मंगळवार, १७ मे २०२२
17 May 2022

भूजबळ त्या दिवशीचे आणि आजचे..!

जामीनावर बाहेर आले आणि पहिले काही दिवस Chhagan Bhujbal

@BhujbalChhagan ना भेटायला जाणाऱ्यांची गर्दी वाढली. ती थोडी ओसल्यानंतर त्यांच्याशी बोलायचे म्हणून गेलो. सोबत ज्येष्ठ पत्रकार व   The Times of India @TimesofIndia  चे राजकीय संपादक प्रफुल्ल मार्पकवार होते. दोघांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. एका निवडणुकीच्या मतदानासाठी त्यांना ऑर्थर रोड जेलच्या बाहेर आणले गेले. ते विधानभवनात आले होते. त्यावेळी तेथे मी एकमेव पत्रकार हजर होतो. काहीवेळाने तेथे मनोज भोईर आले होते. राष्ट्रवादीचे अनेक नेते तेथे होेते. जे काही चित्र तेथे पाहिले होते त्याची एक बातमी मी दिली होती. ती नंतर भूजबळांनी तुरुंगातच वाचली होती. त्या बातमीची आठवण निघाली. तुम्ही खूप संवेदनशिलतेने सगळं टिपलं होतं, असे ते या भेटीत म्हणाले. बोलताना मी लिहिलेलता

देवानेच लढण्याची ताकद द्यावी !
भूजबळांच्या भावनिक प्रतिक्रीयेने नेते निश:ब्द झाले
अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई – ह्कॅन्सर सोडून सगळ्या आजारांनी मला घेरले आहे. पेसमेकर बसवलाय, त्याचे पुन्हा ऑपरेशन करायचे आहे, गुडघे व सांधेदुखीने त्रस्त झालोय, पोटदुखीचा त्रास अनेक वर्षे साथ सोडायला तयार नाही, डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे, तुम्ही नाव घ्याल ते दुखणे सध्या आहे, माझे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी मी तुरुंगातून बाहेर आल्यावर मला परमेश्वराने काही वेळ द्यावा, अशी भावनिक प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भूजबळ यांनी व्यक्त केली आणि विधानभवनात उपस्थित राष्ट्रवादीचे नेतेही निश:ब्द झाले !

निमित्त होते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीच्या मतदानाचे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सदनच्या कथीत घोटाळ्यात ऑर्थर रोड कारागृहात असणारे आ. भूजबळ विधानभवनात आले. विधानभवनात आल्यानंतर ते स्वत:च एवढे भाऊक झाले की काही क्षण कोणीच कोणाशी काहीही बोलत नव्हते. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारात अम्ब्यूलन्समधून त्यांना आणण्यात आले. तेथून विधानभवनात पायी जाताना त्यांनी एक हात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा तर दुसरा आ. जयंत पाटील यांचा घट्ट धरुन ठेवला होता. त्यांच्या बाजूलाच आ. जितेंद्र आव्हाडही त्यांना आधार देत आत घेऊन आले. पायऱ्यांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. पायऱ्या चढून लिफ्टजवळ आले पण तेथेच धाप लागली म्हणून पहिल्या मजल्यावर जवळच असलेल्या सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात त्यांना नेण्यात आले. तेथे पाण्याची छोटी बाटली पितानाही त्यांना बराचवेळ लागला. एका हातात गळ्याला लावायचा मानेचा पट्टा अडकवलेला होता. एरव्ही वेगवेगळ्या मफलरीसाठी प्रसिध्द असणाºया भूजबळांच्या अंगावर यावेळी साधी शाल होती. 

काहीवेळ ते तेथे बसले, भूजबळांना त्रास होतोय ही माहिती कळताच राष्ट्रवादीच्या आमदारांनीही तेथे गर्दी केली. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटीलही त्यांना भेटायला आले. पाणी पिऊन निघण्याच्या तयारीत असतना भाजपाचे आ. राम कदम तेथे आले. सगळेजण त्यांना कसे आहात हे विचारत होते, भूजबळ मात्र बरा आहे, असे म्हणत सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत होते. मतदान करुन आल्यानंतर पुन्हा ते टॉयलेटसाठी म्हणून काही वेळ ते सभापतींच्या दालनात आले. कोणीतरी अर्धी पोळी आणि भाजी एका प्लेटमध्ये त्यांना दिली. तेव्हा स्वत: जवळच्या पिशवीतून त्यांनी एक छोटा रुमाल, एक पेपर नॅपकीन आणि छोटी हॅन्ड सॅनेटायझरची बाटली काढली. दोन थेंब हातावर घेतले आणि हात पुसून अर्धी पोळी खाल्ली. तेथे त्यांनी त्यांची औषधे घेतली. 

पुन्हा ते परत निघाले तेव्हा पत्रकारांनी विधानभवनातच त्यांना गाठले. तेव्हा भावनिक होत भूजबळ म्हणाले, लढण्यासाठी देवाने बळ द्यावे अशी प्रार्थना करतो आहे..! काही वेळ ते बोलले, पण बोलतानाही त्यांना धाप लागत होती. आता जास्त बोललो तर आणखी धाप लागेल असे म्हणत ते विधानभवनाच्या पोर्चपर्यंत आले. तेवढ्यात बाहेरुन पावसातच भिजत भिजत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले. दोघांचीही पोर्चमध्ये भेट झाली. काही क्षण दोघे एकमेकांकडे नुसतेच पहात उभे राहीले. अजित पवारांनी हात जोडून नमस्कार केला आणि दोघांमध्ये काही वेळ उभ्या उभ्या बोलणे झाले. पुन्हा मुंडे, जयंत पाटील यांचा हात धरुन ते अम्ब्युलन्सकडे रवाना झाले. विधानभवनाच्या बाहेर त्यांच्या गाड्या गेल्या तेव्हा जमलेले कार्यकर्ते भूजबळ साहब आगे बढो च्या घोषणा देत होते आणि इकडे सगळे नेते खिन्न चेहऱ्याने विधानभवनात परत फिरले होते…

– अतुल कुलकर्णी, लोकमत, मुंबई (सोमवार दि. १७ जुलै २०१७)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *