रविवार, २२ मे २०२२
22 May 2022

'अण्णा' राजघाटावर ढसा-ढसा रडले,
अन् 'रामलीला'वर जाऊन उपोषणाला बसले..
रस्तोरस्ती पोरं-टोरं, बाया-बापडी जमली,
'हजारें'चा एक जिथे जड झालाय तिथे,
ख रा रपपर करक्षरीश म्हणत
हजारोंनी उगवली..
स्वर्ग लोकातल्या साऱ्यांनी पृथ्वीवर जेव्हा वाकून पाहिले, त्यांना जागोजाग दिसले जथ्थे, पांढऱ्या टोप्या रंगवलेले..
पृथ्वीवरल्या माणसांची डोकी कुठल्याकुठं पार हरवलेली, ख रा रपपर करक्षरीश ची उसनी टोपी फक्त होती अडकवलेली..
ते पाहून भगवान विष्णू म्हणाले, अरे हा काय चमत्कार झाला! शंभर तोंडांचा रावण मीच तर होता मारला, मग हा सहस्त्र डोक्यांचा 'अण्णा' कुणी जन्माला घातला?..
त्यावर तांडवनृत्य करीत शंकर भगवान कोपून म्हणाले, लढण्याचं त्राण गमावलेली पृथ्वीवरची माणसं नपुंसक झाली,
अन् मग उसनी डोकी लावून पुरूषार्थावर वांझोटं बोलू लागली..
हे ऐकून इंद्राच्या दरबारीची अप्सरा धाय मोकलून रडली, पृथ्वीवरचे सगळेच झाले ब्रम्हचारी, मग आता माझी पत घसरली..
तिची समजूत काढता काढता सारेच देव थकले, तेवढ्यात अचानक यमानेही भोकाड पसरले.. ऊर बडवीत यम सांगे साऱ्यांना,
घटीका भरली म्हणून गेलो होतो माणसाला उचलायला, सारेच 'अण्णा हजारे' पाहून रेडा माझा बिथरला..
एकाच्या हाताला पकडून मी म्हणालो,
''अरे चल, पृथ्वीवरली तुझी घटीका संपली'' त्यावर तो म्हणतो मलाच दरडावून,
''मी अण्णा हजारे''.... म्हणून मी दुसऱ्याकडे वळलो, तर तोही म्हणतो, ''मी अण्णा हजारे''
''देवा, युगानुयुगे माणसाला उचलायचं काम मी आजवर प्रामाणिकपणे केलं,
मात्र आता माझं खातं बदल रे बाबा, या 'अण्णा'ने माझ्या रेड्याला पार थकवलं'..
विष्णू म्हणाला, ''च्यायला उगाच म्हणालो मी, 'संभवामि युगे युगे'
माझ्या प्रकटण्याची वाट न पाहताच पृथ्वीवर फुटू लागलेतं 'अवतारां'चे फुगे'',
स्वर्गातील 'रामलिला' पाहून जे.पी., बापू, नेहरू, बाबासाहेब विचारात पडले,
चरखा फिरवित बापू म्हणाले,''या 'अण्णा'चं बरंय बुवा, बसल्याजागी मिडियाने टोप्या लावीत गर्दी जमवली,
मी मात्र स्वातंत्र्यासाठी उघड्या अंगाने उगा अनवाणी पायपीट केली
मूठ उचावत गर्दीसमोर जेव्हा 'अण्णा'म्हणाले ''ही तर दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई'',
तेव्हा उद्वेगाने म्हणाले जे.पी., ''अरे मग आम्ही आणीबाणीत उगा झक मारली''..
पुस्तकांच्या गराड्यात वाचनमग्न बाबासाहेबही मग म्हणाले उद्वेगाने, ''तर्कविसंगत बडबडीतून विधेयके बनवणऱ्या भारतभूमीत उगाच इतका अभ्यास करून मी 'संविधान'बनविले''
तेवढ्यात एक पृथ्वीवरला कुठल्यातरी वाहिनीचा दूत आला स्वर्गात,
साऱ्यांना पाहून म्हणाला, अरेच्या 'अण्णा' च्या टोप्या नाहीत तुमच्या डोक्यात?
म्हणजे नक्कीच तुम्ही सारेच आहात भ्रष्ट,
नाहीतर म्हणा साऱ्यांनी ख रा रपपर करक्षरीश विष्णू , शंकर, यम, अप्सरा सारेच हतबल झाले, जे.पी., बापू, नेहरू, बाबासाहेबांनीही हात टेकले... त्या पृथ्वीरवरच्या दुताकडल्या टोप्या साऱ्यांनी मुकाट डोक्यात घातल्या,
अन् साऱ्यांनीच मग 'मी अण्णा हजारे' म्हणत जड उसासा टाकला...

मंडळी आवरा लवकर... वेळेवर गेलो नाही तर ते कोचिंग क्लासवाले अ‍ॅडमिशन देणार नाहीत. मग बसावं लागेल घरातच अभ्यास घेत...
निघाले हो... जरा म्हणून दम नाही. सगळा वेळ तुमच्या हातात हातात देण्यात गेला... माझा शर्ट कुठायं... सॉक्स कुठयतं... लेस कुठयं... आणि पुन्हा माझ्या नावानं बोटं मोडता... अण्णा येऊ द्यात घरी. मग सांगते की नाही बघा...
मला नको देऊस अण्णांची धमकी. मी काय सरकार वाटलो काय अण्णाना घाबरायला... ते देखील मावशीला असंच म्हणत असतात... माझा झब्बा कुठयं... माझी काठी कुठयं...
कुठे ते अण्णा आणि कुठे तुमचे अण्णा... हे आपले बसतील पेपरात तोंड खुपसून. सगळ्या जगाची दुखणी वाचत, आणि ते, सगळ्या जगाच्या दुखण्यावर इलाज करायला गेलेत... कधी कामी येतील कोणास ठावूक तुमचे अण्णा...
अगं असा त्रागा कशाला करतेस. आपल्या अण्णांचं वय झालयं. सगळं आयुष्य त्यांचं साहेबांच्या पुढे पुढे करण्यात गेलं. नोकरीच तसली. कधी प्रमोशन मिळालं नाही की कधी बॉसगिरी करायला भेटली. बिचारे अण्णा... तरीही आम्हा पोरांना वाढवलं. मला चांगला सहकारी बँकेत हेडक्लर्क केला... पै पै करुन फ्लॅट घेतला म्हणून आपण आता सुखानं राहू तरी शकतो. आणखी काय करायला हवं त्यांनी... असतं एखाद्याचं नशीब... त्याला काय करणार कोण...
बरं, आता नका लेक्चर देत बसू... चला. पुन्हा अ‍ॅडमिशन नाही मिळाली तर माझ्या नावानं बोटं मोडायला मोकळे आहातच...
(शामराव आणि सौभाग्यवती कोचींग क्लासच्या कार्यालयात पोहोचतात...)
काय नाव मुलाचं...
चैतन्य शामराव...
बास... बास... मासिक उत्त्पन्न किती...
अहो अजून शिकला नाही तर नोकरी कशी लागेल...
मी त्याचं नाही तुमचं उत्त्पन्न विचारतोय.
ग्रॉस तीन लाख साठ हजार...
अन्य काही मार्गाने...
छे हो, वेळच मिळत नाही नोकरीतून...
पण फी कशी भरणार तुम्ही... वर्षाला दीड लाख भरावी लागेल... तुमचा तर पगार तेवढा नाही...
होईल व्यवस्था. अण्णांना सांगेन... ते देतील काही पैसे...
काय म्हणालात... अण्णांना सांगता. अण्णा कोण तुमचे...
कोण म्हणजे काय... वडील माझे. याचे आजोबा... पण हल्ली खूप बिझी आहेत ते.
अहो आधीच नाही का सांगायचं... अण्णा तुमचे पिताश्री आहेत ते...
तुम्ही कुठे पूर्ण नाव सांगू दिलं...
अहो, फीचं सोडा... तुमचा चैतन्य आजपासून आमचा झाला. कसली फी घेऊन बसलात... अण्णांच नाव केवढं... कार्य केवढं... मी ओळखतो त्यांना... ये दगडू... थंड पाणी आण रे... चहा सांग दोन... काय वहिनीसाहेब, काही काळजी करु नका पोराची... चांगला नंबर वन काढू आम्ही त्याला. निकालाच्या दिवशी मात्र अण्णांना आणा आमच्या संस्थेत... त्यांचे पाय लागले आमच्या संस्थेला तर... तेवढेच आम्हाला पूण्य पदरी पडेल...
(दोघे बाहेर पडतात...)
बघं मी म्हणालो नव्हतो तुला, अण्णा कामी येणार म्हणून. तुझा विश्वासच नाही.
अहो पण, त्यांना खरं कळालं तर...
तोपर्यंत होईल ना पैशांची व्यवस्था...

काय, दबक्या पावलानं येऊन कोंबड्या चोरताय की काय दादाराव...
वाट्टेल ते बोलू नका वास्करशेठ... सांगून ठेवतोय... आधीच आपलं डोकं गरम. त्यात आपल्या दोन पोरांन ऐकलं ना तर मग काय खरं नाय तुमचं...
अहो पण एवढं चिडायला काय झालं... मी काय म्हणलं तुम्हाला... कोंबडी चोर ही काय शिवी झाली की काय...
शिवी नाय तर काय... आमच्या कोकणात भुरट्या चोरांना कोंबडी चोर म्हणतात माहितीयं का...
आता कोकणात कशाला काय म्हणतात हे काय तुमच्याकडून शिकायचं की काय आम्ही... माहितीयं आम्हाला तुम्ही शेठ कसे झाले ते... कशाला तोंड उघडायला लावताय सकाळी सकाळी...
अहो, तुम्हाला भूरटे चोर म्हणालो म्हणून राग आला की तुम्हाला मोठे दरोडे टाकता येत नाहीत याचं वाईट वाटलं सांगा बरं मला...
पुन्हा पुन्हा तेच... आता गप्प बसता की दाखवू हिसका...
अरारा... फारच गरम झाले तुम्ही साहेब... तुम्ही एक गरम तर तुमचे पोट्टे दहा गरम... आम्ही बघा बरं... कसे सोबरपणे बोलतो, वागतो... तुम्हाला ना तुमचा पंथ वाढवता येईना त्याचा राग आमच्यावर कशामुळे काढू लागले बरं तुम्ही...
तुम्हाला ना हात मोडक्या खूर्चीवर बसून सावकारी करायची सवय लागलीय... त्यात ती मोडकी खूर्ची डोक्यात गेलीय तुमच्या...
ओ, काय पण नका बोलू... सांगून ठेवतोय... आपण शेठगिरी करतो ते आपल्या दमवर... तुमच्यासारखं दुसऱ्यांच्या कोंबड्या चोरुन नाय शेठगिरी करत...
अरे तिच्या... पुन्हा तेच बोलतोय हा वासकऱ्या... कोण रे तिकडं...
साहेब, साहेब... आम्ही दोघचं आहोत इकडं... काय करु सांगाच तुम्ही...
प्रत्येक गोष्ट काय मीच सांगायची काय रे... तुमचं डोकं वापरलं तर काय बिघडलं की काय...
पण साहेब, काय घडलं तेच कळलं नाय तर बिघडलेलं कसं कळणार ना...
तू गप्प रे... काय करावं तेच कळेना मला या दोघांच...
मी पण तेच म्हणतो दादाराव... उगाच तुम्ही फार अपेक्षा ठेवता आणि पंचाईत करुन घेता स्वत:ची आणि या दोघांची पण... आमचं बघा बरं... याचे घ्यायचे, अन् त्याला द्यायचे... घेताना दोन जास्ती घ्यायचे, देताना दोन कमी द्यायचे... पुन्हा सगळा गाव आपल्याला शेठ म्हणतो की नाय... नायतर तुमचं बघा... कोणाचं घेता, कोणाला देता काय पत्ता लागत नाही... पण तुम्हाला कोंबडी चोर म्हणलं की राग येतो...
आता पुन्हा जर का तू कोंबडी चोर म्हणालास ना वास्कऱ्या... तर जीभ हासडून हातात देईन...
बरं राहीलं दादाराव... पण चिडून काय होणार सांगा बरं... तुम्हाला ना गल्लीत कोणी बोलेना, ना दिल्लीत कोणी पुसेना... आता उगा जे मिळालयं ते हरी हरी करीत सांभाळा म्हणजे झालं...
तू रे कोणत्या कष्टानं मिळवलसं... तूझी लफडी काढू का बाहेर... मगं फिरशील तोंड लपवीत सगळ्या गावभर...
मी काय म्हणतो दादाराव... हे असं किती दिवस याची लफडी काढू का, त्याची काढू का... म्हणत बसणार तुम्ही... त्यापेक्षा एकदा होऊनच जाऊद्या ना...
साहेब, हा होऊन जाऊद्या म्हणतोय... करू का राडा...
अरे तुमच्या या अशा राडेबाजीमुळं तर मला सोन्याची कोंबडी मिळता मिळता राहीली... तुमच्यामुळेच माझं...
बघा दादाराव सोन्याची सुध्दा कोंबडीच हवी की नाय तुम्हाला... मग कोणी कोंबडी चोर म्हणलं तर काय बिघडलं...
तेवढ्यात राडेबाजीला सुरुवात झाली तरी दोघेही पिंगाट पसार झाले...

काय शामराव, काय वाचतायं एवढं... गावभरचे पेपर आणलेले दिसतायं...
या बसा... तुम्ही वाचा माधवराव... आपले गृहमंत्री आर.आर. आबा परदेशात गेले होते. तिथं त्यांनी काय काय पाहिलं म्हणे... आणि डिट्टो तसचं आपल्या गावागावातून करणार आहेत असं लिहीलयं पेपरवाल्यांनी... वाचा तरी जरा...
त्या पेपरवाल्यांना काय जातयं लिहायला. आबा बोलणार आणि हे लिहीणार. नंतर ते पण विसरुन जाणार आणि हे पेपरवाले पण...
तुम्ही ना माधवराव, कायम निगेटीव्ह विचार करता पहा. अहो हा माणूस एवढा कोट-सुटाबुटात परदेशात गेला. काहीतरी बघून आला. त्या गोष्टी आपल्याकडं करायच्या म्हणतो तर त्यात वाईट काय...
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे शामराव. पण अहो आपल्याकडं जसं आहे तसं तिकडं आहे का सांगा बरं... मगं कसं काय करणार आपल्याकडं. बोलायला सोप्पयं पण करायची वेळ आली की मगं कळेल.
माधवराव, आता ते आपल्याकडं कॅमेरे बसवणार, गस्त वाढवणार, वाहतुकीवर लक्ष नियंत्रीत करणार... अशावेळी आपलं तुपलं काय सांगतायं... आणि असं काय आपल्याकडे आहे जे तिकडे नाही...
आता कसं मुद्याचं बोललात शामराव... मला सांगा इंग्लंडसारखी आपल्याकडची वाहतूक एका लायनीत, नीट्ट चालली पाहीजे तर आपल्याकडे रस्ते तसे नको का करायला... तसे रस्ते करायचे तर आपल्या रस्त्यावरचे खड्डे बुजवावे लागतील... ते बुजवायचे तर त्यासाठी पैसे लागतील... पैसे पाहिजेत तर अजितदादाकडं हात पसरावा लागेल... हात पुढे केला आणि त्यांनी कश्शाला पाहीजेत पैसे... नाही देत ज्जा... असं ठसक्यात सांगितलं तर मग वाहतूक कशी एका लायनीत चालेल सांगा बरं... आता तिकडे इंग्लंडमध्ये ना भूजबळ आहेत ना अजितदादा. या सगळ्यांचे आपापसात जसे मधूर, सलोख्याचे संबंध आहेत तसे तिकडच्या नेत्यांचे आहेत का सांगा बरं... तिकडचे नेते अधिकाऱ्यांना सांगातात, अमूक रस्ता, अमूक दर्जाचा झाला पाहिजे. संपलं. नंतर तिकडं तो रस्ता जसा सांगितला तसा होतो. आता आपल्याकडचे अधिकारी कुठे आणि त्यांच्याकडचे कुठे... बदनामी मात्र विनाकारण आपल्या दादा, आबा आणि भूजबळांची होते...
अहो माधवराव... थांबा जरा थांबा... कुठून कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही... मी फक्त चार चांगली कामं होतील म्हणालो तर तुम्ही मराठी माणसासारखं त्याला दहा कारणं पुढं करुन वाट लावून टाकलीत...
शामराव, आता नवाच मुद्दा नका काढू आणि मराठी माणसाची बदनामी नका करु. अहो, आपल्याकडची सिस्टीम वेगळी आहे. तिकडची वेगळी आहे. आता मला सांगा, तिकडं पानाचं दुकानच नाही आणि आपल्याकडे पावलो पावली पान खाऊन भिंती रंगवणारे भेटतात... हाती आलेल्या वस्तू काम झालं की जिथं दिसेल तीथं टाकून देणारे आपल्याकडेच आहेत की नाही... कोणी कुठं गाडी उभी करावी याचे नियम असले तरी आपल्याकडच्या नेत्यांना, त्यांच्या चेल्याचपाट्यांना ते लागू होतात का... अशा किती गोष्टी सांगायच्या.
मग माधवराव आपल्या आबांची ट्रीप वाया जाणार की काय...
वाया कशी जाईल. ते त्यांच्या स्वत:च्या पैशानं गेले. त्यांच्या स्वभावाप्रमाणे... त्यांनी स्वत:च्या हातानं, त्यांच्या पायावर... जाऊद्या... येतो मी. नंतर बोलूत...