गुरुवार, ७ नोव्हेंबर २०२४
7 November 2024

कलावंत जन्माला येतो तेव्हाची गोष्ट…!

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

 

आपण एखादं नाटक बघायला जातो म्हणजे काय करतो..? काही क्षणांची आपली करमणूक करून घेतो. एखादी चांगली कथा पडद्यावर अभिनयाच्या रूपाने फुलताना पाहतो. त्यात गाणी असतील, तर त्याचा आनंद घेतो; मात्र नाटकाच्या निमित्ताने आपल्याही नकळत एखादा कलावंत जन्माला येतो, ते मात्र आपल्या नजरेतून निसटून जाते. जे नाटक आपण पाहतो त्यात नावाजलेला कलावंत असेल तर त्याच्या जुन्या भूमिकांशी तुलना करून आपण मोकळे होतो. नवोदित कलावंत असतील तर आपण त्याची फारशी दखल घेत नाही; मात्र हेच कलावंत पुढे मोठे झाले, नावारूपाला आले की, आपण त्याच्या नावारूपाला आलेल्या भूमिकाच लक्षात घेतो. या सगळ्या गोष्टी आठविण्यासाठी कारण ठरले ‘गजब तिची अदा’ हे प्रख्यात दिग्दर्शक वामन केंद्रे यांचे आलेले नवे नाटक.

१९८७ च्या ऑक्टोबरमध्ये वामन केंद्रे यांनी ‘झुलवा’ हे नाटक रंगभूमीवर आणले. त्यांचे स्वतःचे ते पहिले नाटक होते. त्यासोबतच तब्बल ४२ नवोदित कलावंतांचे देखील ते पहिलेच नाटक होते. नाटक किती यशस्वी झाले त्यापेक्षा त्या नाटकाने किती कलावंत मराठी रंगभूमीला दिले, याचा हिशेब कितीतरी मोठा आहे. सुकन्या कुलकर्णी, सयाजी शिंदे, आदिती देशपांडे, राजेश देशपांडे, मिलिंद शिंदे, चेतन दातार, छाया केंद्रे अशी भलीमोठी यादी मराठी चित्रपट, रंगभूमीच्या क्षेत्रात आजही जोमाने तळपत आहे. त्या सगळ्यांचे मूळ ‘झुलवा’ नाटकात होते. या सगळ्यांची सुरुवात ‘झुलवा’ नाटकातून झाली होती. पुढे १९९९ झाली २० नव्या कलावंतांना घेऊन वामन केंद्रे यांनी ‘रणांगण’ हे नाटक आणले. यातील अविनाश नारकर वगळता सगळ्यांचे ते पहिले नाटक होते. ‘रणांगण’ नाटकाने मराठी इंडस्ट्रीला प्रसाद ओक, उमेश कामत, अशोक समर्थ यांसारखे अनेक कलावंत दिले.

‘झुलवा’ आणि ‘रणांगण’ या दोन नाटकांची पुनरावृत्ती ‘गजब तिची अदा’ या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर आकाराला येत आहे. या नाटकात २३ कलावंत आहेत आणि या सगळ्यांचे हे पहिले नाटक आहे. वेगवेगळ्या वर्कशॉप आणि चाचण्यांमधून हे कलावंत वामन केंद्रे यांनी निवडले. ‘झुलवा’ आणि ‘रणांगण’ ही दोन्ही नाटकं त्या काळातली वेगळी नाटकं होती. टिपिकल दिवाणखान्यात रंगणाऱ्या नाटकांच्या पलीकडे जाऊन ती रंगभूमीवर आली होती. ‘गजब तिची अदा’ हे नाटक देखील मराठी नाटकांच्या सीमा ओलांडून मराठी रंगभूमीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दुनियेत घेऊन जाण्यात यशस्वी ठरले आहे. राष्ट्रीय रंगभूमीवर हेच नाटक हिंदीत वामन केंद्रे यांनी आणले होते. मराठीत असे धाडस करायला हिंमत लागते. मराठी नाटकात मजबूत कथा हवी असते. कथेभोवती नाटक फिरत राहते. प्रेक्षकांनाही अशी नाटकं आवडतात; मात्र वामन केंद्रे यांनी संगीत, नृत्य, काव्य यांच्या जोडीला वास्तव जगण्यातल्या वेगवेगळ्या अंगावर शहारे आणणाऱ्या व्हिडीओ क्लिप्सचा आधार घेत हे नाटक अतिशय वेगळ्या पद्धतीने बांधले आहे. या नाटकाला स्वतःचा असा ताल आहे. ठेका आहे. एक वेगळीच लय हे नाटक घेऊन येते… आणि तुम्हालाही त्या लईमध्ये डुलायला लावते. जसजसे नाटक शेवटाकडे जाते तेव्हा ते तुम्हाला अधिक विचारमग्न आणि प्रगल्भ करून जाते.

नाटकाचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. रंगभूमीवर असे विषय व्यावसायिक दृष्टीने आणण्याचे धाडस करावे लागते. जे दिग्दर्शक या नात्याने वामन केंद्रे यांनी केले आहे. सौ. गौरी केंद्रे, श्रीकांत तटकरे, दिनू पेडणेकर यांनी निर्माता म्हणून अशा नाटकाच्या पाठीशी आर्थिक बळ उभे केले आहे. करिष्मा देसले, श्रुती हळदणकर, तेजस्विनी कुराडे, वैष्णवी घोडके, मोहिका गद्रे, अंकिता देसाई, सांप्रती पाटील, श्वेतनील सावंत, तन्वी धुरी, संस्कृती जाधव, समृद्धी देसाई या अकरा महिला कलावंत आणि ऋत्विक केंद्रे, मंदार पंडित, सचिन जाधव, अमोल जाधव, मंगेश शिंदे, सुमित भालेराव, अनुप हरिश्चंद्रे, दर्शन रायकर, रोहित कुलकर्णी, महेश जगताप, मनीष जाधव, महेश महालकर हे १२ पुरुष कलावंत असे एकूण २३ कलाकार आहेत. या सगळ्यांची नावे मुद्दाम येथे दिली आहेत. कारण यातच उद्याच्या मराठी रंगभूमीचे अनेक नावाजलेले कलावंत दडलेले आहेत, इतका अप्रतिम अभिनय या सगळ्यांनी केला आहे.

अभिनयातला ताजेपणा काय असतो, यासाठी तरी आवर्जून हे नाटक बघितलेच पाहिजे. अनिल सुतार यांनी नृत्याच्या ज्या स्टेप्स बसवल्या आहेत त्या वरकरणी सोप्या दिसत असल्या तरी करताना कलावंतांचा घाम काढणाऱ्या आहेत. जगभरातील नेत्यांमध्ये इतर देशांची भूमी पादाक्रांत करण्याची गळेकापू स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येक नेता स्वत:ला हुकूमशहा समजू लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या जगण्यातली शांती, स्थैर्य कुठल्या थराला जाऊ शकते हे या नाटकातून पाहायला मिळेल. जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात युद्ध प्रत्यक्ष सुरू असले तरी २६/११ च्या निमित्ताने ते आपल्या दारापर्यंत कसे येऊन ठेपले आहेत, याची जाणीव जाता जाता हे नाटक तुम्हाला करून देते. नाटकाची संपूर्ण कथा सांगून तुमचा हिरमोड करण्याची इच्छा नाही किंवा हे नाटकाचे समीक्षण नाही. मात्र, प्रत्येकाने हे नाटक आवर्जून पाहिले पाहिजे.

…आणि महिलांसाठीचे वाद्य सापडले!

आपल्याकडे महिलांचे असे कोणते वाद्य आहे, असा प्रश्न आपल्याला पडला होता. खूप शोध घेतला. अनेक प्रकारची वाद्य पाहिली. त्याचा इतिहास शोधला. तेव्हा अमुक एक विशिष्ट वाद्य फक्त महिलाच वाजवत होत्या, असे कुठेही दिसून आले नाही. एकदा घरात माझी पत्नी देवापुढे घंटी वाजवत आरती म्हणत होती. तेव्हा त्याचा आवाज मला भावला आणि अस्वस्थही करून गेला. त्यातून या नाटकात महिलांसाठीचे वाद्य म्हणून घंटीचा वापर करायचं ठरले. यातल्या सगळ्या कलावंतांना आधी घंटी दिली आणि नंतर नाटक दिले… असे वामन केंद्रे यांनी सांगितले. नाटकात या घंटीचा वापर नेमका कसा झाला आहे, हे सांगण्यापेक्षा अनुभवण्यात जास्त मजा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *