शनिवार, २० एप्रिल २०२४
20 April 2024

कोरोनाचा खात्मा होईल पण एका अटीवर….

अतुल कुलकर्णी
संपादक, लोकमत, मुंबई

घरकाम करणारा एका मुलाच्या गावाला भूताने झपाटले म्हणून कोरोनाची लस घ्यायला कोणी तयार नाही. त्यासाठी गावातल्या पुजाऱ्याने सांगितलेल्या दक्षिणेसह १० ते १५ हजाराचे साहित्य आणून पुजा घातली गेली. रात्री सगळ्यांनी पुजेचे साहित्य दाराबाहेर ठेवायचे, दरवाजे बंद करुन डोळे मिटून बसून रहायचे. रात्रीतून सगळे साहित्य नाहीसे झाले तर ते त्या भूताने नेले असे समजायचे. दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या दारासमोरचे साहित्य नाहिसे झाले होते. लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पुजारी म्हणाला, असेच भूत दुसऱ्या गावातही आहे, तुमची पुजा करुन मी ते सोडवायला जाणार आहे, त्यामुळे माझी कोणी वाट पाहू नका… त्या गावात कोरोना किती नीट झाला याचा कोणीही तपास केलेला नाही. एकीकडे ग्रामीण भागात ही मानसिकता तर दुसरीकडे शहरांमध्ये टोकाची बेफिकीरी आली आहे.
आम्हाला काही होत नाही असा दावा करायचा. विना मास्क बिनदिक्कत फिरायचे ही बेफिकीरीच मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये बोकाळली आहे.
परदेशातून परत आलेल्यांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला असतानाही असे लोक बिनधास्त बाहेर फिरतात. माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत असे म्हणत इतरांना कोरोनाचा प्रसाद देत फिरतात. त्यांना स्वतःची, त्यांच्या घरची आणि आजूबाजूची कसलीही फिकीर नाही. कालच मुंबई विमानतळावर एका गृहस्थाची तपासणी केली तेव्हा ते पॉझिटिव्ह निघाले, तर त्यांनी आपल्या तपासणी पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरटीपीसीआर करायला नकार दिला. त्यांना जबरदस्तीने सेव्हन हिल हॉस्पिटलला ॲडमिट करावे लागले. या अशा वागण्याने आपण आपले आणि संपूर्ण समाजाचे स्वास्थ्य धोक्यात आणत आहोत याचाही कोणाला फिकीर नाही.
आज जरी मुंबईत रोज सहा ते आठ हजार रुग्ण निघत असले तरी त्यातील ९० टक्के लोक कमी लक्षणांचे आहेत. त्यांना हॉस्पीटलची नाही. मात्र जसे रुग्ण वाढत जातील तसे लोकांमध्ये भीती वाढत जाईल. ही वाढती भीतीच जीवघेणी ठरणारी आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या आजाराची वाढ कशी होईल हे स्पष्ट केले आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या २ लाखापर्यंत जाईल. ज्या दिवशी ८० लाख रुग्णसंख्या होईल त्या दिवशी १ टक्का लोक मृत्यूमुखी पडतील असे गृहीत धरले तरी मरणाऱ्यांची संख्या ८० हजार होईल. ही आकडेवारी काहीशी भीतीदायक असली तरी त्याची कारणे शोधली तर त्यातील वास्तव लक्षात येईल.


मुंबईत १९ डिसेंबर रोजी ३३६ रुग्ण होते. ही संख्या २ जानेवारी रोजी ८०३६ झाली आहे. १५ दिवसात जर हा वेग असेल तर येणाऱ्या काळात ही संख्या गुणाकार पध्दतीने वाढत जाईल. त्यातून रुग्णांमध्ये भीती निर्माण होईल. ही भीतीच येणाऱ्या काळात जीवघेणी ठरेल. त्याचेही कारण साधे सरळ आहे. जसजशी रुग्णसंख्या वाढत जाईल तसे लोकांमधील अस्वस्थता वाढीस लागेल. प्रत्येकाला दवाखान्यात जावे वाटेल. वरपर्यंत पोहोच असणारे किंवा पैसेवाले ऑक्सीजन, व्हेंटीलेटरचे बेड अडवून ठेवतील. खाजगी हॉस्पीटलमध्ये अशांचा भरणा होईल आणि ज्यांना खरोखरीच गरज आहे अशांना ना ऑक्सीजन मिळेल ना व्हेंटीलेटर. कारण मुळातच या साधनांची संख्या आजही मर्यादित आहे. त्यामुळे ही भीतीच येत्या काळात रुग्ण वेगाने वाढल्यास जीवघेणारी ठरेल.
हे टाळायचे असेल तर प्रत्येकाने खाडकन भानावर आले पाहिजे. स्व:तची नाही निदान आपल्यावर अवलंबून असणाऱ्या आई, बाप, मुलाबाळांच्या काळजीपोटी का होईना, मास्क लावला पाहिजे. गरज नसेल तर फिरणे थांबवले पाहिजे. विनाकारण बोंबलत वाट्टेल तेथे विना मास्क फिरणाऱ्यांना पोलिसांनी फटके हाणले पाहिजेत. जे लोक प्रामाणिकपणे नियम पाळत आहेत त्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या मुठभर टारगटांना बिलकूल मिळू नये. यासाठी आपणही अशा लोकांना दिसेल तेथे टोकले पाहिजे. खडसावून जाब विचारला पाहिजे. त्यांचे फोटो काढून सोशल मिडीयावर टाकले पाहिजेत. जे नेते विनामास्क फिरत आहेत त्यांचेही फोटो ‘#नियमांचीएैशीतैशी’ असे लिहून व्हायरल केले पाहिजेत. तर आणि तरच कोरोनाचा खात्मा होईल. अन्यथा हे दुष्टचक्र थांबणे महाकठीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *