गुरुवार, ७ नोव्हेंबर २०२४
7 November 2024

आमरा एई देशेते थाकबो..!
एका बंगाली गाण्याचा ममतांच्या विजयात रोल काय होता..?

ममता बॅनर्जी जिंकल्या म्हणजे नेमके काय झाले..?
– अतुल कुलकर्णी

बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र ही तीन बंडखोर राज्य म्हणून ओळखली गेली. त्याकाळी लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, आणि बिपिनचंद्र पाल हे तीन स्वातंत्र्यसेनानी लाल-बाल-पाल या नावाने ओळखले जात. लाला लजपत राय यांनी पंजाब मध्ये पंजाब केसरी काढला, तर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात केसरी काढला. बंगालमध्ये वांडग्मयीन चळवळ स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी जोर धरू लागली. या तीन राज्यांचे हेच वेगळेपण ठळकपणे दिसते. आनंदमठ ही बंकिमचंद्र चटर्जी यांची कादंबरी त्यावेळी बंगालमध्ये तयार झाली. ज्यातून पुढे ‘वंदे मातरम’ हे गीत आपण घेतले. त्यावेळी सुद्धा साहित्यातून चळवळ आधी सुरू झाली आणि त्याच्यातून राजकीय चळवळ रूपांतरित झाली. पुढे ब्रिटिश सत्तेपुढे मोठे आव्हान उभे राहिले. हा संदर्भ गाठीशी ठेवून पाहिले तर बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र या तीनही राज्यात भाजप विरोधी सरकार आहेत. जी केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या वकुबाप्रमाणे आव्हान देण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होऊ नये म्हणून भाजपने प्रचंड ताकद लावली होती. मात्र कोणी विचारही केला नसेल असे तीन पक्ष एकत्र आले, आणि महाराष्ट्रात भाजप विरोधी सरकार सत्तेत आले. पंजाब मध्ये काँग्रेसने गड राखून ठेवला आहे. आता बंगालचा निकाल हे ताजे उदाहरण आहे.

हे सगळे मुद्दे मांडण्याचे कारण आहे एक गाणे. बंगालमधील तरुण आणि ज्येष्ठ कलाकारांनी एकत्र येत एक गाणे २४ मार्च रोजी युट्युब वर अपलोड केले. महिन्याभरात ते एक मिलियन प्रेक्षकांपर्यंत गेले. याच कालावधीत बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. लोकसभा असो किंवा विधानसभा, हल्ली अशा निवडणुकांमध्ये साहित्यिक, विचारवंत, कलावंत फारसा सक्रिय सहभाग घेताना दिसत नाहीत. मात्र बंगालच्या या निवडणुकीत कलावंत एकत्र आले. ठोस भूमिका घेऊन त्यांनी एक गाणे तयार केले. त्या गाण्यातून पश्चिम बंगालचे जनमानस व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला. ममता बॅनर्जी यांचा विजय हा केवळ त्यांच्या प्रचंड संघर्षाची कथा सांगत नाही, तर त्या गाण्यातून जे जनमानस पश्चिम बंगालमध्ये तयार झाले त्याचे प्रतिबिंब निकालातून उमटले आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल जिंकला, एक हाती सत्ता मिळवली, एवढाच या निकालाचा अर्थ निघतो का? त्याच्या पलीकडे जाऊन या निकालाची कारणमिमांसा झाली पाहिजे.

पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, अर्ध्याच्या वर केंद्रीय मंत्रिमंडळ आणि वेगवेगळ्या राज्यातील भाजपचे धुरीण पश्चिम बंगालमध्ये मैदानात उतरले. त्यांच्याविरुद्ध एकट्या ममता बॅनर्जी मोडक्या पायासह सामोरे गेल्या. घमासान लढाई झाली, आणि त्यात त्या जिंकल्या. सांगायला जरी ही स्टोरी खूप फिल्मी वाटत असली, तरी या निकालाने काय काय साध्य केले? त्याची यादी केली तर ती कितीतरी मोठी होईल. त्यासाठी अनिर्बन भट्टाचार्य यांनी लिहिलेले आणि बारा गायकांनी गायलेले गाणे आवर्जून बघितले पाहिजे. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी विधानसभा निवडणुका सुरू झाल्यानंतर एक भूमिका घेतली.

गाण्याचा आशय थोडक्यात सांगायचा झाला तर असा आहे, ” प्राचीन पुस्तकं तुम्हाला इतिहास सांगतात, आणि तोच इतिहास तुम्हाला आज प्राचीन झाला आहे. ज्ञानाच्या महत्त्वाला तुम्ही राक्षसी स्वरूप देत आहात… निरक्षरतेचे समर्थन करत आहात. तुमची भक्ती रक्तलांच्छित आहे. तुम्हाला कुणाबद्दलही प्रेम, जिव्हाळा नाही. राष्ट्रवाद तुम्हाला माहिती नाही, किंवा समजत नाही. द्वेष आणि मत्सर तुम्ही संसर्गजन्य महामारी सारखे पसरवत आहात. तुम्ही माझ्या सहनशीलतेचा अंत पाहत आहात. जी आता संपत आली आहे. आमचं भलं कशात आहे हे आम्हाला चांगलं समजतं, आणि तोच निर्णय आम्ही घेणार आहोत. आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही आमच्या मातृभूमीतच राहणार आहोत”. अशी भूमिका घेताना कवी आपल्या कवितेत म्हणतो, “तुमची भक्ती, तुमची पूजा थोतांड आहे. सत्याची तुम्हाला जराही चाड नाही. तुमची सगळी स्पष्टीकरण पाकिस्तान पासून सुरू होतात, आणि तिथेच संपतात. आंदोलनांना तुम्हीच हवा देता, आणि नंतर आमच्या समोर पर्याय ठेवत नाही. सामाजिक न्याय, आर्थिक आणि राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, विश्वास आणि उपासना, समान संधी, प्रेमळपणा, प्रत्येकाच्या व्यक्तिगत सन्मानाची हमी आणि देशाची एकता व अखंडता यावर विश्वास ठेवणारे आम्ही भारतीय आहोत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक ही आमच्या जगण्याची प्रेरणा आहे. त्यामुळेच आम्ही संतप्त आहोत, पण घाबरलेलो नाही…” असे सांगत हे गाणे पुढे जाते.

या गाण्याचा म्हटले तर पश्चिम बंगालच्या निवडणुकीशी संबंध आहे, म्हटले तर संबंध नाही देखील. या गाण्याच्या शेवटी एक छोटी मुलगी “माझा भारताच्या घटनेवर विश्वास आहे” असे म्हणत येते… तिच्या हाती तिच्या आधीच्या पिढीचा तरुण तिरंगा झेंडा देतो… एक महिला रवींद्रनाथ टागोर यांचे पुस्तक देते… आणि पूर्ण स्क्रीन वरती एकटी मुलगी दिसते…. तिच्या आजूबाजूला भारतीय घटनेतील अनेक कलमं येत राहतात… अत्यंत प्रभावी असे हे गाणे कोणावरही व्यक्तिगत टीका न करता तुमच्या समोर येते. त्याला पूरक वापरलेली छायाचित्रे, वर्तमानपत्रांची कात्रणे,पुस्तके अधिक प्रभावीपणे तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देतात. निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर व्हाव्यात की जाती-धर्माच्या मुद्द्यावर ? असाही एक प्रश्न हे गाणे उपस्थित करते. हे गाणे पाहिल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीचा प्रचार झाला आणि निवडणुकीचा जो निकाल आला, त्याचा संदर्भ जोडण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकत नाही.

मात्र ममता बॅनर्जी यांच्या विजयामुळे लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास दृढ होण्याला मदत झाली आहे. कधीकाळी डाव्यांना अंगावर घेत ममता बॅनर्जी यांनी त्यांना परास्त केले. पुढे काँग्रेसलाही त्यांनी थेट लढत दिली. डावे आणि काँग्रेस पश्चिम बंगाल मधून पूर्णतः संपले. या निवडणुकीत त्यांनी भाजप या राष्ट्रीय पक्षासोबत एकाकी चिवट झुंज दिली. गेल्या विधानसभेत काँग्रेस आणि डावे मिळून जेवढे विरोधक होते तेवढेच विरोधी आमदार आज भाजपमध्ये आहेत. ममता बॅनर्जी यांनी आपले विरोधक बदलले असेही म्हणता येईल. भाजपने अत्यंत तगडी झुंज दिली. ३ आमदार असणाऱ्या भाजपचे ७७ आमदार निवडून आले. ही मजल तशी पाहिली तर खूप मोठी आहे. डावे आणि काँग्रेस पश्चिम बंगाल मधून संपले. मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारली. असे असले तरी या निवडणुकीमुळे ज्या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार भाजपकडून केला जात होता, तो पाहता पश्चिम बंगाल मध्येच नव्हे तर देशात कुठेही विरोधी पक्ष शिल्लक उरणार नाही, असे चित्र तयार केले जात होते. त्याला या निकालाने खीळ बसली आहे. विरोधी पक्ष जिवंत असणे ही लोकशाही जिवंत ठेवण्याची पहिली गरज असते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना संपूर्ण बहुमत मिळाले असले तरी ७७ जागा मिळवून भाजप प्रबळ विरोधी पक्ष बनला आहे. महाराष्ट्रात देखील संख्येच्या जोरावर महाविकास आघाडी सत्तेवर आली तरी १०५ आमदारांसह भाजप प्रबळ विरोधी पक्ष आहे.

त्यामुळे ही तीन राज्ये आता राजकीय कूस बदलण्याचे काम करतील का? त्यांना त्यात किती यश येईल? त्यासाठी वातावरण निर्मिती करण्याकरता म्हणून साहित्यिक, कलावंत, विचारवंत यांचा किती सहभाग मिळेल? हे प्रश्न बंगालच्या निकालाने तयार झाले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याला शाहीर, कीर्तनकार, प्रबोधनकार यांचा मोठा हातभार लागलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमर शेख यांनी जे वातावरण तयार केले, त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीला मोठा हातभार लागला होता. अशी शेकडो उदाहरणे देता येतील.

एखादी कल्पना सुचणे आणि नंतर ती अमलात आणणे यात कल्पना ज्याच्या मनात येते तो साहित्यिक, लेखक असतो. आजपर्यंतच्या इतिहासात कल्पना सुचवणारे साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक हे महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. त्यामुळेच राजेरजवाड्यांना पासून ते स्वातंत्र्याच्या चळवळीपर्यंत अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व कायम होते. चाणक्याचे एक वाक्य कायम सांगितले जाते. चाणक्य म्हणायचे, आईच्या कुशीत निर्मिती आणि तुफान एकाच वेळी जन्म घेत असते. आई निर्मितीला प्रोत्साहन देते कि तुफानाला? हे त्या आईवर अवलंबून असते. तशीच काहीशी भूमिका स्वातंत्र्याच्या चळवळीत साहित्यिक, कलावंत, शाहीरांची राहिली आहे.

अनिर्बन भट्टाचार्य याच्या गाण्याने अशाच एका कल्पनेला जन्म दिला आहे. या एकाच गाण्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममताना विजय मिळाला असे म्हणणे वेडेपणा ठरेल. मात्र साहित्यिक, कवी जे कधीही निवडणुकीत अशा पद्धतीने सहभाग घेत नव्हते, तो सहभाग गेल्या कित्येक वर्षानी पहिल्यांदा झाल्याचे समोर आले आहे. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी यांनी कसे जिंकले हा राजकीय विश्लेषणाचा भाग वेगळा आहे. ते विश्लेषण इथे नाही. मात्र या निकालाने ज्यांना कोणाला, जी कोणतीही गोष्ट अत्यंत अवघड वाटते, ती गोष्ट कष्टाने कशी साध्य करता येते, हा संदेश या निवडणुकीने दिला आहे. एकाकी लढून काय होणार? एकटा माणूस काय करणार? असे हताश उद्गार काढणाऱ्यांना देखील हे चपखल उत्तर आहे. त्यामुळे हा निकाल एका राज्यापुरता, विशिष्ट काळापुरता किंवा एका क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही.

पायाने जखमी झालेली एक महिला सगळ्यांचा विरोध पत्करून एकटी लढा देते, आणि प्रचंड बहुमत मिळवते, असा विषय घेऊन जर कोणी चित्रपट काढला, तर लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. असा विजय ममता बॅनर्जी यांनी मिळवला आहे. याचे कारण अशा वेगळ्या लोकांनी एक वातावरण तयार केले. भाजपचे राजकीय डावपेच आखणाऱ्यांना या अशा वातावरणाचा अंदाज आला नसावा. निवडणुकीत भरपूर पैसा ओतला, विरोधकांना आपल्या बाजूने वळते करून घेतले, दुसऱ्या पक्षातल्या तुल्यबळ नेत्यांना आपल्याकडे घेतले की निवडणूक जिंकता येते, त्यांच्याकडे अमुक नट, तर आपल्याकडे अमुक नटी घेऊ, त्यांच्याकडे हा उमेदवार तर आपल्याकडे हा उमेदवार घेऊ अशा पारंपारिक पद्धतीत भाजप अडकली. मात्र दुसरीकडे कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने साहित्यिक, कलावंत, विचारवंत, शास्त्रज्ञ यांनी त्यांच्या परीने जे वातावरण बदलवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मदत केली, ही ताकद भाजपच्या लक्षात आली नाही. किंबहुना त्यांनी अशी काही ताकद उभी राहू शकते हेच गृहीत धरले नव्हते. त्यांच्या पराभवाची जी काही अनेक कारणे असतील त्यात हा मोठा वर्ग दुर्लक्षित करणे हेदेखील एक कारण आहे. शाहिरी, पोवाडे, अशी गाणी हि कायम आंदोलनांना आणि क्रांतीला पूरक ठरत आली आहेत. आजच्या वातावरणात असे गाणे तयार करणे ही देखील एक मोठी घटना आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनातील गाणे असो किंवा बंगालच्या निवडणुकीत तयार झालेले हे गाणे असो अशा पूरक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, हे येत्या काळात परवडणारे नाही. अर्थात बुद्धिजीवी वर्गाला दुखावणे आणि त्यांना गृहीत धरणे हे महागात पडू शकते हेदेखील या निकालाने दाखवून दिले आहे.

पुस्तकं, साहित्य, पत्रकारिता या गोष्टीने आजवर जगात कुठेही कधी क्रांती झालेली नाही. पण जेव्हा जेव्हा क्रांती झाली त्या त्यावेळी या गोष्टींनी खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. महाराष्ट्रातलेच नाही तर देशातील लेखक, कलावंत, पत्रकार, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ यांना आता आपण काय करू शकतो म्हणून जो हताशपणा आला आहे, त्याला या गाण्याने उत्तर दिले आहे. एक ज्योत पेटविण्याचे काम पश्चिम बंगाल मधल्या साहित्यिक, कवी, गायक, कलावंतांनी केले आहे. वणवा कधीच एका क्षणी पेटत नाही. एक ठिणगी पुरेशी असते, ती ठिणगी या निवडणुकीच्या निमित्ताने पडलेली समोर आली. त्यातून निर्माण झालेले आशादायी चित्र हे या निवडणुकीचे सगळ्यात मोठे फलित म्हणता येईल…!

Courtesy : Parambrata Chattopadhyay, Anirban Bhattacharya & others on Nijeder Mawte Nijeder Gaan

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *