मंगळवार, १७ मे २०२२
17 May 2022

राज्यातले सरकार पाडण्यासाठी सुशांतसिंग आत्महत्येचे प्रकरण हाताळले गेले

सीबीआयवरचा जनतेचा विश्वास उडत चालला आहे!

सुपरकॉप ज्युलिओ रिबेरो यांचा गंभीर आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सुशांतसिंग आत्महत्येचे प्रकरण राजकीय झाले आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजप या घटनेकडे राजकीय संधी म्हणून पहात आहे, असा गंभीर आरोप करताना सीबीआय सारख्या संस्थेवरचा जनतेचा विश्वास उडत चालला आहे, असे परखड मत माजी पोलिस महासंचालक व सुरपरकॉप या टोपणनावाने ओळखले जाणाऱ्या ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केले.

लोकमत ऑनलाईनला ‘ग्राऊंड झिरो’ कार्यक्रमात मुलाखत देताना ते बोलत होेते. ही मुलाखत लोकमत यु ट्यूब चॅनलवर पहायला मिळेल. देशात सगळ्या पोलिस यंत्रणा सरकारची भाषा बोलतात असे सांगून रिबेरो म्हणाले, केंद्राच्या सीबीआय, ईडी, एनसीबी अशा विविध यंत्रणा या तपासात सहभागी होत आहेत ते पाहून असे वाटते की, केंद्रीय तपास यंत्रणांना आता दुसरे काही काम उरलेले नाही. सरकार पाडण्यासाठी इतरही अनेक मार्ग आहेत, मात्र जो मार्ग निवडला गेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. या गुन्ह्याचा तपास कायद्यानुसारच व्हावा. गुन्ह्यावरून राजकारण होणे ही बाब धोक्याची आहे. आदित्य ठाकरेंच्या बॉलीवूडमधील मैत्रीचा राजकारणासाठी वापर केला जात आहे असे सांगून रिबेरो म्हणाले, आम्हाला स्पष्ट दिसत आहे की ही आत्महत्या आहे. सुशांत त्याच्या बेडरूममध्ये एकटाच होता. मुंबई पोलिसांनी योग्य पध्दत अवलंबली. आत्महत्येला प्रोत्साहन दिल्याचे दिसले तरच एफआयआर करतात. त्या दृष्टीने तपास चालू होता. मात्र एफआयआर दाखल केला नाही यात काहीच चुकीचे नाही. न्यायालयाने चुकीने हे प्रकरण सीबीआयकडे दिले असावे असेही रिबेरो म्हणाले.

ज्या पध्दतीने अंकिता लोखंडेनी पुरावे दिले, तसे पुरावे देण्याचे काम आता रियाने देखील करावे असे सांगून रिबेरो यांनी जनतेला या विषयात रस असल्यामुळे माध्यमे सक्रीय झाली असेही स्पष्ट केले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, सीबीआय संचालकाची निवड कशी करावी हे न्यायालयाने सांगितले आहे. दुर्देवाने गेल्या काही वर्षात जे चालू आहे ते पहाता, सीबीआयवर असलेला विश्वास उडाला आहे. पूर्वी जसा सीबीआयवर विश्वास होता, तो आता राहिला नाही. सरकार सीबीआयचा राजकीय वापर करत आहे. आमच्या काळात असे होत नव्हते असेही रिबेरो यांनी स्पष्ट केले. दिल्ली पोलिस जे काही करत आहेत ते पाहून मलाच लाज वाटते असेही ते म्हणाले.

मुंबई पोलिसांकडे तपास राहिला असता तर काय झाले असते, असे विचारले असता ते म्हणाले, राजकीय स्वाथार्साठी पोलिस यंत्रणेचा वापर होतो. ‘रूल ऑफ लॉ’ ची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर न्यायालयात दाद मागता आली असती. हे फक्त राजकीय स्वार्थासाठी झाले आहे.

आपल्याकडे देखील बिहारचे पोलिस अधिकारी क्वारंटाईन केले गेले ते अत्यंत चुकीचे घडले. तसे व्हायला नको होते. यातून एकच लक्षात येते की, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची निवड काळजीपूर्वक केली पाहिजे. मुंबईचे आयुक्त होण्यासाठी एक स्पर्धा लागली आहे. त्यासाठी लॉबिंग केले जाते. तसे करुन पद मिळाले की सरकारचे काम करावे लागते असा टोमणाही रिबेरो यांनी लगावला.

बिहारचे लोक मुंबईत येण्याची गरजच नव्हती. सुशांत प्रकरणाने एक चुकीचा आणि धोकादायक पायंडा घातला गेलाय. हे तत्त्व स्वीकारले तर भविष्यात खूप गोंधळ उडणार. इतर राज्यातील पोलिसही अशीच मागणी करतील असे सांगून हे सगळे प्रकरण ज्या पध्दतीने हाताळले गेले त्यावरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *