बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणे,
शरद पवारांवरील टीका महाराष्ट्राला आवडलेली नाही
विशेष मुलाखत / अतुल कुलकर्णी
शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत. त्यांचे महाराष्ट्र आणि देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्यावर ‘भटकती आत्मा’ म्हणून टीका करणे, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्यांच्या शिवसेनेला ‘नकली सेना’ म्हणणे आणि महाराष्ट्रात जोडतोड करून सत्ता स्थापन करणे महाराष्ट्रातल्या लोकांना बिलकुल आवडलेले नाही, त्यामुळेच आम्ही कमी जागा मिळत असतानाही समन्वयाची भूमिका ठेवली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण तयार झाले आहे. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचे मत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केले.
मुंबई लोकमत कार्यालयात ते आले होते. त्यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात अंडर करंट काम करत आहेत. भाजपने दिलेले एकही आश्वासन त्यांना पूर्ण करता आले नाही, त्याची यादी लोकच आम्हाला वाचून दाखवत आहेत. लोकांना परिवर्तन पाहिजे. महाराष्ट्रातल्या मोडतोड करून सत्तेवर आलेल्या सरकार प्रति लोकांची नाराजी आहे. शेतकरी, महिला, बेरोजगारी हे प्रमुख प्रश्न आहेत आणि महागाई सिलिंडरचे वाढलेले दर याविषयी लोकांच्या मनात तीव्र संताप आहे, हे प्रश्न निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देतील, असेही चेन्निथला म्हणाले.
महाराष्ट्रात तुम्हाला किती जागा मिळतील, असे विचारले असता चेन्निथला म्हणाले, काँग्रेसने महाराष्ट्रात १७ जागी उमेदवार दिले आहेत. यातील प्रत्येक जागा विजयाच्या जवळ आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २१ जागी तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागी उमेदवार उभे केले आहेत. तिन्ही पक्षांमध्ये एकोपा आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांच्या प्रचारसभेसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आले. मुंबई उत्तर मतदारसंघात भूषण पाटील यांच्यासाठी ठाकरे, विनोद घोसाळकर प्रचारासाठी उतरले आहेत. वर्षा गायकवाड यांना मी मतदान करणार, असेही त्यांनी सांगितले आहे. आमचे लोक ठाकरे, शरद पवार यांच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत, हा एकोपा आमच्या विजयाचा मुख्य आत्मा आहे, असेही चेन्निथला यांनी सांगितले.
शरद पवारांचा या वयात ज्या पद्धतीने उल्लेख केला गेला किंवा अजित पवार गटाकडून बारामतीमध्ये मडके फोडण्यात आले, ही गोष्ट महाराष्ट्रातल्या संवेदनशील जनतेला आवडलेली नाही. या गोष्टींचा राग ते आपल्या मतदानातून दाखवून देतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती दाखविली, याचा अर्थ भाजप ठाकरे यांच्याशी जुळवून घेईल का? असा थेट सवाल विचारला असता, चेन्निथला म्हणाले, याचा अर्थ, भाजपला महाराष्ट्रात त्यांचा पराभव दिसत आहे. कोणतीही खिडकी, दरवाजे उघडे केलेले नाहीत. त्यामुळे त्यातून आता कोणीही येणार जाणार नाहीत.
मुंबईत तुम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत. मात्र, तुमचे नेते एकदिलाने काम करताना दिसत नाहीत त्याचे काय?
उद्या सगळ्यांची एकत्रित मीटिंग आपण बोलावली आहे. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली जाणार आहे. प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेण्याची काँग्रेसची वेगळी यंत्रणा आहे. कोण काय काम करत आहे, यावर आमचे बारीक लक्ष आहे. वर्षा गायकवाड यांनाही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझे एवढे सांगणे सगळ्यांना पुरेसे ठरेल, असे मला वाटते.
तुमचे महाराष्ट्रातील नेते विजय वडेट्टीवार यांनी सेल्फ गोल केला, त्याचे काय?
ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. निवडणुकीच्या काळात नेते बोलत असतात. मात्र, भाजपने लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम केले. हिंदू-मुस्लीम राजकारण ऐकून लोक थकून गेले आहेत. यापेक्षा महाग झालेला सिलिंडर स्वस्त कसा मिळेल, याची चिंता लोकांना आहे. भारत-पाकिस्तान म्हणत या निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत-पाकिस्तान म्हणायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का?
Comments