगेच मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री दिल्लीला धावले. रात्रीतून परतही आले. दुसऱ्या दिवशी आपल्याला पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं… आपल्या इतर सहकाऱ्यांना देखील जी हवी होती ती पालकमंत्री पदं मिळाली… पुराण काळापासून स्त्री हट्ट सगळ्यांना माहिती आहे. मात्र रुसण्याचा, न बोलण्याचा हट्ट शस्त्र म्हणून वापरता येतो हे आपणच उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. महात्मा गांधींचे अहिंसेचे शस्त्र देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे ठरले..! आपला हा रुसवा हट्ट आपल्याला दरवेळी काही ना काही देत गेला आहे..! ही तुलना नाही, मात्र सहज सुचलं म्हणून सांगून टाकलं…

कालच चाळीस आमदारांच्या गटाचे काही आमदार भेटले. ते आपल्या या हट्ट शस्त्राचे भलतेच फॅन झाले आहेत, असे त्यांच्या बोलण्यावरून जाणवले. ते म्हणत होते, आपणही ठाण्याच्या दरबारात कैफियत मांडण्यासाठी असाच हट्ट धरला पाहिजे. म्हणजे आपल्यालाही मंत्रीपद आणि महामंडळ मिळतील. या सगळ्यांचे नेतृत्व रायगडचे भरतशेठ गोगावले करत होते. त्यांनी तर किती प्रकारे हट्ट धरता येऊ शकतात याची यादीच बनवली होती. छत्रपती संभाजीनगरचे संजय शिरसाट मंत्रिपद मिळवण्यासाठी जालीम हट्ट शोधण्यासाठी आपल्याकडे विशेष कोचिंग करता येणार असल्याचे कळाले. दादा हे आपल्याला जमतं कसं? हे उभ्या महाराष्ट्राला पडलेले कोडे आहे. असो. त्या तपशीलात मी आत्ता जात नाही. मात्र मी देखील असा हट्ट करायचे ठरवले आहे… आमची सौ. आमचा हट्ट पुरा करते की नाही, ते देखील आम्हाला या निमित्ताने कळेल…

पण काही म्हणा, आपल्या वकिलांनी दिल्लीत, निवडणूक आयोगापुढे, काकांच्या समोर छातीठोकपणे जे काही ऐकवले त्या हिमतीला दाद द्यावी लागेल. “काकांनी आजपर्यंत मनमानीपणे, एखाद्या हुकूमशहासारखा पक्ष चालवला,” हे जेव्हा त्यांनी काकांच्या देखत सांगितले तेव्हा ते ऐकायला आपण हवे होता. काका स्वतः तिथे हजर होते. मात्र आपण का आला नाहीत ते कळाले नाही. काकांच्या सोबत हल्ली सावलीसारखे मागे पुढे असणारे ठाण्याचे बंडखोर नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगेच ट्विट केले. आपल्या वकिलाचे ते बोलणे ऐकून त्यांच्या डोळ्यात म्हणे अश्रू उभे राहिले. ज्यांच्यामुळे साडेअठरा वर्षे सत्ता उपभोगली. आयुष्यात सगळं काही ज्यांच्यामुळे मिळाले, त्याच काकांविषयी आपण आपल्या वकिलामार्फत असे बोलणे त्यांना भयंकर खटकले, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दादा, आव्हाड जे म्हणाले ते खरं आहे का…? काकांनी आत्तापर्यंत हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला का..? आपले हट्ट पुरवताना त्यांनी ते हुकूमशाही पद्धतीनेच पुरवले असे म्हणायचे का..? आपण ज्या पद्धतीने पहाटेचा शपथविधी केला, त्यावेळी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुन्हा आपल्याला उपमुख्यमंत्री पद दिले, ते देखील हुकूमशाही पद्धतीने दिले असे म्हणायचे का..? पक्षात दुसरे कोणी असे केले असते तर काकांनी त्याला अशी संधी हुकूमशाही पद्धतीने दिली असती का..? असे काही सवाल आम्हाला ४० जणांच्या गटातून ऐकू आले… आपल्याला माहिती असावे म्हणून सांगितले… काय खरे काय खोटे आम्हाला माहिती नाही…

आता जाता जाता शेवटचा मुद्दा : दादा, त्या चाळीस जणांच्या गटातील काही जणांनी जर असाच हट्ट केला तर त्यांचा हट्ट पुरा केला जाईल का..? की त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही बघणार नाही..? तुम्हाला काय वाटतं..? कारण त्यांचा हट्ट जर, त्यांच्या नेत्यांनी पुरा केला तर ज्या तरुण पिढीला राजकारणात यायचे आहे, काहीतरी बनायचे आहे, त्यांनी सगळ्यात आधी हट्ट कसा धरावा या विषयाचा अभ्यास नक्कीच सुरू केला पाहिजे… बरोबर आहे ना दादा…!
तुमचाच
बाबूराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *