शुक्रवार, ३० जुलै २०२१
30 July 2021

भाजपाला ६७ विधानसभांमध्ये आघाडी

१३ ची साथ फायद्याची की तोट्याची?, मुंडे-गडकरीवादाचा भाजपाला फटका

मुंबई, दि. ३१ – लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४ जागांचा फटका बसला. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या वेळी भाजपाचे मतदान मोठ्या प्रमाणावर कमी झाले, तरीही भाजपाला राज्यातील ६७ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे विद्यमान विधानसभेत भाजपाचे संख्याबळ ५४ होते. त्याचा विचार करता त्यांना १३ विधानसभांमध्ये जास्ती यश मिळाले आहे. आता हा १३ चा आकडा राज्यातल्या भाजपासाठी सुदैवी ठरतो की दुर्देवी याचे उत्तर विधानसभा निकालानंतरच मिळेल.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रत्येकी १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने मताधिक्य मिळवले आहे. विदर्भात मात्र भाजपाची दारुण अवस्था झाली आहे. तेथे केवळ १४ विधानसभा मतदारसंघांत त्यांना मताधिक्य मिळाले आहे. खानदेशात १३ तर मुंबई आणि कोकणात प्रत्येकी ५ विधानसभा मतदारसंघांत भाजपाला मताधिक्य मिळाले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्यातील अंतर्गत वाद पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगलीच महागात पडला आहे. गडकरींना उणेपणा देण्याची यासारखी चांगली वेळ नाही, असे म्हणत मुंडे यांना मानणारा वर्ग गडकरींच्या विरोधात गेला. पूनम महाजन यांना गडकरींनी तिकीट मिळू दिले नाही, अशी त्यांची प्रतिमा तयार केली गेली. तर दुसरीकडे लातूरला टी.पी. कांबळे आणि नांदेडला डी.बी. पवार-पाटील यांना गडकरींची इच्छा असूनही मुंडे यांनी तिकीट मिळू दिले नाही. नगरच्या दिलीप गांधी यांना कधी काळी प्रमोद महाजनांचा विरोध होता. त्यांना गडकरींनी बोलावून उमेदवारी दिली. तर पुण्यातला उमेदवार मुंडे गटाचा असल्याचे चित्र तयार केल्यामुळे तेथे गडकरींना मानणाऱ्यांनी पक्षाचा प्रचार केला नाही. या सगळ्या शह-काटशहात भाजपामध्ये मुंडे-गडकरी गट अप्रत्यक्षपणे एकमेकांसमोर उभे राहिले. पक्षातल्या काही नेत्यांनी देखील या दोघांमधील दरी कमी होण्याऐवजी वाढेल कशी यासाठीच जास्त प्रयत्न केले. या सगळ्यांचा फटका भाजपाच्या चार लोकसभेच्या जागांना बसला. भाजपाची मते तब्बल १० लाखांनी कमी झाली. पण आश्चर्यकारकरीत्या ६७ विधानसभा मतदारसंघांत भाजपाने मताधिक्य घेऊन राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले. हे स्थान वास्तवात आणायचे की नाही याचा निर्णय आता राज्यातल्या भाजपा नेत्यांना घ्यावा लागणार आहे.

भंडारा-गोंदिया, चिमूर-गडचिरोली, वर्धा या जागा भाजपासोबत होत्या. मात्र, या वेळी महादेव शिवणकरांसारखा जुना नेता दूर राहिला. त्याचा परिणाम भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुरमध्ये जाणवला. नागपूरची जागा मिळेल, असे वाटत असताना तीही हातातून गेली. बसपाला ज्या पद्धतीची मते हवी होती, ती मिळाली नाही. मागच्या वेळी बसपाला मिळालेल्या मतांचा फायदा भाजपाला झाला होता. तोही या वेळी त्यांना विदर्भात झाला नाही. असे असले तरी विदर्भात भाजपा १४ विधानसभा मतदारसंघांत आघाडीवर आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरची जागा मुत्सद्देगिरी कमी पडल्यामुळे हातातून गेली. पुण्याची जागा मुंडेविरोधी गट बाहेर न पडल्यामुळे गेली. दिंडोरीची जागा मात्र भाजपाने कशीबशी राखली. या सगळ्या साठमारीतदेखील भाजपाने पश्चिम महाराष्ट्रात १५ विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळवली आहे.

खानदेशात मात्र एकट्या एकनाथ खडसे यांनी शिवसेनेत नव्याने आलेल्या सुरेशदादा जैन यांच्या मदतीने दणदणीत यश मिळवले. मुंडे-गडकरीवादाची सावलीही खडसे यांनी पडू दिली नाही. रावेर, जळगाव या जागा भाजपाने राखल्या. तर धुळ्याची जागा मिळवली. नंदुरबारला मात्र प्रयत्न करूनही भाजपाला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे खानदेशात २० विधानसभांपैकी तब्बल १३ विधानसभांवर भाजपाने मताधिक्य मिळवले आहे. खानदेशातून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना पुरते संपवण्यातही भाजपाने यश मिळवले आहे.

कोकणात पालघर, भिवंडी हे दोन्ही ठिकाणचे उमेदवार तगडे असूनही तेथे भाजपाचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळेच की काय, कोकणात ३९ विधानसभांपैकी केवळ ५ विधानसभा मतदारसंघांत भाजपाला आघाडी मिळाली आहे.

मराठवाड्यात मात्र भाजपाने चांगले यश मिळवले. त्याचे श्रेय अर्थातच गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जाते. मुंडे यांनी बीडच्या लोकसभा मतदारसंघात एकहाती यश मिळवून दाखवले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी संबंधीत असणाऱ्या लातूर लोकसभा मतदारसंघांत २ विधानसभा मतदारसंघ सोडले तर बाकी विधानसभा मतदारसंघांत भाजपाने आघाडी मिळवली. लातूर आणि नांदेड या दोन लोकसभेच्या जागा मात्र भाजपा जिंकू शकत असतानाही गमावल्याची खंत भाजपा नेत्यांमध्ये आजही आहे. मराठवाड्यात ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी १५ ठिकाणी भाजपाने मताधिक्य मिळवले आहे.

मराठवाड्यात ९ विधानसभा मतदारसंघांत भाजपाने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत तर विदर्भात १९ विधानसभा मतदारसंघांत, कोकणात ६ विधानसभा मतदारसंघांत, पश्चिम महाराष्ट्रात २९ विधानसभा मतदारसंघांत तर मुंबईत ६ विधानसभा मतदारसंघांत व खानदेशात ३ विधानसभा मतदारसंघांत भाजपाने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *