शनिवार, २४ जुलै २०२१
24 July 2021

काँग्रेसची ७८ विधानसभा मतदारसंघात आघाडी, मराठवाडा, कोकण, खानदेशात मात्र काँग्रेसची अवस्था बिकट

मराठवाडा, कोकण, खानदेशात मात्र काँग्रेसची अवस्था बिकट

मुंबई, दि. २९ – राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४८ पैकी १७ जागी यश मिळवले आणि २८८ पैकी ७८ विधानसभांमध्ये मताधिक्त ! विद्यमान विधानसभेत काँग्रेसचे ७१ आमदार आहेत. याचा अर्थ सात ठिकाणी

काँग्रेसने अधिकचे मताधिक्य मिळवले आहे. मात्र मराठवाडा, कोकण, खानदेश या तिन ठिकाणी काँग्रेसची परिस्थिती अतीशय नाजूक बनलेली आहे.

एकीकडे पक्षाची स्थिती सुधारल्याच्या आनंदात नेतेमंडळी आहेत. मात्र कार्यकर्त्यांच्या मनात वेगळेच काहीतरी चालू आहे. अनेक महामंडळं रिक्त असताना, अनेक समित्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या असताना देखील काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल पक्षात वरिष्ठ पातळीवर खाजगीतही आर्श्चय व्यक्त केले जात आहे हे विशेष.

विदर्भात २१ विधानसभेत आघाडी

विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत ज्यापैकी काँग्रेसने २१ ठिकाणी आघाडी घेतली आहे. विदर्भात मावळत्या लोकसभेत काँग्रेसकडे केवळ नागपूरची जागा होती. आता रामटेक, वर्धा, गडचिरोली-चिमूर, अशा जागा काँग्रेसने जिंकल्या. वर्ध्यात आत्तापर्यंत प्रभाराव आणि प्रमोद शेंडे यांच्यातील वादाचे फटके कायम पक्षाला बसत आले. यावेळी मात्र तो वाद फारसा समोर आला नाही आणि दत्ता मेघे यांनी सगळ्यांना सोबत नेण्याची वापरलेली युक्ती कामी आली. चिमुर-गडचिरोलीमध्ये देखील राष्ट्रवादीने आतून विरोध करुनही मारोतराव कोवासे हे स्वतच्या जनसंपर्काच्या आधारे निवडून आले. यवतमाळमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि उत्तमराव पाटील यांच्यातील रस्सीखेच पक्षाला महागात पडली. तर शांताराम पोटदुखे आणि नरेश पुगलिया यांच्या वादाचा फटका देखील पक्षाला सहन करावा लागला. शेतकरी आत्महत्या आणि त्यावरुन झालेले राजकारण याच्या पार्श्वभूमीवर विदर्भात काँग्रेसने मिळवलेले यश कौतुकाचेच म्हणावे लागेल.

पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने सांगली, पुणे आणि कोल्हापूर या तीन लोकसभेच्या जागा लढविल्या होत्या. त्या तिनही त्यांनी जिंकल्या. सांगलीत वसंतदादांचा वारस पाडायचाच या ईर्षेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही नेते मैदानात उतरले होते. मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मदन पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि ती जागा काँग्रेसला जिंकता आली. विशेष म्हणजे विलासरावांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचे सख्खे साडू अजित घोरपडे त्यांच्या विरोधात असताना देखील ही जागा येऊ शकली. पुण्यात एकट्या शरद पवारांनी सुरेश कलमाडींसाठी मागचे विरोध विसरुन काम केले ज्याचा फायदा कलमाडींना झाला पण अजित पवार यांनी मात्र शेवटपर्यंत पुण्यात पाय ठेवला नव्हता. काँग्रेसने उमेदवारी देऊ केलेल्या शिर्डीमध्ये देखील रिपाई नेते रामदास आठवले यांना दारुण पराभव पत्करावा लागला. एकाही विधानसभेत त्यांना मताधिक्य मिळाले नाही. दोन्ही काँग्रेसने शेवटपर्यंत तेथे मनासारखे काम केलेच नाही. एकूणच काँग्रेसची प. महाराष्ट्रात वाताहत होणार हे बोलले जात असताना १३ विधानसभांवर काँग्रेसने आघाडी मिळवली आहे व राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

खानदेशात बिकट अवस्था

खानदेशात तीन जिल्हे येतात. ज्यात २० विधानसभा आहेत. येथे धुळ्याची जागा काँग्रेसच्या अंतर्गत भांडणामुळे गेली. तर रोहीदास पाटील यांनी शेवटपर्यंतच मैदानात पाऊल न टाकल्याचाही फटका पक्षाला बसलाच. नंदुरबारची जागा देखील कशीबशी पक्षाने टिकवली. दरवेळी लाखो मतांनी निवडून येणारे माणिकराव गावीत यांना यावेळी ७०-८० हजाराच्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले. त्याला राष्ट्रवादीची ‘मैत्री’ कारण असल्याचे आता बोलले जात आहे.

कोकणात राणेंचा विजय

कोकणात मात्र काँग्रेसचे यश हे केवळ आणि केवळ नारायण राणे यांचेच यश मानावे लागेल. मात्र कोकणातील चार जिल्ह्यातील ३९ विधानसभांपैकी काँग्रेसला केवळ ९ विधानसभांमध्ये मताधिक्य मिळालेले आहे. त्याऊलट शिवसेनेची कामगिरी कोकणात कितीतरी चांगली आहे. रत्नागिरी-सिंधूदूर्ग मध्ये निलेश राणेंच्या रूपाने काँग्रेसने शिवसेनेची जागा मिळवली. रत्नागिरीत मात्र त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. ए.आर. अंतुले रायगडमधून पराभूत झाले त्याला त्यांच्याबद्दलची नाराजीची भावना जशी कारण होती तसेच राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी हात राखून केलेला प्रचार आणि सेनेला शेकापची मिळालेली साथ ही कारणे ही त्यात होती. ठाण्यात लोकसभेचे चार मतदारसंघ. येथे भिवंडी काँग्रेसला नव्याने मिळाली तर पालघरचा उमेदवार चुकीचा होता या प्रचाराने त्या जागेचा बळी गेला.

मराठवाड्यात काँग्रेसची अवस्था बिकट

मराठवाड्यात काँग्रेस वाढली ती खऱ्या अर्थाने लातूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यातच. बाकी जिल्ह्यात व मराठवाड्याच्या राजधानीत; औरंगाबादेत पक्ष वाढावा म्हणून पक्षश्रेष्ठींनी कधीही पाच वर्षात जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. पक्षाला व स्थानिक नेत्यांना कधी ताकद दिली नाही. उलट पक्षात गटबाजी कशी वाढेल याकडेच नेत्यांनी कायम लक्ष दिले. किंबहुना त्याला प्रोत्साहन दिले. या सगळ्या राजकारणातही औरंगाबाद शहरात आ. राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंह पवार यांना मताधिक्य दिले. मागील लोकसभेच्यावेळी देखील शहरातून पक्षाला मताधिक्य होते. लातूरची जागा आली नसती तरच नवल होते. त्यातही त्या विजयाला विलासराव-मुंडे यांच्या मैत्रीची झालर आहेच. तर नांदेड मध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील भाजपा नेते मुंडे यांचे आभार मानावेत असेच चित्र होते. कारण विद्यमान भाजपा खासदाराला डावलून संभाजी पवारांना तेथे तिकीट दिले गेले. जालन्यात देखील काँग्रेस वाढावी म्हणून कधी जाणीवपूर्वक प्रयत्नच झाले नव्हते. व विद्यमान राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपे यांनी नवा पक्ष कशाला वाढवा या न्यायाने काँग्रेसच्या विजयात फारसे लक्ष दिलेच नाही. त्यामुळे आज मितीला मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मिळून असणाऱ्या ४६ विधानसभेपैकी केवळ ११ विधानसभेत काँग्रेसला आघाडी मिळालेली आहे. त्याउलट दोन आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या विभागात भाजप-सेनेचे घेतलेली आघाडी काळजी निर्माण करणारी आहे हे वास्तव आहे.

मुंबईत मनसे कृपेने विजय

मुंबईत भाजपा-सेना आणि मनसेची मतं एकत्र केली तरीही काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असता असे म्हणण्याजोगी एकमेव जागा होती ती प्रिया दत्त यांची. बाकी सर्व ठिकाणी मनसेच्या कृपेने काँग्रेसचा विजय अतिशय सोपा करुन झाला. त्याचवेळी मुंबईतील ३६ पैकी ९ विधानसभेत काँग्रेसने आघाडी घेतली आहे ही बाबही तेवढीच लक्षणीय म्हणावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *