रविवार, ८ सप्टेंबर २०२४
8 September 2024

राष्ट्रपती राजवट की निवडणूक..? होणार काय..?

मुक्काम पोस्ट महामुंबई/ अतुल कुलकर्णी / 26 ऑगस्ट 2024

महाराष्ट्रात राजकीय अफवांनी कळस गाठला आहे. प्रत्येक जण दुसऱ्या एका बड्या नेत्याचा हवाला देत अमुक अमुक होणार असे छातीठोकपणे सांगताना दिसत आहे. त्यातली सगळ्यात हिट अफवा म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार. एकदा का राष्ट्रपती राजवट लागू झाली की सगळे पक्ष, सगळे मंत्री समान पातळीवर येतील. त्यानंतर हवे तसे जागांचे वाटप करायला भाजप मोकळी होईल. भाजप असे का करेल? असा प्रश्न कोणी केला की, भाजप काहीही करू शकते, असे प्रत्युत्तर ही अफवा ठासून सांगणाऱ्याकडे असते.

दुसरी अफवा आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. या योजनेचे चार हप्ते दिल्याशिवाय विधानसभा निवडणुका जाहीरच होणार नाही. चार हप्ते म्हणजे चार महिने जावे लागतील. त्यातील दोन महिने संपले आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर झाले की चार महिन्यांचे हप्ते खात्यात जमा होतील. त्यानंतर सरकार काही काळ प्रचार करेल आणि डिसेंबरमध्ये निवडणुका घेईल, असा तर्कही त्यासाठी दिला जात आहे. या तर्कासोबत एक पोटअफवादेखील फिरत आहे… जम्मू काश्मीर आणि हरयाणामध्ये भाजप जिंकली तर आणि हरली तर जागांचे वाटप कसे होईल, यावरही हा अफवांचा बाजार गरम आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. ही योजना गेम चेंजर ठरू शकते, असे भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना वाटत आहे. मात्र, बदलापूरसारख्या घटना घडल्या की, या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. शिवाजी पार्कच्या एका बंगल्यातून एक मिम जोरात व्हायरल केले जात आहे. “नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊनही त्याचे न ऐकणारी बायको १,५०० रुपये घेऊन कोणाचे का ऐकेल…” असे हे मीम सध्या व्हायरल झाले आहे.

या अफवांच्या बाजारात काही गोष्टी जाणीवपूर्वक सोडल्या जात आहेत. एखादी गोष्ट जनतेत कशा पद्धतीने स्वीकारली जाईल? त्यातून काय रिअॅक्शन येईल? हे तपासून पुढे कसे जायचे, याचे आडाखे राजकीय पक्ष बांधत आहेत. प्रत्येक पक्ष महाराष्ट्रात आपल्या किती जागा येतील, याचे सर्वेक्षण करून घेण्यात मग्न आहे. काँग्रेस ७० ते ८०, शरद पवार गट ५५ ते ६०, उद्धव ठाकरे ३० ते ३५ असे सर्विक्षण काँग्रेसचे आहे. तर काँग्रेस ६५ ते ७०, शरद पवार गट ६० ते ६५, उद्धव ठाकरे २५ ते ३५ असा शरद पवार गटाचा निष्कर्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही सर्वेक्षण केले आहे. त्यांच्या मते काँग्रेस ६० ते ६५, शरद पवार गट ४० ते ४५, उद्धव ठाकरे ६५ ते ७५ असा निष्कर्ष आहे. तिघांच्याही निरीक्षणातून काँग्रेसला जास्त जागा मिळतील, हे एकमेव साम्य आहे. विदर्भात काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. पण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार काय करतील, यावर त्यांचा विश्वास नाही.

मुंबईत कोणी किती जागा लढवायच्या, यावरही दोन्ही गटात चर्चा जोरात सुरू आहे. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्यापैकी २० उद्धव ठाकरेंना, १४ काँग्रेसला आणि प्रत्येकी एक जागा शरद पवार आणि समाजवादी पक्ष यांना द्यायची अशी चर्चा आहे. शिंदे गटाला मुंबईत किमान १७ जागा पाहिजेत. भाजप मात्र कमीत कमी २५ जागा लढवण्याच्या मानसिकतेत आहे. ४२ जागा ३६मध्ये कशा वाटप करायच्या? याचा वाद महायुतीत आहे. दोन्ही बाजूचे नेते “तुम्हाला म्हणून सांगतो” असे म्हणत भाजपाच्या सर्वेक्षणामध्ये राज्यात भाजपला ५० ते ६० जागा मिळतील, असेही माध्यमांना सांगत आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मुस्लिम आमदाराला उपमुख्यमंत्रिपद दिले पाहिजे, अशी मागणी केली. ही मागणी त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजप बीट कव्हर करणाऱ्या पत्रकारांसमोर केल्याची जोरदार अफवा आहे. अस्लम शेख मागच्या वेळीच भाजपसोबत जायला तयार झाले होते. मात्र, भाजपने आणि मातोश्रीने त्यांना नकार दिल्यामुळे आणि काँग्रेसकडे उमेदवार नसल्यामुळे ते निवडून आले. अमीन पटेल यांना मंत्रिपद देण्यासाठी तत्कालीन नेते अहमद पटेल यांचा विरोध होता. नसीम खान पराभूत झाले होते. त्यामुळे अस्लम शेख यांची लॉटरी लागली. आता तेच भाजपला पूरक विधाने करत आहेत, यावरून काय ते समजून घ्या, असेही काही नेते “तुम्हाला म्हणून सांगतो…” असे म्हणत सांगत आहेत.

हे सगळे सुरू असताना महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकदिलाने लाडकी बहीण योजनेच्या प्रचारार्थ राज्यभर फिरत आहेत. महाविकास आघाडीचे शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे एकमेकांचे हात उंचावून महाविकास आघाडीच्या यशाची तयारी करत आहेत. जाता जाता : यावेळी ३५ ते ४० आमदार अपक्ष म्हणून निवडून येतील. राज्यात सत्ता कोणाची येणार हे तेच ठरवतील… अशी अफवाही सध्या जोरात आहे. १९९५ मध्ये असेच घडले होते. अपक्षांच्या पाठबळावर तेव्हा सरकार बनवण्यात आले. अनेक नेते खाजगीत मी तर अपक्ष म्हणून उभा राहणार आहे असेही सांगत आहेत. जे काही चित्र राज्यात आहे त्यावरून सध्या तरी हीच एकमेव अफवा खरी होईल की काय असे वाटत आहे.. तुम्हाला काय वाटते..?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *