सोमवार, १४ ऑक्टोबर २०२४
14 October 2024

सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत 22 जागा मिळणार


मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी 

विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात जाहीर होतील. दिवाळीनंतर मतदान होईल. मुंबईच्या ३६ आणि ठाणे जिल्ह्यातल्या १८ विधानसभा मतदारसंघांत कोण यशस्वी होईल? यासाठी महाविकास आघाडीचे ३ आणि महायुतीचे ३ असे सहा पक्ष स्वतःचे वेगवेगळे सर्व्हे करत आहेत. मुंबईच्या ३६ पैकी २२ जागा महाविकास आघाडी जिंकेल, चार जागी कांटे की टक्कर होईल. दहा जागा आपल्याला जिंकताच येणार नाहीत, असा सर्व्हे महाविकास आघाडीच्या हाती आला आहे. याच्या उलट परिस्थिती ठाण्यातील १८ जागांची आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी केवळ तीन जागा जिंकू शकते. ४ ठिकाणी जोरदार लढत होईल. मात्र, ११ जागांवर पाणी सोडावे लागेल असे महाविकास आघाडीचे सर्व्हे सांगतात.

मंगल प्रभात लोढा (मलबार हिल), पराग अळवणी (विलेपार्ले), विद्या ठाकूर (गोरेगाव), योगेश सागर (चारकोप), सुनील राणे (बोरिवली), मनीषा चौधरी (दहीसर), अतुल भातखळकर (कांदिवली), पराग शहा (घाटकोपर पूर्व), राम कदम (घाटकोपर पश्चिम), मिहीर कोटेचा (मुलुंड) या १० जागी काँग्रेसला यश मिळणार नाही, असे सर्व्हेतून समोर आले आहे. मुंबईत सध्या भाजपचे १६ आमदार आहेत. वरती उल्लेख केलेल्या दहा जागा वगळता उर्वरित ४ आमदारांमध्ये राहुल नार्वेकर (कुलाबा), तमिल सेलवन (सायन कोळीवाडा), आशिष शेलार (बांद्रा पश्चिम), आणि अमित साटम (अंधेरी पश्चिम) यांना महाविकास आघाडी टफ फाइट देईल. कालिदास कोळंबकर (वडाळा), भारती लव्हेकर (वर्सोवा) या दोन जागा जोरदार लढत देऊन जिंकू शकतो, असा विश्वास महाविकास आघाडीला या सर्व्हेने दिला आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे ४, उद्धव ठाकरे शिवसेनेचे ८ आणि समाजवादी पक्षाचा १ असे १३ आमदार आहेत. (काँग्रेसच्या चार पैकी झिशान सिद्दिकी है अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत, तर वर्षा गायकवाड खासदार झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे.) या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव (भायखळा), सदा सरवणकर (माहीम), कालिदास कोळंबकर (वडाळा), नवाब मलिक (अणुशक्तीनगर), मंगेश कुडाळकर (कुर्ला), दिलीप लांडे (चांदीवली), भारती लव्हेकर (वर्सोवा) रवींद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व) आणि प्रकाश सुर्वे (मागाठणे) अशा नऊ जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा विश्वास या सर्व्हेने मविआला दिला आहे.

मुंबईच्या ३६ जागांमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना या दोघांमध्येच वाटप होणार असल्यामुळे फारसा वाद होईल असे सध्या तरी दिसत नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नवाब मलिक यांची एक जागा दिली जाईल, मात्र, झिशान सिद्दिकी यांच्या जागी ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाकडे राहतील, असे सूत्र असले, तरी झिशान सिद्दिकी आता काँग्रेसमध्ये नाहीत म्हणून ही जागा ठाकरे गटाला हवी आहे. यामुळे आघाडीत वादाची सुरुवात होऊ शकते. काही जागा काँग्रेसला जिंकणे शक्य नसले तरी चारकोप, दहिसर, मागाठणे, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, मुलुंड या पाच जागी जर उद्धव ठाकरे गटाने चांगले उमेदवार दिले तर तेथे कांटे की टक्कर होऊ शकते आणि प्रसंगी यशही मिळू शकते असे आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे.

ठाण्यात या उलट परिस्थिती आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला महेश चौगुले (भिवंडी पश्चिम), रईस शेख (भिवंडी पूर्व) आणि जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) या तीन जागी यश मिळेल असा सर्व्हे आहे. शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), दौलत दरोडा (शहापूर), विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम), किसन कथोरे (मुरबाड), कुमार आयलाणी (उल्हासनगर), गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), रवींद्र चव्हाण (डोंबिवली), राजू पाटील (कल्याण ग्रामीण), एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी), गणेश नाईक (ऐरोली) आणि मंदा म्हात्रे (बेलापूर) अशा ११ जागा महाविकास आघाडीला विजयापासून दूर आहेत. शरद पवार गटाने पप्पू कलानी यांना उल्हासनगरची उमेदवारी दिली तर ती जागा जिंकता येईल. किसन कथोरे हे काँग्रेसमध्ये आले, तर मुरबाडची जागा जिंकता येईल असे सर्व्हे सांगतो. मीरा-भाईंदरची जागा मुजफ्फर हुसेन यांनी लढवली तर मविआला विजयाचा मार्ग सोपा वाटतो. सध्या तेथे भाजपच्या गीता जैन आमदार आहेत. बालाजी किणीकर (अंबरनाथ), गीता जैन (मीरा-भाईंदर), प्रताप सरनाईक (ओळवा माजिवडे) आणि संजय केळकर (ठाणे) या जागा मविआच्या सर्व्हेमध्ये ‘बी’ कॅटेगिरी दाखवल्या आहेत. यातील किणीकर आणि गीता जैन यांची जागा काँग्रेसने तर प्रताप सरनाईक यांची जागा ठाकरे शिवसेनेने लढवली पाहिजे असे त्यात म्हटले आहे. याचा अर्थ असाच निकाल लागेल अशी परिस्थिती नाही. मुंबईत महायुतीला तर ठाण्यात आघाडीला प्रचंड काम करावे लागेल. त्याहीपेक्षा एकमेकांना समजून घेऊन उमेदवार द्यावे लागतील. येणारे सर्व्हे मविआच्या बाजूने आहेत म्हणून त्यांच्या नेत्यांनी जागेसाठी दुराग्रह धरणे किंवा हट्ट करणे त्यांना महागात पडू शकते. हाच निकष युतीलादेखील लागू पडतो. निवडणुका जशा जवळ येतील, तसे चित्र आणखी स्पष्ट होत जाईल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खरा माहोल समोर येईल. तोपर्यंत तरी अशा चर्चा होतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *