सोमवार, २९ मे २०२३
29 May 2023

लेखक गाव सोडून जातो म्हणजे काय होतं…?

एक लेखक आपली हयात ज्या गावात घालवतो ते गाव स्वत:च स्वत:च्या जीवंतपणी सोडून जातो म्हणजे काय होतं..? ज्या गावात, घरात त्यानं अनेक दुर्मिळ पुस्तकांना जन्म दिला, अमोल असा ठेवा जगाला दिला, मोठा इतिहास शब्दबध्द केला, ते गाव, ते घर सोडून लेखक आपल्या मूळ गावी जातो म्हणजे काय होतं…? का असं एकाकीपण आयुष्याच्या शेवटाला येतं…?

लौकिकार्थान सगळं काही मिळवूनही असं काय मिळवायचं शिल्लक रहातं..? म्हणून तोच लेखक त्यासाठी स्वत:च्या जन्मगावी जायला तयार होतो…? मारुती चितमपल्ली यांनी आपली कर्मभूमी असणारं नागपूरचं घर सोडून स्वत:च्या गावी, सोलापूरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी वाचल्यापासून हे अस्वस्थ प्रश्न मनात आहेत. ही अशी अस्वस्थता निर्माण करून, आपली सगळी ग्रंथसंपदा आणि थोडे बहूत सामान घेऊन ते शनिवारी नागपूरहून आपल्या गावाकडे गेले देखील…

वर्तमानपत्रात बातम्या आल्या, हळहळ व्यक्त झाली. एखादं चॅनल आता ही बातमी धीरगंभीर आवाजात दाखवून भावनिक टीआरपीची बेगमी करेलही, पण पुढे काय…? एक लेखक आपल्यातून कायमचा जातो तेव्हा खूप मोठी पोकळी निर्माण झाली असं बोलण्याची पध्दत वर्षानुवर्षे कायम आहे… मात्र ती पोकळी कुठे जाणवत का नाही…? इथे तर एक लेखक आपल्या आयुष्याचं ८८ वर्षांचं झाड, मुळासकट उपटून पुन्हा आपल्या मूळ गावी नव्याने लावायला जातोय…! तो ज्या गावात त्याच्या आयुष्याचं झाड पुन्हा नव्याने लावणार आहे ती माती भलेही त्याची जन्मभूमी असेल; पण ते अनुभवानं गच्च भरलेलं झाड पुन्हा त्या नव्या मातीत रुजेल का?

एक लेखक आपल्या आयुष्यातून कायमचा जातो किंवा आपलं गाव सोडून जातो त्याचा आमच्या जगण्यावर, आमच्या गावावर, आमच्या भावभावनांवर काहीच परिणाम का होत नाही…? आमच्या संवेदना आतून विस्कटून का जात नाहीत…? की आमची नाळ फार पूर्वीच तूटून गेलीय या सगळ्यापासून…? कळत न कळत त्या लेखकाने आमच्या असण्यावर, आमच्या वागण्या बोलण्यावर काही परिणाम केले असतील की नाही…? याचाही विचार हल्ली मनाला का स्पर्श करत नाही…?

आम्हा सगळ्यांचं बालपण एक घास काऊचा, एक घास चिऊचा म्हणत गेलं, ती चिऊ… ती चिमणी आमच्यातून कधी निघून गेली…? कुठे निघून गेली…? हा प्रश्नही कधी आमच्या मनाला शिवत नाही… खापराच्या पाटीवर तुटक्या पेन्सीलीला ओठांचा चंबू करुन थोडीशी थुंकी लावून अक्षरं गिरवण्याचा अनूभवही आता आठवत का नाही…? दिवाळीच्या आधी रंगीत कागदं आणून, पतंगांच्या काड्यांच्या सहाय्यानं आकाशकंदिल बनवताना, काडीचं कुसळ घूसून रक्त आलेलं बोट, आपल्याच तोंडात घालून थांबवण्याचा प्रयत्न, आता थोडासाही का आठवत नाही…? हे सगळं आजच्या जगण्यात काहीच कामाला येत नाही, एवढं निरर्थक होतं का…? नव्या पुस्तकांचा वास, हाताला होणारा स्पर्श आणि त्यातून एका लेखकाचा आमच्यात होणारा प्रवेश… हे सगळं का निसटत चाललंय…?

एखाद्या अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे आम्ही हरतऱ्हेनं व्यक्त होतो… एखाद्या अभिनेत्रीच्या टीवटीवीवर आम्ही भरभरुन मतं मांडतो… एखाद्या राजकीय घटनेवर कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने सतत बोलत रहातो… कधी स्वत:ला देशभक्त म्हणून घेतो तर कधी दुसऱ्यांना देशद्रोही ठरवत भांडत रहातो, मात्र एक लेखक असा आपली मुळं उचकटून जातो, तेव्हा आमच्या मनावर एक साधा तरंगही उमटू नये..?

एरवी तावातावाने भांडणाऱ्यां आपल्या साहित्यसंस्था? संस्कृतीच्या नावाने सतत गळे काढणारं आपलं सरकार? आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात काही व्यक्तिगत अडचणींमुळे एकांतवासाचा सामना करणाऱ्या आणि तरीही नवनव्या प्रकल्पांमध्ये जीव ओतून कार्यरत असलेल्या लेखकाच्या बाबतीत आपलं काही कर्तव्य आहे, असं यातल्या कुणालाच का वाटू नये? की सत्काराच्या शाली पांघरल्या म्हणजे संपली जबाबदारी? आयुष्याच्या अनुभवांची शिदोरी अंतापर्यंत सोबत देणारा लेखक गाव सोडून गेला तेव्हा नागपूरातल्या एकाही संवेदनशिल राजकारण्याला दु:ख झालं नाही… का? कोणतंही गाव ओळखलं जातं ते तिथल्या संस्कृती, साहित्यिक, विचारवंतांमुळे! बलाढ्य नेते अगर उत्तुंग इमारतींमुळे नव्हे!!

पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा लाल किल्ल्यावर कार्यक्रमास गेले होते. तेथे चालताना त्यांचा पाय अडखळून तोल गेला, तेव्हा जवळच उभ्या असलेल्या कवी रामधारीसिंग दिनकर यांनी त्यांना सावरलं. नेहरुंनी त्यांना धन्यवाद दिले. सॉरीही म्हटलं. तेव्हा कवी दिनकर म्हणाले, पंडीतजी सॉरी म्हणू नका… राजसत्तेचे पाय जेव्हा डगमगतात तेव्हा साहित्य व साहित्यिकच त्यांना आधार देण्याचं काम करतात…. आता हे कोण कोणाला सांगणार…?

अ‍ॅडॉल्फ सॅक्स यानं १८४० मध्ये सॅक्सोफोनचा शोध लावला. बेल्जीयममधल्या डिनांट गावात तो १८१४ मध्ये जन्माला आला. २०६ वर्षे उलटून गेली. तरीही त्या गावात आजही वेगवेगळ्या आकारातल्या शेकडो सॅक्सोफोनच्या शेकडो प्रतिकृती चौकाचौकात लावून ठेवलेल्या आहेत… त्या श्रेष्ठ वादकाची आठवण म्हणून. इथेतर एक जीवंत लेखकच आमच्या गावातून त्याच्या अनुभवाचं झाड मुळासकट उपटून निघून गेलायं..!तरी कुणाला काही वाटू नये..?

जाता जाता : दहावीस जणांच्या भरल्या घरात एखाद्याला एकटं वाटू लागलं तर तो दोष त्या व्यक्तीचा कसा? त्याला भरल्या घरात एकटं का वाटतं याचा विचार घरातल्या बाकीच्यांनी करायचा असतो…कसदार लेखनापायी ज्याने आपलं आयुष्य उधळलं; त्या ॠषीतुल्य माणसाला आपण सोबत देऊ शकलो नाही, याचा विचार आता आमच्या शहरानं, इथं राहणाऱ्यांनी करायचा आहे… हेच अस्वस्थ सत्य आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *