सोमवार, २९ एप्रिल २०२४
29 April 2024

दादा, आपण शंभर टक्के
अभिनंदनास पात्र आहात..!

अधून मधून / अतुल कुलकर्णी

प्रिय अजितदादा,
नमस्कार.

आपण उपमुख्यमंत्री झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन विनाअडथळा पार पडले. या अधिवेशनाच्या निमित्ताने आपण अनेक मुद्द्यांसाठी अभिनंदनास पात्र आहात. आपल्यासोबत नेमके किती आमदार आहेत? हा प्रश्न संपूर्ण अधिवेशनात कोणीही आपल्याला विचारला नाही..! शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील हा प्रश्न आपल्याला विचारावा वाटला नाही. उलट सुनील तटकरे विधानभवनात आले, तेव्हा जयंतरावांनी तटकरे यांना कडकडून मिठी मारली..! हे असे घडणे किंवा घडवून आणणे केवळ अफलातून..! म्हणून या दोन घटनांपासूनच आपल्या अभिनंदनाची सुरुवात केली पाहिजे. आमचाच राष्ट्रवादी पक्ष खरा, असे म्हणणाऱ्या जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रतोद (व्हीप) म्हणून नेमले. मात्र, आव्हाडांनी कुठल्याही मुद्द्यावर व्हीप काढला नाही. आपल्याला आपली ताकद दाखवण्याची संधी त्यांनी मिळू दिली नाही. जर ती संधी मिळाली असती तर आपल्यासोबत नेमके किती आमदार आहेत, हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळाले असते. एका अर्थाने आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठरली. हेदेखील अभिनंदनासाठी योग्य कारण आहे, असे नाही वाटत आपल्याला..?

संपूर्ण अधिवेशन काळात काका-पुतण्यांच्या दोन राष्ट्रवादीत नेमके किती आमदार आहेत? हे कळू न देता सत्तेत राहणं, ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी वेगळेच कसब लागते. ते आपण दाखवून दिले. दोन्ही राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात भिरभिरत्या नजरेने कधी इकडे, कधी तिकडे फिरत राहिले. त्यांनी नेमके कुठे बसावे, हे देखील सभागृहात कोणी ठामपणे सांगितले नाही. तुम्ही इथे का बसलात? तिकडे का बसला नाहीत? असेही त्यांना कोणी विचारले नाही. अजित पवार यांनी आपल्याला निधी दिला नाही, असा आरोप करत एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेना सोडून नवा घरोबा केला. आपल्या मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे भयंकर कृत्य, असेच त्यांना वाटत होते. मात्र, शिंदे गटाचे तेच आमदार आपण योग्य निधी दिला, असे सांगत आपली तारीफ करू लागले..! हे पाहून आम्हाला गावागावाच्या वेशीवर आपल्या कौतुकाच्या गुढ्या, तोरणेच उभी करावी वाटू लागले. हे असे अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया साधली कशी, यावर एखादे पुस्तक लिहिले पाहिजे. हातोहात दहा-वीस एडिशन विकल्या जातील.

अधिवेशनाच्या धावपळीत मोदी साहेब आणि काका एका व्यासपीठावर आले. त्यावेळी ज्या शिताफीने आपण काकांच्या नजरेतून सुटलात, हे मोदी साहेबांच्याही तिरक्या नजरेने बरोब्बर हेरले..! म्हणून जाताना त्यांनी आपल्या दंडावर हात मारत शाबासकी दिली. क्या बात है..! काका मला वाचवा.., असे म्हणणारा पुतण्या इतिहासात होता हे माहिती होते. मात्र, आजच्या काळात काकांना चकवा देणारा पुतण्या, महाराष्ट्राने याचि देही याचि डोळा पाहिला. आपण मात्र त्या सगळ्या प्रकारावर अतिशय नम्रपणे उत्तर दिले. पवार साहेबांच्या समोरून जाणे योग्य नाही…म्हणून मी मागून गेलो..! असे जे आपण उत्तर दिले, त्याला तोड नाही. भाजपसोबत आपण असेच काकांच्या मागून हळूच निघून गेलात.., अशी तिरकस टिप्पणी भाजपच्या काही नेत्यांनी केली; पण आपण त्याकडेही व्यवस्थित कानाडोळा केला. हा गुणही अभिनंदनास प्राप्त आहे.

नेमके अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपुरात उपराष्ट्रपती आले, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला निघून गेले. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेता आली. आता पुढच्या अधिवेशनात आपल्या नेतृत्वाखाली शंभर टक्के सरकार होणार, असे अमोल मिटकरी सांगत होते, असे कळाले. खरे खोटे माहिती नाही; पण असे वाटणे उगाच नाही. विधानसभेच्या अध्यक्षांनी मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची खुर्चीला लावलेली चिठ्ठी काढून, आपल्याला तिथे बसवले. दस्तूरखुद्द विधानसभा अध्यक्षांनीच आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या आसनावर बसवले..! आता आपल्याला त्या पदापासून रोखण्याची कोणाची मजाल आहे..? म्हणून दादा, आपण अभिनंदनास पात्र आहात..!

आपला,
बाबूराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *