मंगळवार, २३ एप्रिल २०२४
23 April 2024

सलीम अली सरोवराविषयी औरंगाबाद खंडपीठाने विशेष समिती नेमली

शहरातील प्रसिद्ध सलीम अली सरोवराविषयी विशेष वृत्तमालिका लिहिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक विशेष समिती नेमण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले. त्याचा रितसर पाठपुरावा न्यायालय करत होते.

सलीम अली सरोवरात परदेशी पक्ष्यांऐवजी म्हशी

औरंगाबाद, दि. २८ – सलीम अली यांची आठवण कायम राहावी म्हणून ज्या सरोवराला त्यांचे नाव देण्यात आले. देशविदेशातील पाहुणे पक्षी जेथे येऊन काही काळ विसावा घेऊ लागले. मात्र, परदेशी पाहुण्या पक्ष्यांनी जेथे येऊन पाण्यात मनसोक्त डुंबावे, तेथे झालेल्या डबक्यात आता म्हशी डुंबत असल्याचे चित्र कायम आहे. पक्ष्यांसाठी प्रख्यात असलेल्या सलीम अली सरोवराची अवस्था सिडको प्रशासनाच्या ‘कृपेने’ अतिशय बिकट बनली आहे. मात्र, सिडको प्रशासनाला त्याची ना खंत ना खेद!

सलीम अली सरोवराची पार्श्वभूमी पाहता त्याला कायम लढ्याचीच पार्श्वभूमी राहिलेली आहे. मुळात नहर-ए-अंबरीची प्राचीन पाणीपुरवठा योजना होती. त्यातून या तलावात पाणी यायचे. मुळात हा तलाव ५४ एकराचा होता. पण त्या वेळी या जागेतून औरंगाबाद-जळगाव रस्ता गेल्यामुळे तो २0 एकरांनी कमी झाला. ५४ एकराचा तलाव आता ३४ एकर उरला. यातील पाण्याची जी नैसर्गिक नहर येत होती ती मलिक अंबरच्या पाणीपुरवठा योजनेतून. पण सिडको प्रशासनाने त्या वेळी बाहेरून येणाऱ्या या नहरच्या जागेवर नर्सरी उभी केली. त्यामुळे तेथे पाणी येणेच थांबले. अभ्यास न करता हे झाल्यामुळे तलावात पाणी येणेच थांबून गेले.

सिडकोने त्यानंतर हा तलाव नाही, ती कोरडी जागा आहे, असे समजून प्लॉटिंग केले. त्या वेळी मोठा विरोध झाला. निवेदने, मोर्चे निघाले. तलावावर २00 मुलांनी काढलेला मोर्चादेखील सिडको प्रशासनावर परिणाम करणारा ठरला नाही. त्या वेळी निसर्ग मित्रमंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली व हा प्राचीन तलाव वाचवावा, अशी भूमिका घेतली. तेव्हा न्यायालयाने, सदर तलाव प्राचीन आहे. त्यावर बांधकाम करू नये, तो तलाव म्हणून विकसित करावा, असे आदेश दिले.

त्यानंतर सिडकोचे तत्कालीन मुख्य प्रशासक संजय भाटिया यांनी पक्षीमित्र दिलीप यार्दी, बंगलोरचे वास्तुविशारद उल्हास राणे व निसर्ग मित्रमंडळाला चर्चेसाठी बोलावले व सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानाचे लॅण्डस्केपिंग तयार झाले. त्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त अरुण बोंगीरवार, सिडकोचे मुख्य प्रशासक संजय भाटिया यांच्या उपस्थितीत सुमारे १९९0 च्या सुमारास त्या तलावाच्या काठी झालेल्या कार्यक्रमात सदर तलावास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीमित्र सलीम अली यांचे नाव देण्यात आले.

या पार्श्वभूमीकडे सध्याच्या सिडको प्रशासनाने कसे काय डोळेझाक केली, हा प्रश्न कायम आहे. संजय भाटिया होते तोपर्यंत या तलावाची अवस्था चांगली राहिली. मात्र, त्यानंतर त्याची होणारी दुर्दशा कोणीही वाचवू शकले नाही.

तलावाचे पाणी प्रदुषित झाले आणि पक्ष्यांचे येणे कमी होऊ लागले. बहुसंख्य पक्षी चांगल्या पाण्यात तयार होणाऱ्या अन्नावर जगतात. प्रदुषित पाण्यावर जगणारे शेकट्या, पाणकोंबडीसारखे देखील पक्षी आता येथे येईनासे झाले. फ्लेमिंगो (रोहित) पक्षी जायकवाडीत थव्यांनी येतो, पण तो येथे येत नाही. मानस सरोवरातून कच्छच्या रणात व नंतर जायकवाडीत तो येतो, पण तो सलीम अली सरोवराकडे पाहत नाही. इतकी त्याची कीर्ती त्याच्यापर्यंतही पोहोचलेली असावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *