शुक्रवार, ६ डिसेंबर २०२४
6 December 2024

मुंबईत उद्धव ठाकरेंना जागा हव्या की स्ट्राईक रेट..?

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी / 1 सप्टेंबर 2024

बदलापूर आणि शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणानंतर राजकीय पक्षांनी पुन्हा नव्याने सर्व्हे सुरू केले आहेत. या दोन घटनांनी महायुती पुढे संकटांची नवी मालिका उभी केली आहे. दुसरीकडे मुंबईच्या ३६ पैकी किती जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार, यापेक्षा त्यांचा स्ट्राईक रेट काय राहणार? यावर ठाकरेंचे मुंबईतील भवितव्य ठरणार आहे. “उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षासाठी कोणताही हट्ट न धरता शरद पवार सांगतील तशा जागा घेतल्या तर आज वेगवेगळ्या सर्व्हेमधून ठाकरेंच्या सेनेला जेवढ्या जागा दिसत आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त जागा ते जिंकू शकतील..!” अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे हे विशेष. शरद पवार मैदानात किती खोलवर उतरले आहेत, हे आम्ही बघतच आहोत ठाकरेंनीही ते बघायला हवे असेही तो नेता सांगायला विसरला नाही.

आपल्याला नेमके कोणाला पाडायचे आहे, कोणत्या जागी आपली ताकद चांगली आहे हे अचूक हेरून शरद पवार यांनी फासे टाकणे सुरू केले आहे. मुंबईत पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फारशी प्रभावी नाही, त्याचा फायदा ठाकरे आणि मुंबई काँग्रेसला होऊ शकतो. आजपर्यंत तरी या दोघांमधली जागा वाटपाची चर्चा फारशी टोकाला गेलेली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या फाटाफुटी नंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे मुंबईतील संख्याबळ १७ वरून ६ वर आले आहे. काँग्रेसकडे ४ आमदार आहेत. त्यातील झिशान सिद्धीकी अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. शरद पवार गटाकडे नवाब मलिक यांची एकमेव जागा होती. यापैकी काही जागांमध्ये अदलाबदल करून उरलेल्या जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरे सेनेत बोलणी सुरू आहेत.

उद्धव ठाकरे यांना आदित्यसाठी वरळीची जागा हवी आहे. ती त्यांनाच मिळेल. तिथे आदित्यचे मताधिक्य कमी होते त्यामुळे ती जागा जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावी लागेल. मनसेने वरळीत उतरण्याचा ठरवले आहे. शिंदे गटाची रसद आदित्यच्या विरोधात राहील. या पार्श्वभूमीवर वरळीची जागा महत्त्वाची आहे.

माहीममधून निवडून आलेले सदा सरवणकर शिंदे गटात गेले. शिंदे गटाने त्यांना सिद्धिविनायक संस्थांचे अध्यक्षपद देऊन ताकद दिली आहे. या ठिकाणाहून मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले होते. उद्धव ठाकरेंकडे या मतदारसंघासाठी विशाखा राऊत आणि मिलिंद वैद्य ही दोन नावे चर्चेत आहेत. याच मतदारसंघात शिवसेनेचे मुख्यालय असल्याने ही जागा ठाकरेंना हवी आहे. मनसे इथेही उमेदवार देऊ शकते.

वांद्रे पूर्व विधानसभेतून बाळा सावंत निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव करत तृप्ती सावंत निवडून आल्या. त्यानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली. मात्र तेथून काँग्रेसचे झिशान सिद्दिकी निवडून आले. ठाकरे गटाचा पराभव झाला. आता महाविकास आघाडीमुळे ही जागा ठाकरे गटाला वरुण सरदेसाई यांच्यासाठी हवी आहे. काँग्रेसकडे तेथे उमेदवार नाही. त्यामुळे काँग्रेसने वांद्रे पश्चिम ही जागा मागितली आहे. भाजपाचे आशिष शेलार येथून निवडून आले आहेत. येथे असा उमेदवार उभा द्यायचा की ज्याचा फायदा ठाकरे आणि काँग्रेस दोघांनाही होईल. तसे नाव महाविकास आघाडीला सापडले आहे. त्यामुळे शेलार यांच्यासाठी ही निवडणूक अटीतटीची होईल.

जोगेश्वरी पूर्व मधून ठाकरे गटाचे रवींद्र वायकर निवडून आले होते. ते शिंदे गटातून लोकसभेवर निवडून गेले. ठाकरे गटाला आता ही जागा अमोल कीर्तीकर यांच्यासाठी हवी आहे. शिंदे गटाने या जागेवरून रवींद्र वायकर यांच्या पत्नीला तिकीट देण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. तसे झाले तर पुन्हा एकदा विधानसभेलाही वायकर विरुद्ध कीर्तीकर अशी लढाई पाहायला मिळेल. हा मतदारसंघ ठाकरे गटाला कोणत्याही परिस्थितीत पाहिजे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ज्या अध्यक्षांनी आपल्या पक्षाच्या विरोधात आदेश दिले त्या नार्वेकर यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करायचे असा चंग ठाकरे गटाने बांधला आहे. त्यासाठी त्यांना कुलाबाची जागा हवी आहे. तेथून राजकुमार बाफना यांचे नाव चर्चेत आहे. या जागेसाठी ठाकरे गटाने आग्रह धरला आहे.

मुंबईतील कुलाबा, माहीम, वरळी, वांद्रे पूर्व आणि जोगेश्वरी पूर्व या पाच जागांसाठी ठाकरे गटाने टोकाचा आग्रह धरला आहे. मुंबईच्या सहा लोकसभामधून प्रत्येकी किमान दोन जागा तरी काँग्रेसला पाहिजेत. समाजवादी पक्षाचे अबू आजमी यांच्यासाठी एक जागा महाविकास आघाडीला सोडावी लागणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी नवाब मलिक यांची जागा सोडावी लागेल. नवाब मलिक यांनी अणुशक्ती नगरमधून स्वतःच्या मुलीसाठी तयारी सुरू केली आहे. ते स्वतः अबू आजमी यांच्या विरोधात उभे राहतील अशी चर्चा आहे. नवाब मलिक यांना अजित पवार गटाकडून उभे राहायचे आहे. भाजपने नवाब मलिक यांना केलेला विरोध सर्वश्रुत आहे. तसे झाले तर नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक अपक्ष म्हणून उभे राहणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून? शरद पवारांच्या पक्षाकडून ते उभे राहणार असतील तर समाजवादी पक्ष महाविकास आघाडीत राहणार नाही. या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटातही अदलाबदली होऊ शकते. वांद्रे पूर्व, चांदिवली आणि भायखळा यांसारख्या जागांची काँग्रेस आणि ठाकरे गटात अदलाबदल होऊ शकते. माजी खा. प्रिया दत्त, अभिनेत्री स्वरा भास्कर यांनाही महाविकास आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसे झाले तर मुंबईतल्या निवडणुका आणखी रंगतदार होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *