शुक्रवार, १९ एप्रिल २०२४
19 April 2024

अमर अकबर ऍंथोनी आणि रक्तदान..!

– अतुल कुलकर्णी

अमर, अकबर, ऍंथोनी चित्रपटात अमिताभ बच्चन, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना या तिघांच्या शरीरातून रक्त काढले जात आहे… ते एका बाटली जमा होऊन त्यातून ते त्यांच्या आईला म्हणजे निरुपा रॉय यांना दिले जात आहे… १९७७ साली आलेल्या या चित्रपटातील हा सीन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनावर ठसलेला आहे. त्यावरून असे रक्त देता येते की नाही? यावर चर्चा झडू लागल्या. मात्र रक्तदानाचे महत्त्व या चित्रपटाने अधोरेखित केले होते. आपल्या शरीरातला हा एक असा घटक आहे, जो आपण देऊन कोणाचा जीव वाचू शकतो. त्यामुळेच कोणत्याही दानात रक्तदान हे श्रेष्ठदान, प्राणदान म्हणून कायम ओळखले जाते. रक्तदान शिबिरे किंवा रक्तदानासाठी आयोजित कॅम्पस याविषयी समाजात आजच्या काळात म्हणावी तशी उत्सुकता, किंवा उत्साह राहिला नाही. बदलते जीवनमान, बदललेला आर्थिक जीवनस्तर यामुळे दवाखान्यात गरज पडल्यास पैसे दिले कि रक्त मिळू शकते ही भावना वाढीला लागली. त्यातून या एका अत्यंत मोलाच्या मोहिमेविषयी अनेकदा आपण फार गांभीर्याने किंवा आदराने बघत नसलो तरी नैसर्गिक आपत्ती किंवा अपघात, भूकंप अशा वेळी लोक उत्साहाने पुढे येतात. मोठ्या प्रमाणावर रक्तदान करतात, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.

जगात १६१६ साली पहिल्यांदा विल्यम हार्वे यांनी प्राण्यांच्या रक्तदानाचा शोध लावला. १६६५ साली रिचर्ड लोअर यांनी कुत्र्याचे रक्त कुत्र्याला देण्याचा प्रयोग केला, तो फारसा यशस्वी झाला नाही. १६६७ साली फ्रान्समध्ये बकऱ्याचे रक्त माणसाला देण्याचा प्रयोग केला गेला. त्यात त्या माणसाचा मृत्यू झाला. त्यामुळे १६६८ पासून तेव्हाच्या पोप ने रक्त देण्यावर बंदी घातली. १८१८ पर्यंत यात काहीही प्रयत्न झाले नव्हते. त्यावर्षी डॉक्टर जेम्स ब्लेंडेड यांनी माणसाचे रक्त माणसाला देता येऊ शकते असा प्रयोग करून पाहिला. १८७४ साली विल्यम हायमोरे यांनी रक्तबदलाचा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या विषयात खरी क्रांती केली ती कार्ल लँडस्टायनर यांनी. कोणत्याही माणसाचे रक्त कोणालाही देता येऊ शकते हा शोध त्यांनी केला. ए, बी आणि ओ असे तीन ब्लड ग्रुप त्यांनीच शोधून काढले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना १९०१ मध्ये नोबेल पुरस्कारही देण्यात आला. पुढे हळूहळू यात प्रगती होत गेली. जगातली पहिली ब्लड बँक १५ मार्च १९३७ साली कूक कंट्री हॉस्पिटल शिकागो येथे सुरू झाली. भारतातील पहिली ब्लड बँक दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन कोलकत्ता येथे १९३९ मध्ये सर उपेंद्रनाथ ब्रह्मचारी यांनी सुरू केली. ते बंगाल रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन होते.

हा इतिहास पाहिला तर माणसाने रक्तदानाच्या क्षेत्रात कशी सुरुवात केली हे लक्षात येते. आज भारताची लोकसंख्या लक्षात घेता, भारतात रोज किमान ३८ हजार लोकांनी रक्तदान करणे अपेक्षित आहे. तसे झाले तर भारताची रोजची रक्ताची गरज भरून निघेल. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. काही दिवसापूर्वी रांचीमध्ये हॉस्पिटलकडे रक्त असताना त्यांनी बाहेरून रक्त आणण्याची सक्ती रुग्णांच्या नातेवाईकांवर केली. नातेवाईक रक्त आणू शकले नाहीत. परिणामी त्या मुलाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. हे उदाहरण एवढ्यासाठी येथे देत आहे कारण जगात भारत एकमेव असा देश आहे, जेथे रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त तुम्ही आणून द्या किंवा रक्तदाता तुम्ही शोधून आणा असे सांगितले जाते. प्रसंगी सक्ती केली जाते. रक्त उपलब्ध करून देणे आणि रुग्णाचा जीव वाचवणे हे हॉस्पिटलचे कर्तव्य आहे. मात्र आपल्याकडे रक्ताचा तुटवडा असल्यामुळे सतत रुग्णांच्या नातेवाईकाला रक्त आणण्याची सक्ती केली जाते. एक बाटली रक्त द्यायची गरज असेल त्या ठिकाणी किमान दोन ते तीन बाटल्या रक्त देण्यासाठी रक्तदाते आणा असे सांगितले जाते. रुग्णाच्या नातेवाईकांवर सगळी जबाबदारी ढकलून हॉस्पिटल्स मोकळी होतात. जगात असे कुठेही होत नाही. हे सांगणे कधी बंद होईल? याचे साधे आणि सोपे उत्तर आपल्या रक्तदानाच्या शक्तीत आहे. आपण जेवढे जास्त रक्तदान करू, तेवढी त्याची उपलब्धता जास्त होईल, आणि हॉस्पिटलला अशी सक्ती रुग्णांवर करता येणार नाही. खरेतर महाराष्ट्रात मोठ्या खाजगी हॉस्पिटल्सनी स्वतःहून सतत पुढाकार घेतला पाहिजे. रक्तदान शिबिरांचे आयोजन केले पाहिजे. मात्र त्यांच्याकडून असे प्रयत्न फारसे होत नाहीत. राज्य सरकारने कोणत्या प्रकारचे रक्त किती रुपयाला मिळेल? याचे दर ठरवून दिलेले आहेत. रक्त विकता येत नाही. त्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्यासाठीचा खर्च ब्लड बँकांना घेता येतो. या सगळ्यात अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांची मात्र नाहक अडवणूक केली जाते.

गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोरोनामुळे देशात आणि राज्यात रक्तदानाच्या मोहिमेला मोठी खीळ बसली. आज देशात दररोज २३ ते २५ हजार लोक रक्तदान करत आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, आपल्याकडे रोज किमान ६ हजार लोकांनी रक्तदान करणे अपेक्षित आहे. आपल्याकडे ३५० ब्लड बँक आहेत. या सगळ्यांकडे दरवर्षी किमान १६ लाख युनिट रक्त गोळा होते. देशपातळीवर एक निकष असा आहे की, एकूण लोकसंख्येच्या किमान दीड टक्के लोकांनी रक्त दिले पाहिजे. महाराष्ट्राची लोकसंख्या १३ कोटी आहे. म्हणजे किमान २० लाख लोकांनी रक्त दिले पाहिजे. पण आपल्याकडे ९० टक्के लोक रक्तदान करतच नाहीत. १% लोक कधीतरी एकदा रक्तदान करतात. परिणामी रक्तटंचाई कायम आहे. कोरोनामुळे हे चित्र आणखी बिकट बनले आहे. महाराष्ट्र संकटात सापडतो त्या त्या वेळी महाराष्ट्रातली जनता धावून येते हे आपण कायम पाहिले आहे. आज महाराष्ट्रात रक्तटंचाईचे संकट आहे. आपण दिलेले रक्त ज्यावेळी रुग्णाला दिले जाते, त्यावेळी ते कोणत्या जात, धर्म, पंथाचे आहे? अशी विचारणा कोणीही करत नाही. त्या क्षणाला त्या व्यक्तीचा जीव वाचवणे एवढा एकमेव माणुसकीचा धर्म तिथे असतो. नाना पाटेकरच्या चित्रपटातील एक डायलॉग आहे. नाना एका हिंदुचे आणि एका मुसलमानाचे रक्त हातावर घेतो. दोन्ही मिसळतो. आणि विचारतो, “बता इस मे हिंदू का खून कोनसा है..? और मुसलमान का कौनसा..? बनानेवाले ने इसमें फरक नही किया… तो हम कौन होते है फरक करनेवाले…” ज्यावेळी असे रक्त दिले जाते, त्यावेळी त्या रुग्णाला ते कोणाकडून आले आहे? याची कसलीही माहिती नसते. तो रुग्ण आजारातून बरा होतो. खणखणीत होतो. मात्र जेव्हा जात, धर्म, पंथ, पक्ष याचे झेंडे जवळपासच्या लोकांच्या खांद्यावर पाहू लागतो. तेव्हा तो नकळत कुठल्यातरी एका झेंड्याखाली जाण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी माणुसकीच्या धर्माचा झेंडा गळून पडतो.

अमर, अकबर, अँथनी मधील ‘तो’ प्रसंग फक्त सिनेमा पुरताच उरतो… ते होऊ नये म्हणूनच जात, पात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन मानवधर्म जोपासण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मदतीसाठी लोकमत वृत्तपत्र समूहाने राज्यभर रक्तदान मोहिमेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून महाराष्ट्राशी व जनतेशी ”रक्ताचं नातं” जोडण्याचा संकल्प लोकमतने सोडला आहे. लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी यात स्वतः लक्ष घातले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक ज्येष्ठ नेते, संघटना, या उपक्रमात सक्रिय सहभागी होत आहेत. या मोहिमेमुळे राज्यातील रक्ताची टंचाई दूर व्हावी, आणि कोणत्याही रुग्णाला रक्त गोळा करण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ येऊ नये, या एकाच हेतूने ही मोहीम लोकमतने सुरू केली आहे. याचे उद्घाटन उद्या दोन जुलै रोजी लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनी औरंगाबाद येथे होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *