सोमवार, १४ ऑक्टोबर २०२४
14 October 2024
Gifted Movie

अमेरिकेचा गिफ्टेड सिनेमा आणि
आपल्या शाळेमधील वास्तव..!


कॅलिडोस्कोप / अतुल कुलकर्णी
आमच्या आजूबाजूला, समाजात जे घडते त्याच गोष्टी आम्ही आमच्या चित्रपटातून दाखवतो, असे जगभरातले निर्माते दिग्दर्शक सांगत असतात. त्याचेच प्रतिबिंब ‘गिफ्टेड’ या अमेरिकन चित्रपटात पाहायला मिळते. मार्क वेब यांनी दिग्दर्शित केलेला आणि टॉम फिल्न यांनी लिहिलेला हा चित्रपट तुम्हाला हसवतो. डोळ्यात पाणी आणतो. आई वडील नसलेल्या लहान मुलांच्या विषयीचा वेगळा दृष्टिकोन समोर ठेवतो. हा चित्रपट २०१७ चा. सात वर्षांपूर्वी त्यात घेतलेला विषय आजही तितकाच ज्वलंत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स वर आहे. चित्रपटाचे परीक्षण करणे हा लेखाचा हेतू नाही.

मात्र या चित्रपटाने मांडलेला विषय आजही अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयाकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष करत आहोत, याची जाणीव चित्रपट पाहिल्यावर होते. सात आठ वर्षाच्या मुलीची आई मृत्युमुखी पडते. वडील जन्मलेल्या मुलीला पाहतही नाहीत. आपल्या मुलीला आपल्या भावाने वाढवावे असे ती आई मरताना सांगते. छोटी मुलगी मामाच्या घरी वाढत असते. ही मुलगी आईसारखीच गणितात प्रचंड हुशार असते. त्या मुलीला गणितातले कुठलेही अवघड कोडे क्षणात सोडवायची सवय लागलेली असते. तिचा मामा मुलीला ज्या शाळेत ऍडमिशन देतो त्या शाळेच्या मुख्याध्यापिका मुलीची विद्वत्ता बघून तिला आणखी चांगल्या शाळेत घालायची सूचना करतात. आपल्या मुलीकडे अचाट विद्वत्ता आहे, पण तिला याची जाणीव होऊ न देता मला तिला शिकवायचे आहे. या मुलीने इतर सामान्य मुलांसोबतही फिरले पाहिजे, भटकले पाहिजे, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. तरच तिला तिच्या विद्वत्तेचा गर्व होणार नाही, असा वेगळा विचार मामा त्या मुख्याध्यापिकेला सांगतो. या मुलीची विद्वत्ता तिच्या आजीला कळते. आजी प्रचंड श्रीमंत असते. या छोट्या मुलीच्या आईने गणितात लावलेला एक शोध अर्धवट असतो. तो या मुलीने पूर्ण करावा म्हणून आजी छोट्या मुलीला स्वतःच्या घरी घेऊन जाण्यासाठी येते. छोटी मुलगी आजीकडे राहायला जाते. पण तिला मामाकडे परत यायचे असते. आजी कोर्टात जाऊन मुलीचा ताबा स्वतःकडे मिळवण्याचा प्रयत्न करते. या सगळ्या घडामोडीत आजीने रचलेले नाटक मामाला कळते. मामा त्या मुलीला घेऊन स्वतःच्या घरी जातो. ती मुलगी तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या मुलांसोबत गणिताच्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला जाते. कॉलेज सुटले की तिच्या वयाच्या सामान्य मुलांसोबत बागेमध्ये खेळायलाही जाते… आणि इथेच हा सिनेमा संपतो…

 

अतिशय तरलपणे दिग्दर्शकाने आणि लेखकाने हा चित्रपट उभा केला आहे. छोट्या मुलीचे काम तुम्हाला तिच्या प्रेमात पडते. या सगळ्यांच्या पलीकडे मुलांचे गुण हेरून त्यांना त्या दर्जाचे शिक्षण देत असताना, त्यांच्या वयाच्या मुलांसोबत त्यांना खेळता आले पाहिजे. बाहेर फिरता आले पाहिजे, हा विचार देताना चित्रपट कुठेही प्रेषिताचा आव आणत नाही. चित्रपट पाहिल्यानंतर आपण आपल्या जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळांकडे, तिथल्या व्यवस्थेकडे पाहिले की सिनेमाने दिलेली अस्वस्थता कितीतरी जास्त वाढत जाते.

शिक्षण संचालक राहिलेले माझे मित्र मोहन आवटे एका संस्थेत काम करत होते. त्यांच्या शाळेत त्यांनी गणिताच्या एका शिक्षिकेला दुसऱ्या राज्यातून आणले. तिने मागितलेला सगळा पगार तिला दिला. गाडी दिली. राहण्यासाठी घर दिले. तिला हवी असणारी मासिके उपलब्ध करून दिली. त्या शिक्षिकेच्या हाताखालून जी मुलं तयार झाली ती जगातल्या वेगवेगळ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत पुढे गेली. जर्मनी, जपान अशा अनेक देशांमध्ये शिक्षकांना मिळणारी आदराची वागणूक, त्यांचे समाजातले सर्वोच्च स्थान आणि आपल्याकडे शिक्षकांना मिळणारी वागणूक आणि त्यांचे व्यवस्थेतले सगळ्यात शेवटचे स्थान यातच आपल्या शिक्षण पद्धतीचे अहित सामावलेले आहे.
जपानमध्ये लहान मुलांना कशा पद्धतीचे शिक्षण दिले जाते याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियातून पाहतो. अनेकदा त्याची तुलना आपल्याकडच्या शिक्षण पद्धती सोबत केली जाते. दोन्हीतला फरक पाहून आपण तो विषय हसण्यावर सोडून देतो. मात्र आपल्याकडचे विद्यार्थी चांगले कारकूनही होऊ शकत नाहीत, याची खंत ना राज्यकर्त्यांना वाटते ना संस्थाचालकांना…
विद्येविना मती गेली।
मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली।
गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा विचार त्याकाळी मांडला. तो आजही तितक्याच प्रखरपणे लागू होतो. आपली मुलं काय शिकतात? कशी शिकतात? जगातली मुलं कुठे आहेत? त्यांचे आई-वडील, त्यांचे शिक्षक त्यांच्यासाठी काय करतात? हे पाहायचे असेल तर ‘गिफ्टेड’ हा सिनेमा बघितलाच पाहिजे. नुसता सिनेमा पाहू नका. सिनेमा पाहिल्यानंतर निर्माण झालेले प्रश्न स्वतःला विचारा… त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा… बघा हातात काय येते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *